गर्भाशय मुखाचा कर्करोग : कसे वाचतील महिलांचे प्राण

महिलांचे दुखणे हा न उकलणारा आणि न माहीत होणारा एक प्रकारचा आजाराच होय. अलीकडे आधुनिक जीवन पद्धतीने कॅन्सर सारख्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर होणाऱ्या संशोधनाने निर्माण केलेल्या लसीमुळे कॅन्सरवर मात करणे ही सुलभ झाले आहे. यावर प्रकाश टाकला आहेस स्मिता लोणेरे यांनी
“मला काही स्त्रास नाही मग तपासणी कशाला करायची?” असे म्हणणाऱ्या एका 35 वर्षाच्या महिलेने पांढरा स्त्राव आणि थोडासा रक्तस्त्राव होत असूनही सुरुवातीला दुर्लक्ष केले. काही महिन्यांनी त्रास वाढल्यावर ती डाॅक्टरांकडे गेली तेव्हा तिला गर्भाशय मुखाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. वेळेवर तपासणी केली असती तर हा आजार टाळता आला असता. अशी अनेक उदाहरणे आपल्या समाजात पाहायला मिळतात.
आजच्या काळात महिलांच्या आरोग्यासमोर अनेक समस्या उभ्या राहत आहेत. त्यामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार मानला जातो, भारतामध्ये अनेक महिलांना या आजाराची माहिती नसल्यामुळे तो उशीरा माहीती होतो . परंतु योग्य वेळी तपासणी, योग्य उपचार आणि जनजागृती केल्यास हा आजार टाळता येऊ शकतो.
गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे काय ?
गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशय मुख (cervix ) असे म्हणतात. या भागातील पेशींमध्ये असामान्य बदल होऊन कर्करोग तयार होतो , त्याला गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणतात हा आजार अचानक होत नाही. तो हळूहळू अनेक वर्ष वाढत असतो. त्यामुळे वेळेवर तपासणी केल्यास हा आजार सुरुवातीलाच ओळखता येतो.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे निर्माण होणारे धोके:
जर गर्भाशय मुखाचा कर्करोग वेळेवर ओळखला गेला नाही तर तो गंभीर स्वरूप धारण करतो. जास्त रक्तस्ताव झाल्यामुळे शरीरातील रक्त कमी होणे, दुर्गंधीयुक्त स्त्राव, शरीरात संसर्ग होणे, अशक्तपणा येणे, वजन कमी होणे , लघवी व शौचास त्रास होणे, खालच्या पोटात, कंबरेत आणि पायात सतत् वेदना होणे, शरीर कमकुवत होणे , कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरतो जसे मुत्राशय, गुदाशय आणि शरीरातील इतर भागांमध्ये पसरू शकतो आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
या कर्करोगाचा धोका कुणाला जास्त असतो :
काही महिलांना या कर्करोगाचा धोका जास्त असतो. जसे की लहान वयात लग्न झालेल्या महिला, अनेक वेळा गर्भधारणा झालेल्या महिला, वैयक्तिक स्वच्छतेची कमतरता असलेल्या महिला, 30 पेक्षा जास्त वयाच्या महिला, अनेक लैंगीक जोडीदार असलेल्या महिला, नियमित तपासणी न करणा-या महिला, धुम्रपान करणा-या महिलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय HPV संसर्ग झाल्यास हा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आणि दुष्परिणाम:
गर्भाशय मुखाचा कर्करोग वेळेवर ओळखला नाही तर महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. सुरूवातीला हा आजार जास्त त्रास देत नाही. पण पुढे काही लक्षणे दिसू लागतात. जसे कि पांढरा, दुर्गंधी युक्त स्त्राव येणे असामान्य रक्तस्त्राव होणे , संभोगानंतर रक्त येणे, पोटदुखी किंवा कंबरदुखी होणे, शरीर कमकुवत होणे आणि वजन कमी होतो. जर या लक्षणांकडे कडे दुर्लक्ष केले तर आजार गंभीर होऊ शकतो.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी:
गर्भाशय मुखाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी (Pap smear test) पॅप स्मिअर तपासणी, (VIA) व्ही. आय. ए. तपासणी केली जाते. या तपासणीमुळे करोगाची सुरुवातीची चिन्हें ओळखता येतात. सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही तपासणी मोफत केली जाते.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे उपचार:
हा आजार सुरूवातीच्या टप्प्यात आढळल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्यानुसार शस्त्रक्रिया रेडीएशन , किमोथेरपी औषधोपचार किंवा इतर उपचार केले जातात, त्यामुळे महिलांनी नियमित तपासणी करावी.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध:
गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी काही सोप्या गोष्टींची काळजी घ्यावी. वैयक्तिक स्वच्छता, राखावी, नियमित आरोग्य तपासणी करावी, कमी वयात लग्न करणे टाळावे, अनेक गर्भधारणा टाळाव्यात आरोग्याबद्दल जागरुकता वाढवणे ,तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य वयात HPV लस घ्यावी, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घ्यावा ज्यामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करता येतो.
HPV लसीकरणाचे महत्व :
गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रामुख्याने HPV संसर्गामुळे होतो. ही लस शरीरात विषाणू विरुद्ध संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती निर्माण करते. ही लस कर्करोग होण्यापूर्वीच संरक्षण देते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलीचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी ही उस देऊन तिचे भविष्यातील कर्करोगा पासून संरक्षण करावे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची गंभीरता ओळखून महाराष्ट्र सरकारने 8 मार्च 2026 पासून एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे.
वैज्ञानिक आढाव्यानुसार, HPV लसीचा वंध्यत्व ,गर्भपात यांच्याशी कोणताही संबंध नाही.जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. त्यामुळे एच पी व्ही लसीकरण मोहिमेअंतर्गत वयाची 14 वर्षे पूर्ण केलेल्या परंतू 15 वर्ष पूर्ण न केलेल्या राज्यातील मुलींना एचपीही लस देण्याचे करावे .जगभरात आतापर्यंत 50 कोटी हुन अधिक मुलींना ही लस देण्यात आली आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा गंभीर असला तरी योग्य माहिती , वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि एच पी व्ही लसीकरण यामुळे हा आजार मोठ्या प्रमाणात टाळता येतो. प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि इतर महिलांनाही याबद्दल जागरूक करावे. लक्षात ठेवा – वेळेवर तपासणी आणि एच पी व्ही लसीकरण केल्यास जीव वाचू शकतो.
HPV लस आणि वंध्यत्व (Infertility) यांचा संबंध जोडणाऱ्या अनेक अफवा अधूनमधून पसरत असतात. मात्र, वैद्यकीय विज्ञान आणि जागतिक स्तरावर झालेल्या मोठ्या अभ्यासांनी हे स्पष्ट केले आहे की, HPV लसीचा मुलांच्या किंवा मुलींच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.
या विषयावर झालेल्या प्रमुख अभ्यासांचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत:
प्रजनन क्षमतेवर सकारात्मक परिणाम
अनेक अभ्यासांत असे दिसून आले आहे की, ही लस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रजनन क्षमता राखण्यास मदत करते:
संसर्गापासून संरक्षण: जर एखाद्या महिलेला HPV चा संसर्ग झाला आणि त्यातून ‘प्रिकॅन्सरस’ पेशी तयार झाल्या, तर त्यावर शस्त्रक्रिया करावी लागते (उदा. LEEP प्रक्रिया). अशा शस्त्रक्रियांमुळे गर्भाशयाच्या मुखाला इजा होऊन भविष्यात गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. लस घेतल्यामुळे असा संसर्गच होत नाही, ज्यामुळे प्रजनन आरोग्य सुरक्षित राहते.
पुरुषांमधील परिणाम: पुरुषांमध्ये HPV संसर्गामुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. लसीकरणामुळे हे धोके टाळता येतात.
अमेरिकेतील CDC आणि मोठ्या संस्थांचे संशोधन
अमेरिकेतील साधारण २ लाख महिलांवर केलेल्या एका मोठ्या अभ्यासात असे आढळले की, ज्यांनी लस घेतली होती आणि ज्यांनी घेतली नव्हती, त्यांच्या ‘प्रायमरी ओव्हेरियन इनसफिशिअन्सी’ (POI – लवकर रजोनिवृत्ती येणे) च्या प्रमाणात कोणताही फरक नव्हता.
CDC (Centers for Disease Control and Prevention) ने स्पष्ट केले आहे की, लस घेतल्यामुळे वंध्यत्व येत असल्याचा कोणताही पुरावा जगात कुठेही मिळालेला नाही.
गर्भधारणेदरम्यान सुरक्षितता
जरी ही लस गर्भधारणेदरम्यान घेण्याचा सल्ला दिला जात नाही, तरीही जर एखाद्या महिलेने चुकून लस घेतल्यानंतर ती गरोदर असल्याचे समजले, तर अशा प्रकरणांमध्येही बाळावर किंवा गर्भधारणेवर कोणताही वाईट परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही.
जगभरातील तज्ज्ञांचे मत
लसीतील घटक: या लसीमध्ये मृत विषाणूचे कण नसून केवळ विषाणूच्या आवरणासारखे प्रथिने (Proteins) असतात. हे प्रथिने शरीरातील कोणत्याही पुनरुत्पादन अवयवांना किंवा संप्रेरकांना (Hormones) बाधा पोहोचवत नाहीत.
खोटा प्रसार: वंध्यत्वाचा मुद्दा हा प्रामुख्याने चुकीच्या माहितीमुळे (Misinformation) चर्चेत आला होता, ज्याला कोणत्याही वैज्ञानिक अभ्यासाचा आधार नाही.
निष्कर्ष:
उलटपक्षी, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो आणि त्याच्या उपचारांमुळे मुलांमधील अडचणी वाढू शकतात. त्यामुळे ही लस भविष्यातील आरोग्य आणि सुरक्षित मातृत्व यासाठी एक “सुरक्षा कवच” मानली जाते.

DHPE student
NIPHTR Mumbai


