मानवतेचा खरा दीपस्तंभ: भारतीय संत आणि त्यांचे मानवतावादी कार्य
आज ‘जागतिक मानवता दिन’ (World Humanitarian Day) आहे. जगभरात संकटग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या, मानवाधिकार आणि दयाभाव जोपासणाऱ्या व्यक्तींचे व संस्थांचे स्मरण करण्याचा हा दिवस. 2009 पासून साजरा केला जात आहे. पण भारतात मानवतेचा धर्म, मानवतेची शिकवण, मानवतेच्या संस्काराची रुजवन ही शेकडो वर्षापासून संतांनी समाजात केली आहे.
जेव्हा आपण ‘मानवता’ या शब्दाचा गाभा शोधतो, तेव्हा भारताची भूमी आणि इथल्या संतांचे कार्य डोळ्यांसमोर उभे राहते. आधुनिक जगात मानवकल्याण आणि सेवाभावाच्या चर्चा आज होत असल्या, तरी शतकानुशतके आधी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील संतांनी “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा” या शिकवणीतून खऱ्या अर्थाने मानवातेचा पाया रचला.
संतांचे मानवतावादी दर्शन: धर्म म्हणजे केवळ पूजाअर्चा नव्हे
भारतातील वारकरी संप्रदाय, भक्ती चळवळ आणि विविध प्रांतांत उगम पावलेल्या संतपरंपरेने धर्माचा अर्थ कर्मकांड किंवा उच्च-नीच भेद असा कधीच मानला नाही. त्यांच्यासाठी ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ होती.
संत ज्ञानेश्वर महाराज: अफाट ज्ञानाचा सागर असलेल्या संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे ज्ञान प्राकृत (मराठी) भाषेत आणून सर्वसामान्यांना ज्ञानाचा अधिकार मिळवून दिला. ज्ञानेश्वरांच्या पसायदानामध्ये “विश्वची माझे घर” ही भावना आहे, जी आजच्या जागतिक शांतता आणि मानवतेच्या कल्पनेशी तंतोतंत जुळते.
संत चोखामेळा आणि संत सावता माळी: कष्टाची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाचा संदेश या संतांनी दिला. माणसाची जात किंवा वर्ग पाहून त्याचे मूल्य ठरत नाही, तर त्याचे अंतःकरण आणि कर्म महत्त्वाचे असते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले.
समता आणि बंधुभाव: शोषितांचा आवाज ,मानवतेचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे विषमता आणि भेदभाव. भारतीय संतांनी जात, पात, लिंग आणि वर्गभेदाच्या भिंती न जुमानत सर्वांना समान मानले.
संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (आधुनिक भारतातील संत): गाडगेबाबांनी आयुष्यभर हातात केरसुणी घेऊन समाजसुधारणेचे काम केले. “स्वच्छता हीच ईश्वरसेवा आहे” आणि अंधश्रद्धा, अज्ञान दूर करा, असा संदेश त्यांनी दिला. त्यांनी रंजल्या-गांजलेल्यांसाठी धर्मशाळा व शिक्षण संस्था उभारल्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘ग्रामगीता’ लिहून खेड्यांचा विकास आणि मानवी मूल्यांचा पाया मजबूत केला. सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा पाठ त्यांनी संपूर्ण देशाला दिला.
संत बसवेश्वर (कर्नाटक): १२ व्या शतकात ‘अनुभव मंडप’ स्थापन करून जगात लोकशाही आणि समतेचा पहिला जाहीरनामा देणारे महात्मा बसवेश्वर यांनी श्रमप्रतिष्ठा आणि स्त्री-पुरुष समानतेचा पाया रचला. तर अलीकडच्या काळात कुष्ठरोग्यांची महा सेवा करणारे बाबा आमटे हे देखील मानवतेचा संदेश देणारे एक महान संतच मानावे लागतील
कोरोना आणि संकटकाळात संतांच्या विचारांचा वारसा
आज जेव्हा जगात नैसर्गिक आपत्ती, युद्धे किंवा आरोग्यविषयक संकट (उदा. कोरोना महामारी) येतात, तेव्हा धावून जाणारे स्वयंसेवक हे याच भारतीय संतपरंपरेचे आधुनिक पाईक असतात. महाराष्ट्राची वारी परंपरा ही मानवी शिस्तीचे, समतेचे आणि एकमेकांना सांभाळून चालण्याचे उत्तम उदाहरण आहे. वारीमध्ये राजा असो वा रंक, सगळे वारकरी एकाच पाऊलीवर नाचतात; इथे कोणताही भेदाभेद नसतो—हीच खरी जागतिक मानवता आहे.
आधुनिक काळात मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत, स्वार्थीपणा वाढतोय आणि जगभरात वैज्ञानिक आणि तांत्रिक शोधाने व राजकीय दबाव प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अशांतता पसरत आहे. अशा वेळी जागतिक मानवता दिनानिमित्त आपल्याला भारतीय संतांच्या विचारांची नितांत गरज आहे. संतांच्या शिकवणीतील करुणा, क्षमा, समता आणि बंधुभाव हेच मानवाच्या अस्तित्वाचे आणि जगाच्या कल्याणाचे एकमेव औषध आहे.म्हणून आजच्या या दिनानिमित्त केवळ सहानुभूती दाखवण्याऐवजी, आपल्या कृतीतून मानवातेचा हा दीप तेवत ठेवण्याचा संकल्प करूया!



