लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला!

लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक, बालरोगतज्ज्ञ आणि माजी खासदार आदरणीय डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने केवळ लातूर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
डॉ. गोपाळराव पाटील यांनी वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून जनसेवा करतानाच, शिक्षणाचे महत्त्व ओळखून लातूरमध्ये शिवछत्रपती शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालील राजर्षी शाहू महाविद्यालयाने ‘लातूर पॅटर्न’च्या माध्यमातून राज्याला आणि देशाला अनेक गुणवंत विद्यार्थी दिले. लातूरची शैक्षणिक ओळख राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
राज्यसभेचे सदस्य म्हणून काम करताना त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वपूर्ण समित्यांवर आपल्या अभ्यासू वृत्तीचा ठसा उमटवला. एक मृदूभाषी, संयमी आणि विकासाची दृष्टी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील.
डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनामुळे आपण एका मार्गदर्शकाला मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
विनम्र अभिवादन!
-ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
पालकमंत्री, लातूर जिल्हा.
त्यांच्या पार्थिवावर आज 21 एप्रिल रोजी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार होतील.
*स्थळ : शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे क्रीडा मैदान, नवीन एमआयडीसी, संत तुकाराम शाळेजवळ, लातूर*



