Memory

महात्मा फुले आणि शिक्षण विषयक आधुनिक विचार

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती त्यांनी १८ व्या शतकात अतिशय विषम परिस्थितीत सामाजिक विषमतेच्या अंधकारात शिक्षणाची जी ज्योत पेटवली, ती आजही आपल्याला मार्ग दाखवत आहे. “विद्येविना मती गेली…” हा त्यांचा विचार आजही तितकाच जिवंत आहे. त्यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

पण, जर महात्मा फुले आज आपल्यात असते, तर त्यांनी आजच्या शिक्षण पद्धतीकडे कोणत्या दृष्टीने पाहिले असते? हा विचार मनात आला आणि त्यांनी आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत कोणत्या कोणत्या गोष्टीत अग्रणी राहत भरीव योगदान दिले असते. या विचाराने काही मुद्दे बौद्धिक कसोटीवर घासून पाहिल्यावर ,काही विचार समोर आले, ते आपल्याला पटतील न पटतील पण एक अनुमान म्हणून मी मांडले आहे.

महात्मा फुले यांनी नेहमीच आधुनिक साधनांचा वापर समाजाच्या प्रगतीसाठी केला. आजच्या काळात त्यांनी तंत्रज्ञानाचे स्वागत केले असते, पण त्यात निर्माण झालेल्या ‘डिजिटल दरी’वर त्यांनी प्रहार केला असता. शैक्षणिक क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून या वापराचे प्रमाण सहाजिकच श्रीमंत वर्गात अधिक असून गरीब विद्यार्थ्यात कमी आहे. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब विद्यार्थ्यांमधील डिजिटल संसाधनांची दरी कमी करण्यासाठी त्यांनी ‘मोफत इंटरनेट आणि लॅपटॉप’ हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार मानला असता.
शिक्षण केवळ मोबाईल स्क्रीनपुरते मर्यादित न राहता, ते खेड्यापाड्यातील शेवटच्या मुलापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी त्यांनी चळवळ उभारली असती.कौशल्यावर आधारित शिक्षणाचा आग्रह त्यांनी धरला असता कारण त्या काळात शेती आणि उद्योगावर आधारित शिक्षणाचा आग्रह त्यांनी धरला होता.
आजच्या युवकांकडे अनेक पदव्या असूनही युवक बेरोजगार आहेत, हे पाहून त्यांनी शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल सुचवले असते.”शिकलेला तरुण हा नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा (Entrepreneur) बनला पाहिजे,” यावर त्यांचा भर असता. शाळांमध्ये पुन्हा एकदा शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये सक्तीची केली असती.
स्त्री शिक्षणाचे पुढचे पाऊल सावित्रीबाईंच्या सोबत त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आज स्त्रिया शिकत आहेत, पण त्यांच्या सुरक्षेचा आणि समानतेचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही.
त्यामुळे मुलींना केवळ अक्षरओळख न देता, त्यांना आत्मरक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्याचे धडे दिले असते. पुरुषप्रधान मानसिकतेवर घाला घालण्यासाठी त्यांनी अभ्यासक्रमात ‘लिंग समानता’ (Gender Equality) हा विषय केवळ पुस्तकात न ठेवता तो वर्तनात आणण्यावर जोर दिला असता. आधुनिकीकरणाच्या नावाखाली आणि शासकीय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणाला दुय्यम आणि कुचकामी ठरवून इंग्रजी माध्यमाच्या शाळातून शिक्षणाचे बाजारीकरण आणि खासगीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यामुळे शिक्षण हे आता मोठ्या व्यापारात परिवर्तित झाले आहे परिणामी सर्वसामान्य माणसाला आपल्या मुलाला दर्जेदार शिक्षण देणे कठीण होत आहे.
महात्मा फुलेंनी ब्रिटीश काळात ‘हंटर कमिशन’समोर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे असावे, अशी मागणी केली होती. आज त्यांनी सरकारी शाळांचा दर्जा खाजगी शाळांपेक्षाही उत्तम करण्यासाठी सरकारला धारेवर धरले असते.”शिक्षण ही विक्रीची वस्तू नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी गरिबांच्या मुलांसाठी दर्जेदार आणि मोफत उच्च शिक्षणाचा आग्रह धरला असता.
तर्कनिष्ठ आणि विज्ञानवादी दृष्टिकोन
अंधश्रद्धा आणि कर्मकांडात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी ‘सत्यशोधक’ विचारांचा प्रसार केला.
आजच्या काळात सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव पाहून त्यांनी विद्यार्थ्यांना ‘चिकित्सक विचार’ (Critical Thinking) करायला शिकवले असते.
धर्मांधतेपेक्षा विज्ञानाला आणि मानवतेला महत्त्व देणारे शिक्षण त्यांनी दिले असते.महात्मा फुले आज असते तर त्यांनी केवळ इमारतींना ‘शाळा’ म्हटले नसते, तर जिथे माणुसकी, समता आणि वैज्ञानिक विचार जोपासले जातात, त्याला ‘शिक्षण’ म्हटले असते. त्यांच्या लेखणीतून आजच्या शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आणि विषमतेवर नक्कीच नवे ‘शेतकऱ्याचा आसूड’ किंवा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ सारखे ग्रंथ जन्माला आले असते.

थोडक्यात सांगायचे तर, महात्मा ज्योतिबा फुले आज असते तर त्यांनी शिक्षण हे पोट भरण्याचे साधन’ न ठेवता ते विविध विचार, वाद आणि प्रस्थापित गुलामगिरीच्या शृंखला तोडण्याचे शस्त्र बनवले असते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/