समतेचे ईश्वर हे महात्मा बसवेश्वर

आज अक्षय तृतीया .जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांचा जन्मदिन या निमित्ताने आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏 आपली भरभराट आपली प्रगती ही कायम अक्षय राहो .आपली प्रगती हीच सामाजिक आणि राष्ट्राचे प्रगती असून या प्रगतीत समाजातील अर्धा घटक असणाऱ्या नारीशक्तीला बसवांनानी 12 व्या शतकात पुरुषांबरोबर स्थान देऊन महिलांचा सन्मान केला. आपण आज 21 व्या शतकात देखील महिलांना बरोबरीचे स्थान देत नाहीत .वास्तविक महिला या प्रत्येक परिवारातील विकासाचा विचार आचार असतो.
महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकात दिलेल्या विचारांची आजही समाजातला राष्ट्राला किती गरज आहे हे तीव्रतेने दिसून येते. जनसामान्यांना सहज साधी शिकवण देवून संसारी माणसाला साध्या पध्दतीने जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान त्यांनी प्रदान केले. स्त्रियांना पुरुषांबरोबर समान अधिकार देवून त्यांचे समाजातील स्थान उंचावले. त्यांनी पंचसूतके पाहू नका. दलितांना समान संधी द्या, जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका, स्वकष्टावर जगा, भिक्षा मागून खाऊ नका, काम कष्ट करा, कायकात कैलास आहे, दासोह हे समाजसेवा आहे दिलेले हे विचार कालातीत वाटतात. शेकडो वर्षानंतरही हे प्रश्न अद्यापही मोठ्या प्रमाणात तसेच असल्याचे दिसून येतात.म्हणून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची कास ही खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायप्रस्थापित करण्यासाठीचा महामार्ग ठरणार आहे.
भारतीय सामाजिक इतिहासात जे अनेक प्रश्न होते आणि आजही आहेत त्यात स्त्री-पुरुष समानतेचा प्रश्न अत्यंत जटिल आणि महत्त्वाचा राहिला आहे. आधुनिक काळात स्त्रीवाद ही स्वतंत्र वैचारिक चळवळ म्हणून विकसित झाली; मात्र मध्ययुगीन काळातील काही विचारवंतांनी स्त्री-सन्मान व समानतेचा पुरस्कार केला होता. १२व्या शतकातील कर्नाटकातील समाजसुधारक बसवेश्वर यांनी जातिभेद, लिंगभेद व कर्मकांडांविरुद्ध आवाज उठवून स्त्रियांना धार्मिक व सामाजिक क्षेत्रात समान स्थान दिले. महात्मा बसवेश्वर हे शैवधर्माचे पुनरुज्जीवन करणारे महान विभूती होते .कर्नाटक ही त्यांची कर्मभूमी होती त्यांनी धार्मीक , सामाजिक ,तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात केलेले कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे होते बसवेश्वर ही मध्ययुगातील भारताच्या साहित्यिक,सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील व राजकीय जीवनातील ज्येष्ठ समाज सुधारक परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून त्यांची ओळख आहे. समाज सुधारकांच्या यादीतील त्यांचे नाव अग्रभागी आहे म्हणून त्यांना आद्य भारतीय समाजसुधारक क्रांतीज्योती असे देखिल संबोधले जाते. त्यांनी हिंदू धर्मातील जात व्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथे विरुद्ध संघर्ष केला. निर्गुण निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या आणि धार्मिक जागृतीच्या संदर्भात महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणूकीला विशेष महत्त्व आहे.
संत महात्मा बसवेश्वर एक द्रष्टे सुधारक होते. आपल्या समाज परिवर्तनाच्या विचारांचा प्रसार आणि समाजाच्या कल्याणकारी योजना प्रत्यक्ष राबविण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. आपल्या सामाजिक व धार्मिक व्यवस्थेची रचना करताना समाजात अस्तित्वात असणा-या बंडखोर सांस्कृतिक परंपरांचा त्यांनी आधार घेतला. महात्मा बसवेश्वरांचे श्रमप्रतिष्ठा हे सर्वश्रेष्ठ मूल्य मानले जाते, उद्योगातील श्रेणी पध्दतीवर प्रहार करत मजूर किंवा श्रमिकांना अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, शिक्षण आणि आध्यात्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने धार्मिक व सामाजिक अधिकार दिले, बालविवाह आणि सतीसारख्या प्रथांना विरोध केला, तसेच ‘अनुभव मंटप’ मध्ये स्त्रियांना (उदा. अक्का महादेवी) समान स्थान देऊन समताधिष्ठित समाज निर्माण केला.बसवेश्वरांनी स्त्री आणि पुरुष यात कोणताही भेद मानला नाही. दोघांनाही आत्मविकासाचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा समान अधिकार आहे, तत्कालीन समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते, ज्याला त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्रीला ‘शूद्र’ मानण्याची मानसिकता त्यांनी नाकारली आणि त्यांना समाजात सन्मानजनक स्थान मिळवून दिले
त्यांनी स्त्रियांना ‘इष्टलिंग’ धारण करण्याचा आणि अनुभव मंटपमध्ये धार्मिक चर्चा व वचन रचनेत भाग घेण्याचा अधिकार दिला. अक्का महादेवी, मुक्ताक्का, सती नीलम्मा यांसारख्या अनेक शरणी (महिला संत) त्यांच्या विचारांमुळेच प्रगल्भ झाल्या. बसवेश्वरांनी बालविवाह, सतीप्रथा, केशवपन आणि मासिक पाळीबाबतचे गैरसमज यांसारख्या स्त्रीविरोधी परंपरांचा तीव्र विरोध केला . स्त्रियांनी केवळ चूल आणि मूल यात अडकून न राहता शिक्षण घ्यावे आणि स्वावलंबी बनावे, यावर त्यांचा भर होता . त्यांचे प्रसिद्ध वचन
“लिंगभेद नाही, वर्णभेद नाही,
सर्वजण समान”
“बसवेश्वरांनी अनेक पातळीवर सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणेचं काम केलं आहे. पण त्यांचं चरित्र पाहिलं तर त्यांच्या कामाची सुरूवातच महिला स्वातंत्र्याच्या गप्पा प्रेरणेतून झाली असल्याचं दिसून येतं,
बहिणीला समान हक्क नाही म्हणून बसवेश्वरांनी मुंज नाकारली होती आणि इथूनच त्यांच्या क्रांतिकारी विचाराची सुरुवात झाली. बसवण्णांनी मंगळवेढा येथे “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली.बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक , समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते.सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवात ही म.बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अनूभव मंटपाच्या माध्यमातून केल्याचे वचनसाहित्यातून दिसून येते.एकूणच त्यांनी वचनसाहित्यात समता,मूल्य,न्याय,बंधूता,एकात्मता तसेच स्वातंत्र्य,अधिकार ,नियंत्रण व शिस्त,सूशासन आणि प्रशासन आदी बाबींवर सखोल विवेचन केले आहेत.सद्यस्थितीत शासन व प्रशासनाला या विचारांचा अवलंब केल्यास निश्चितच देशात निर्माण होणारी विषमता,हिंसा ,भेदभाव व जातीय राजकारण इ.समस्यावरआळा घालता येईल.परिणामतः चांगले सुशासन व प्रशासन व्यवस्था निर्माण होइल.
या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी “अनुभव मंडप ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.
प्रत्येक माणसाला धार्मिक जीवन जगण्याची समान संधी मिळावी. त्या धार्मिक जीवनात जन्म, जात, व्यवसाय, स्त्री-पुरुष म्हणून भेदभाव केला जाऊ नये.बसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असे.स्त्रियांना वेदांचा अधिकार नाकारला जात असताना, बसवेश्वरांनी स्त्रियांना ‘लिंगदीक्षा’ देऊन देवाच्या पूजेचा व आत्मज्ञानाचा अधिकार दिला. स्त्रियांनी केवळ घरगुती कामात न अडकता त्यांनी सुशिक्षित व्हावे आणि अध्यात्मिक प्रगती करावी, असे त्यांचे मत होते. स्त्रियांना गुलाम समजणाऱ्या, विधवा पुनर्विवाहाला विरोध करणाऱ्या आणि बालविवाह लादणाऱ्या सनातनी प्रथेविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. स्त्रियांची अशुद्धतेच्या कल्पनेतून आणि पंचसुतका पासून सुटका केली.
महात्मा बसवेश्वरांनी स्त्रीला “शूद्र” समजणाऱ्या तत्कालीन समाजाला “स्त्री ही पुरुषाची अर्धांगिनी आणि समान हक्कांची मानकरी” आहे, हा विचार दिला.बसवेश्वरांचे स्त्रीविषयीचे विचार हे स्त्रीला केवळ ‘वस्तू’ किंवा ‘दासी’ न मानता एक ‘समसमान व्यक्ती’ म्हणून पाहणारे आणि त्यांना सन्मान देणारे होते. स्त्री जातीने अधिकार उपभोगण्यापेक्षा कर्तव्य पार पाडावीत अशी अपेक्षा धर्मग्रंथांनी व्यक्त केली होती स्त्री जातीची वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक मानसिक जडणघडण व्हावी असा वेगळा विचार धर्मग्रंथांनी केलेला नव्हता म्हणूनच पुरुषांनी लिहिलेल्या धर्मग्रंथांनी स्त्रियावर अन्याय केलेला आहे असे मत महात्मा बसवेश्वर यांचे होते
स्त्री स्वातंत्र्याचा आद्य विचार मांडणारे त्याची अंमलबजावणी करणारे थोर समाज सुधारक, समता नायक , जगतज्योती ,12 व्या शतकातील आद्य भारतीय समाजसुधारक अशी ओळख असणारे महात्मा बसवेश्वर यांना त्रिवार वंदन .

दयानंद कला महाविद्यालय लातूर



