Memory

कारगिल: शौर्य, त्याग आणि विजयाची अजर-अमर काव्यगाथा

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या, पांढऱ्याशुभ्र बर्फाच्छादित शिखरांच्या अथांग रांगा… जिथे निसर्गाचे सौंदर्य जितके विलोभनीय आहे, तितकीच तिथली थंडी आणि भौगोलिक परिस्थिती जीवघेणी आहे. याच लडाखच्या दुर्गम आणि उंच पर्वतरांगांवर, सन १९९९ च्या उन्हाळ्यात भारताच्या अस्मितेची आणि सार्वभौमत्वाची एक अत्यंत खडतर परीक्षा पाहणारा इतिहास घडला, ज्याला आपण ‘कारगिल युद्ध’ या नावाने ओळखतो.

हा केवळ दोन देशांमधील सीमावाद नव्हता, तर तो भारतीय जवानांच्या अतुलनीय पराक्रमाचा, धैर्याचा आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेमाचा एक सुवर्णध्याय होता.

कारगिल युद्धाची पार्श्वभूमी:

विश्वासाला लागलेला धडाका ,१९९८ च्या उत्तरार्धात दोन्ही शेजारी देशांनी अणू चाचण्या यशस्वी करून दक्षिण आशियातील सामरिक समीकरणे बदलून टाकली होती. अशा वातावरणात, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लाहोरला भेट देऊन शांततेचा आणि मैत्रीचा हात पुढे केला होता. एका हाताने शांततेचा संदेश दिला जात असतानाच, दुसऱ्या हाताने पाठीत खंजीर खुपसण्याची कुटिल रणनीती पाकिस्तानी सैन्याने आखली होती.
​पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैनिकांनी आणि लढाऊ भाडोत्र्यांनी, हिवाळ्यात भारतीय सैन्य मागे हटण्याच्या परंपरेचा गैरफायदा घेतला. द्रास, मश्को, बटालिक आणि कारगिल परिसरातील हजारो फूट उंच शिखरांवर भारतीय लष्कराच्या नकळत ताबा मिळवला. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर ताबा मिळवून लडाखचा भारताच्या मुख्य भूमीशी असलेला संपर्क तोडणे हा त्यांचा मुख्य हेतू होता.

जेव्हा भारताला या घुसखोरीची माहिती मिळाली, तेव्हा संपूर्ण देश सुन्न झाला. उंचावर बसलेल्या शत्रूवर मात करणे, जिथे श्वास घेणेही कठीण होते, हे एखाद्या आत्मघाती मोहिमेसारखे होते. पण भारतीय सैनिकांनी अशक्यप्राय वाटणारी ही मोहीम आपल्या अंगावर घेतली.

टायगर हिल आणि तोलोलिंगची लढाई:

कॅप्टन विक्रम बात्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, रायफलमन संजय कुमार आणि अशा शेकडो वीर योद्ध्यांनी प्राणांची बाजी लावून एक-एक इंच जमीन शत्रूच्या तावडीतून मुक्त केली.
​’ये दिल मांगे मोअर!’ म्हणत हसतमुहने गोळ्या झेलत शत्रूच्या छाताडावर तिरंगा फडकवणारे योद्धे म्हणजे भारतीय सैन्याचा खरा आत्मा होते.
​वायुदलाचे सामर्थ्य:
‘ऑपरेशन सफेद सागर’ अंतर्गत भारतीय वायुदलाने मिग-21,23,27, आणि मिराज २००० लढाऊ विमानांच्या साहाय्याने डोंगरमाथ्यावरील शत्रूचा तळ उद्ध्वस्त केला.

युद्धाचे परिणाम आणि पाकिस्तानची मानहानी

​सुमारे दोन महिने चाललेल्या या युद्धात भारताने आपले ५२७ शूर वीर पुत्र गमावले, तर 1363 हून अधिक जवान गंभीर जखमी झाले. परंतु, भारतीय सैनिकांच्या या अफाट शौर्यापुढे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली.
​या युद्धाने जगाला पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवून दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडला. पाकिस्तानच्या या रणनीतिक अपयशामुळे तिथे मोठी राजकीय उलथापालथ झाली आणि जनरल मुशर्रफ यांनी देशाची सत्ता बळकावली.
भारताला झालेले सामरिक आणि धोरणात्मक फायदे

​कारगिल युद्धाने भारताला दुःखाचे अनेक प्रसंग दिले, पण सोबतच भविष्यकाळात अधिक सक्षम बनण्यासाठी काही मोलाचे धडे आणि सामरिक फायदेही दिले:
​सीमा सुरक्षा आणि पकड मजबूत: नियंत्रण रेषेवर (LoC) भारताची गस्त आणि पाळत अधिक तीव्र झाली. सामरिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या प्रत्येक शिखरावर आता भारताचा अखंड पहारा असते.
​सैनिकी आधुनिकीकरण: युद्धानंतर भारतीय सैन्याला पर्वतीय युद्धासाठी लागणारी आधुनिक शस्त्रे, रात्रदृष्टी उपकरणे (Night Vision Devices) आणि दारूगोळा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आला.
​संरक्षण सुधारणा (Kargil Review Committee): देशाच्या सुरक्षा यंत्रणेत मोठे आमूलाग्र बदल करण्यात आले. ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ (NSA) आणि अलीकडच्या काळातील ‘चिफ ऑफ डिफेंस स्टाफ’ (CDS) यांसारख्या उच्चस्तरीय पदांची निर्मिती याच युद्धाच्या परिणामातून झाली, ज्यामुळे तिन्ही सेनादलांमध्ये उत्तम समन्वय निर्माण झाला.
​जागतिक पातळीवर भारताचा सन्मान: भारताने आंतरराष्ट्रीय सीमेचे (LoC) उल्लंघन न करता, अत्यंत संयमाने आणि जबाबदार राष्ट्राची भूमिका पार पाडत शत्रूला हुसकावून लावले. यामुळे जागतिक राजकारणात भारताची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा अनेक पटींनी उंचावली.

​२६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध समाप्त झाले आणि तिरंगा पुन्हा एकदा त्या उंच शिखरांवर अभिमानाने फडकला. कारगिल हे केवळ एका युद्धाचे नाव नाही, तर ती निष्ठा, पराक्रम आणि बलिदानाची एक अशी कविता आहे, जिची प्रत्येक ओळ भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाचे स्फुल्लिंग चेतवत राहते.
​देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या त्या अमर हुतात्म्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐💐! त्यांचे हे बलिदान येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/