मराठवाडा मुक्तीलढ्याचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे मेघा सूर्यवंशी

लातूर, ‘जो इतिहास वाचतो, त्याचे स्मरण करतो तो नक्कीच इतिहास घडवतो’ या उक्तीप्रमाणे भारतीय स्वातंत्र्यलढ्यानंतर मराठवाड्यातील जनतेचा दुसरा स्वातंत्र्यलढा अर्थात ‘मराठवाडा मुक्ती लढा.’ या लढ्याचा धगधगता इतिहास हा नव्या पिढीला कळला पाहिजे तरच त्यांच्यामध्ये खरी देशभक्ती निर्माण होईल असे मत श्री केशवराज माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती मेघा सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.येथील श्री केशवराज मा.विद्यालयात दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित केलेल्या *मराठवाडा मुक्ती दिन* कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी ७.४० वाजता अर्थ समिती सदस्य नरेंद्र पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर आयोजित प्रकट कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती मेघा सूर्यवंशी बोलत होत्या. यावेळी मंचावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय गुरव,श्री केशवराज शैक्षणिक संकुलचे कार्यवाह शैलेश कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष गंगाधर खेडकर, अर्थसमिती सदस्य नरेंद्र पाठक, मुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे, उपमुख्याध्यापक तथा विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे,श्री केशवराज प्रा. विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे, माजी विद्यार्थी अशोकराव पाटील हरंगुळकर, माजी विद्यार्थी डॉ.अभय देशपांडे, सेवानिवृत्त शिक्षक विलास आराध्ये यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मेघा सूर्यवंशी यांनी १५ आॕगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतरही संस्थानिकांच्या अडमुठी धोरणामुळे त्यांनी स्वतंत्र भारतात विलीन न होण्याचा घेतलेला निर्णय,नंतर त्यांच्यापैकी बरीच संस्थांने स्वतंत्र भारतात विलीन झाली; पण राहिलेल्या हैदराबाद संस्थांनाच्या विलीनीकरणाचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, निजामाने निर्माण केलेली *रझाकार* ही संघटना, या संघटनेचा क्रूर नेता कासीम रझवी, त्यांने मराठवाड्यातील जनतेवर विशेषतः लातूर जिल्ह्यातील जनतेवर केलेले अन्याय अत्याचार, निजामाच्या गुलामीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे,देविसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनतेने दिलेला तीव्र लढा आणि त्यातून १३ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारने हस्तक्षेप करून केलेली लष्करी कारवाई, त्यानंतर चारच दिवसात म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने पत्करलेली शरणांगती व मराठवाडा मुक्त झाल्याची घटना या मुद्द्यांवर आपल्या ओघवत्या शैलीतील वक्तृत्वातून मेघा सूर्यवंशी यांनी अक्षरश: हैदराबाद मुक्तिसंग्राम उपस्थितांच्या डोळ्यासमोर उभा केला. तसेच आज दि.१७ सप्टेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती असल्यामुळे प्रबोधनकार ठाकरे यांची पत्रकारिता, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांचे सामाजिक कार्य यावरही मेघा सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला..
शाळेतील बलोपासक मंडळाच्या वतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम प्रमुख प्रल्हाद माले यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संगीता लोखंडे यांनी केले. अथर्व टिंबे यांच्यासह सामूहिक कल्याणमंत्राने या कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे,उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे,पर्यवेक्षिका राजश्री कुलकर्णी, इंदू ठाकूर, अंजली निर्मळे,पर्यवेक्षक धनंजय कुलकर्णी, राम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सुनिता बनसोडे, सहप्रमुख बालासाहेब करपुडे, बलोपासक मंडळ प्रमुख प्रयागराज गरुड,तसेच बलोपासक मंडळातील सर्व सदस्य,अन्य व्यवस्था प्रमुख शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



