Special Story

यशवंतराव होळकर तीसरे, होळकर राज घराण्याचे नवे उत्तराधिकारी

Sunday special

होळकर राज घराण्याचे नवे उत्तराधिकारी यशवंतराव होळकर तीसरे यांचा 26 मार्च, 2026 रोजी उत्तराधिकारी म्हणून समारंभ पार पडला. 16 मार्च, 2026 रोजी होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांची 333 वी जयंती झाली. त्या औचित्यावर होळकर राज घराण्याचा उत्तराधिकारी घोषित झाला आहे. यशवंतराव होळकर तृतीय हे उत्तराधिकारी झाले आहेत त्यानिमित्ताने या ऐतिहासिक राजघराण्यातील घडामोडीचा परिचय तिला आहे राजेश खनके यांनी


इंदूरच्या ऐतिहासिक राजवाडा येथील मल्हारी मार्तंड मंदिरात हा उत्तराधिकारी सोहळा पार पडला, यावेळी शतकानुशतके जुनी होळकर राजघराण्याची गौरवशाली परंपरा पुन्हा एकदा जीवंत झाली. या सोहळ्याद्वारे त्यांची बहीण सबरीना राजे यांना ‘राजकुमारी’ ही उपाधी देण्यात आली. याप्रसंगी होळकर राज्यातील सरदार, दरकदार, पागनीस, फडणीस आणि राज पुरोहित असलेल्या घराण्याचे वारसदार पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते.
होळकर राज घराण्याच्या विद्यमान महाराणी उषादेवी होळकर आहेत. सध्या उषादेवी यांचे वाढते वय आणि घराण्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी अधिकृत वारसदार घोषित करण्याची त्यांना गरज वाटली. त्याचा परिणाम म्हणून आपल्या भावाचा मुलगा यशवंतराव होळकर तृतीय यांना वारस म्हणून त्यांनी घोषित केले आहे. आजच्या स्थितीत उत्तराधिकारी सोहळा हा इंदूरच्या होळकर राजघराण्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा अध्याय आहे.
होळकर राज्य- १७३१ मध्ये माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या होळकर घराण्याची सत्ता स्थापन केली होती. मल्हारराव यांच्या नंतर लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या साम्राज्याचा विस्तार केला आणि राज्याला स्थैर्य मिलवून दिले. अहिल्याबाईंच्या नंतर यशवंतराव होळकर पहिले यांनी मल्हारराव होळकरांचा शौर्याचा वारसा जतन करत स्वत: राज्याभिषेक करुन होळकर राज्याला स्वतंत्र राज्य म्हणून नावारुपाला आणले.
ज्या इंग्रज अधिका-याने नेपोलियन दि ग्रेट याला वाटर्लूच्या युद्धात पराभूत केले, त्याला मात्र भारताच्या भूमीत यशवंतराव होळकरांनी पराभवाचे पाणी पाजले. असा हा पराक्रमी राज पुरूष याच होळकर घराण्यातला. जेंव्हा सारे राजेरजवाडे इंग्रजांना शरण जावून आपले राज्य शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करत होते तेंव्हा यशवंतराव भारतातील विविध राज्यांना इंग्रजांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत होते. पुढे यशवंतरावांच्या जाण्याने होळकर राज्य देखील बाधित झाले आणि इंग्रजांच्या विरोधातील राजशक्ती कमजोर पडली.
स्वातंत्र्यानंतरचे राज घराणे- मल्हारराव होळकर यांनी स्थापन केलेले होळकर राज्य स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झाले. त्यावेळी इंदूरचे शेवटचे अधिकृत शासक महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय होते. त्यांचे राज्य भारतात विलीन झाल्यानंतर तत्कालीन मध्यप्रदेश राज्याचे ते दूसरे राज प्रमुख होते (म्हणजे आजचे राज्यपाल पद). तसेच 1961 पर्यंत ते या होळकर राज्याचे (Titular Head) राजे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रथम पत्नी संयोगिता राजे होळकर यांच्या पोटी जन्मलेल्या कन्या उषा देवी होळकर या राजघराण्याच्या प्रमुख उत्तराधिकारी झाल्या.

उषा देवी होळकर यांची ओळख:
महारानी उषा देवी होळकर या इंदूरच्या १५ व्या महाराणी आणि होळकर राजघराण्याच्या विद्यमान प्रमुख (Titular Head) आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, अनेक राज्ये भारतात विलीन झाली. गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ त्या होळकर राजघराण्याचा वारसा आणि त्यांच्या खासगी मालमत्तांच्या प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राजघराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि अहिल्याबाई होळकर यांच्या समाजसेवेचा वारसा आधुनिक काळातही सक्षमपणे चालवण्यासाठी महारानी उषा देवी यांनी यशवंतराव होळकर तृतीय यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली असल्याचे वसियतनाम्यात म्हटले आहे.
युवराज यशवंतराव होळकर तृतीय कोण आहेत ?
उत्तराधिकारी घोषित केलेले यशवंतराव होळकर तृतीय हे इंदूरच्या ऐतिहासिक होळकर राजघराण्याचे वंशज आहेत. उषा देवी होळकर यांचे भाऊ रिचर्ड शिवाजी होळकर यांचे ते चिरंजीव. त्यांच्या आई शालिनी देवी होळकर या मूळच्या अमेरिकेतील असून त्यांनी प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठातून (Stanford University) शिक्षण पूर्ण केले आहे. यशवंतराव यांचा विवाह २०१५ मध्ये नयिका क्रिष्णा यांच्याशी झाला. नयिका या गोदरेज समूहाचे उद्योगपती जमशेत नावरोजी गोदरेज यांच्या भाची अणि गोदरेज यांची बहीन स्मिता क्रिष्णा यांची कन्या आहेत. आज घडीला यशवंतराव होळकर तृतीय हे मराठा शौर्याचा वारसा लाभलेले आणि आधुनिक कॉर्पोरेट जगात महत्त्वाची पदे भूषवणारे एक व्यक्तिमत्व आहेत.
ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन: युवराज यशवंतराव आता ही ऐतिहासिक विरासत आधुनिक पद्धतीने पुढे नेणार आहेत. उत्तराधिकारी म्हणून युवराजांचे मुख्य उद्दिष्ट हेरिटेज कंझर्वेशन (वारसा संवर्धन), ‘रेहवा (REHWA) सोसायटी’च्या माध्यमातून हातमाग उद्योगाला (Maheshwari textiles) चालना देणे आणि लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांनी सुरू केलेली जनहितार्थ कामे आणि खाजगी ट्रस्ट्ची कामे सुरू ठेवणे हे आहे.
अहिल्याबाई होळकर यांनी मागे ठेवलेला वारसा- लोकमाता अहिल्याबाई होळकर (कारकीर्द १७६७–१७९५) यांचा वारसा हा केवळ इंदूरपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अहिल्याबाईंनी आपली राजधानी इंदूरहून नर्मदा नदीच्या काठी असलेल्या महेश्वर येथे हलवली.तिथे त्यांनी आपला राजवाडा आणि अनेक प्रशासकीय इमारती बांधल्या. महेश्वरला एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि व्यापार केंद्र बनवले.आपल्या राज्याबाहेरही संपूर्ण भारतात मंदिरांचा जीर्णोद्धार आणि निर्मिती केली. यात प्रामुख्याने काशी विश्वनाथ (वाराणसी) आणि सोमनाथ यांसारख्या पवित्र स्थळांच्या पुनरुद्धाराचा समावेश आहे.
अहिल्याबाईंनी महेश्वरमधील विणकाम परंपरेला (Maheshwari weaving tradition) मोठे प्रोत्साहन दिले. हा वारसा आजही त्यांच्या वंशजांनी ‘रेहवा (REHWA) सोसायटी’च्या माध्यमातून जपला आहे, त्यामुळे शेकडो विणकरांना, विशेषतः महिलांना रोजगार आणि त्यांचे सक्षमीकरण कार्याला गती मिलालेली आहे. त्या एक न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष शासिका म्हणून ओळखल्या जातात.
अहिल्याबाईंचा हा सेवेचा आणि वारसा जपण्याचा वारसा आजही होळकर राजघराण्याकडून पुढे चालवला जात आहे. उत्तराधिकारी झालेले यशवंतराव होळकर तृतीय यांनी अहिल्याबाईंनी सुरू केलेली जनहितार्थ कामे आणि वारसा संवर्धनाचे (Heritage Conservation) कार्य आधुनिक पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

राजेश खनके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/