प्रतिकूल परिस्थितीवर जो मात करतो तोच खरं नेतृत्व करू शकतो: प्रा.शिवशंकर पटवारी

लातूर दि. ८ : “जो प्रतिकूल परिस्थितीवर मात करतो तोच कोणत्याही क्षेत्रातलं यशस्वी नेतृत्व करू शकतो” असे मत प्रा.शिवशंकर पटवारी यांनी व्यक्त केले.लातूर येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर लातूर येथे आयोजित केलेल्या विद्यार्थी नेतृत्व गुण विकास शिबिरात उद्घाटनपर सत्रात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री केशवराज माध्यमिक विद्यालय शालेय समिती अध्यक्ष मा.श्री गंगाधर खेडकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा.श्री संजय गुरव, केंद्रीय विद्यासभा संयोजक मा.श्री महेश कस्तुरे,शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री शैलेंद्र कंगळे, शिबीर निरीक्षक श्रीमती लक्ष्मी चव्हाण यांचीही मंचावर उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रा.पटवारी म्हणाले की आज प्रत्येक क्षेत्रात चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. लातूर सारख्या शहरात फक्त शैक्षणिक टक्केवारीला महत्त्व दिलं जातं अशा ठिकाणी श्री केशवराज विद्यालयाच्या वतीने असे नेतृत्व गुण शिबीर आयोजित करून इथे विद्यार्थ्यांना नेतृत्वाचेही धडे दिले जातात हे शाळेचे आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे वेगळेपण आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यामधील नेतृत्व फुलवताना आपल्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या कला गुणांचा विकास करावा. मोबाईलचा नियंत्रित वापर करावा असे मत यावेळी प्रमुख अतिथी प्रा.पटवारी यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप करताना कार्यक्रमाध्यक्ष मा.श्री गंगाधर खेडकर म्हणाले,की या शिबिरात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वाचे गुण अंगी आहेत म्हणूनच यांना इथे सहभागी होता आले आहे.यापुढे या विद्यार्थ्यातील नेतृत्व विकसित करावयाचे असेल तर या विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व, कर्तृत्व व दातृत्व या गुणांचाही विकास झाला पाहिजे.नेतृत्व हे कुठे बाजारात विकत मिळत नाही, भाड्याने आणता येत नाही.म्हणून हे नेतृत्व स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने प्राप्त करावे लागते असे मत श्री खेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.यशस्वी नेतृत्वाबद्दल बोलताना खेडकर म्हणाले,की जे नेतृत्व सर्वांना बरोबर घेऊन काम करतं तेच नेतृत्व यशस्वी होत असते असेही मत श्री खेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिबीर स्थळी मान्यवरांच्या हस्ते पाच वृक्षांचे वृक्षारोपण करून या शिबिराची सुरूवात करण्यात आली. या शिबिराच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक अभ्यास पूरक मंडळ प्रमुख श्रीमती सुनिता बनसोडे यांनी केले. तर कु. भक्ती गरड व कु.मधुरा बाशिंगे या दोन विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट असे सूत्रसंचालन केले. वैयक्तिक पद्य कु. आराध्या आदिनाथ कदम हिने सादर केले.श्री संतोष बीडकर यांनी सांघिक पद्य म्हटले. या उद्घाटन सत्राच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री कुलकर्णी,श्रीमती इंदू ठाकूर, श्रीमती अंजली निर्मळे,पर्यवेक्षक श्री धनंजय कुलकर्णी,श्री राम जोशी, शिबीर प्रमुख श्रीमती अर्चना ठोंबरे व सहप्रमुख श्रीमती कांचन तोडकर तसेच शिबिराच्या व्यवस्थेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



