Memory

स्मृति कृतिशील ध्यासपर्वाच्या

कठोर परिश्रम आणि बौद्धिकतेच्या जोरावर आपल्याला सातासमुद्रा पार जाता येऊ शकते हा विश्वास विद्यार्थ्यांच्या पंखात बळ देणारा ठरला. लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी आज जगातील अनेक देशात सेवा देत आहेत.त्यांच्या पंखात बळ भरणारे राजर्षी शाहू महाविद्यालय आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे विद्यमान आणि संस्थापक अध्यक्ष माजी खासदार माजी प्रांतपाल एमजेएफ लॉयन डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी अखेरपर्यंत गुणवत्तेचा ध्यास बाळगत, सतत क्रियाशील राहून 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

2018 मधील एका कार्यक्रमाचे निमंत्रण मा. राज्यपाल सी विद्यासागर राव यांना देताना

वास्तविक पाहता त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले त्या त्या क्षेत्रात हिमालयापेक्षाही अधिक उंचीचे काम केले आहे. मग ते आरोग्याचे, शैक्षणिक, राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील असेल.या प्रत्येक क्षेत्रात निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे केलेल्या कार्यातून नावलौकिक वाढवला. त्यांची ही सर्वच सेवा क्षेत्रे केवळ लातूर, मराठवाडा किंवा महाराष्ट्रालाच परिचित आहेत असे नाही तर देशाच्या अनेक भागात त्यांची ओळख वेगवेगळ्या कार्याच्या रुपाने होतच असते. लायन्स क्लबच्या माध्यमातून अंधत्व निवारणाचे कार्य हे तर हिमालयाच्या उंची एवढे आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयात शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी पैशामुळे नव्हे तर त्याच्या गुणवत्तेमुळे शिकेल ,त्यासाठी शिक्षकांनी गुणवत्तेचा ध्यास आणि कास धरावी लागेल असा आग्रह अध्यक्ष म्हणून त्यांनी कायम धरला. म्हणूनच आज शाहू महाविद्यालय हे गुणवत्तेचे महाविद्यालय म्हणून संपूर्ण राज्याला परिचित आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या कवठा सारख्या सामान्य खेड्यात जन्म झालेल्या डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षणाची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून आपली सेवा दिली. येथेच त्यांना कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचे जवळून अवलोकन करता आले .त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी लातूर येथे त्यांच्या नावानेच महाविद्यालय सुरू केले आणि मराठवाड्यातील जनतेला कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचा परिचय करून दिला.

वैद्यकीय अधिकारी म्हणून कुरुंदवाड येथे त्यांनी केलेली सेवा ही मानवतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती. म्हणूनच त्यावेळी कुरुंदवाड नगरपालिकेने एका भव्य अशा सार्वजनिक कार्यक्रमात डॉक्टर गोपाळराव पाटील साहेबांना मानपत्र देऊन सन्मानित केले. त्यांच्या कार्याबद्दलचा हा सन्मान अतिशय महत्त्वाचा वाटत असे, त्यांनी अनेक वेळेला त्या सन्मानाबद्दल खूप अभिमानाने आपले विचार व्यक्त केले होते. त्या सन्मानानंतर त्यांना आयुष्यभर वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल अनेक सन्मान, पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येक पुरस्कारानंतर त्यांच्या कामातील गतिमानता वाढतच गेली.
सन 1965 हा तसा फारसा विकसित नसलेला कालखंड तरीदेखील त्यांनी लातूर सारख्या ठिकाणी बालरोग तज्ञ म्हणून पहिल्यांदा आपली सेवा देण्यास प्रारंभ केला फारशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसलेल्या लातूर सारख्या शहरात रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या काही सहकारी मित्रांसमवेत मोफत सेवा देण्यास देखील त्यांनी सुरुवात केली.
सेवा हा आपला धर्म मानून आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित संघटन असलेल्या लॉयन्स क्लब ची लातूरमध्ये स्थापना करून या क्लबच्या माध्यमातून नेत्रतज्ञ असलेल्या प्रसिद्ध सर्जन डॉक्टर मोदी यांचे अनेक कॅम्प लातूर शहरात आयोजित करून मोतीबिंदू निर्मूलनाचे काम डॉ. गोपाळराव पाटील यांनी हाती घेतले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर नव्हते ,की रुग्णांसाठी पलंग, गाद्या नव्हत्या तर राजस्थानी शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये ऑपरेशन थिएटर तात्पुरते उभारण्यात आले आणि रुग्णांना वर्गखोल्यांमध्ये झोपवण्यात येत. हे कॅम्प कित्येक वर्ष सुरू राहिले. त्यानंतर डॉक्टर दीक्षित यांच्यासोबत हे कॅम्प पुढे सुरूच राहिले. अंधत्व निवारणाच्या या आणि आंतरराष्ट्रीय लॉयन्स क्लबच्या धोरणाच्या अनुषंगाने उदयगिरी आय हॉस्पिटल उभारणीत डॉक्टर गोपाळराव पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि डॉ. गोपाळराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले असून साडेपाच लाख लोकांच्या नेत्र तपासणी करण्यात आल्या आहेत.हे हॉस्पिटल भारतात नाही तर जागतिक पातळीवर अंधत्व निवारणात महत्त्वाचे ठरत आहे.
राजकीय क्षेत्रातील आपले राजकीय प्रतिस्पर्धी कै. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात त्यांनी अनेक लोकसभा निवडणुका लढवल्या परंतु कधी निसटता पराभव आणि कधी आपल्याच पक्षातील लोकांकडून देण्यात आलेली मात यामुळे ते प्रत्यक्ष निवडणुकीत विजय मिळवू शकले नाहीत. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या संसदीय आणि विशेष संसदीय समित्यांमध्ये मोलाचे योगदान देऊन विकासात्मक कार्यात मोठा वाटा उचलला. राजकारणात सक्रिय असूनही कधीही टोकाचा विरोध त्यांनी केला नाही .राजकीय पक्षांचे मतभेद हे असू शकतात मात्र व्यक्ती भेद आणि मनभेद हे असू नये असे त्यांना नेहमी वाटे. म्हणून लातूरच्या राजकारणात एक सुसंस्कृतपणा कायम पाळला गेला.त्यामुळेच त्यांचे काँग्रेसमध्ये असणाऱ्या माजी गृहमंत्री आणि माजी राज्यपाल कै. शिवराज पाटील चाकूरकर आणि राष्ट्रवादीत असणाऱ्या माजी खासदार कै.जनार्दनजी वाघमारे यांच्यासोबत कायम मित्रत्वाचे नाते राहिले.

भालचंद्र ब्लड बँक ,आयएमए, रेड क्रॉस सोसायटी, लायन्स क्लब आणि राजश्री शाहू महाविद्यालय आणि शिक्षणाला आधुनिकतेची जोड देऊन सुरू करण्यात आलेल्या संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे या सर्वच ठिकाणी भरभरून यश प्राप्त झाले आहे. राजर्षी शाहू महाविद्यालय त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मराठवाड्यातील पहिले नॅक मूल्यांकन करणारे आणि ए ग्रेड प्राप्त करणारे पहिले महाविद्यालय ठरले आहे तसेच ते पहिले स्वायत्त महाविद्यालय देखील ठरले आहे.
राजकारणात सुसंस्कृतपणा आणून राजकारणात लातूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या त्रिमूर्ती पैकी ते एक होते राजकारणात समाजकारणात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी त्यांनी कधीही तोल ढळू दिला नाही आणि गुणवत्तेशी कधी तडजोड केली नाही. त्यामुळे त्यांच्या जाण्याने गुणवत्तेचे ध्यास पर्व संपले अशी भावना सर्वसामान्यातून व्यक्त केली जात आहे .अशा उत्तुंग आणि स्फटिकी व्यक्तिमत्वाला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला नाही अशी खंत अनेकांनी यावेळी बोलून दाखवली.
त्यांच्याविषयी कितीही लिहिले तरी ते अपुरे राहील त्यामुळे शब्दांना येथेच विराम देत ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना.🙏🙏🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/