लेख / काव्य

शेतकरी आत्महत्येवर माजी आमदार प्रा शरद पाटलांचे संशोधन

खानदेशातील एक धडाडीचे व्यासंगी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हे खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्रात अधिक रममान होतात. त्यामुळेच सामाजिक समस्या असलेल्या शेतकरी आत्महत्या संदर्भात एका राजकीय व्यक्तीने सामाजिक भूमिकेतून केलेले संशोधन हे या प्रश्नाच्या उत्तरार्थ निश्चित दिशा देण्याचे कार्य करेल त्यांचे खूप खूप अभिनंदन.

माजी आमदार प्रा शरद पाटील

माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना “धुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या: एक अध्ययन. (संदर्भ – २०१० ते २०१९ दरम्यान झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या)” या विषयावरील प्रबंधाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते प्रा. शरद पाटील यांना याबद्दलचे नोटीफिकेशन प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. एस.टी इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. जगदीश पाटील आणि मार्गदर्शक डॉ. सुदाम राठोड याप्रसंगी उपस्थित होते.
खेडोपाडी आणि आदिवासी क्षेत्रात वावरताना प्रा. शरद पाटील यांना शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वेगळ्या अँगलने पाहता आल्या. त्यामुळे राजकारण – समाजकारण – पत्रकारिता अशा त्रिवेणी क्षेत्रात वावरणाऱ्या प्रा. शरद पाटील यांना कदाचित ‘शेतकरी आत्महत्या’ या प्रश्नावर उत्तरे शोधण्यासाठी शैक्षणिक माध्यमातून संशोधन केले पाहिजे असे वाटले असावे.
रक्तदान मोहिमेचे मोठे कार्य –
धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी विद्यार्थी दशा चांगलीच गाजवली होती. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककातून आणि शिबिरांमधून त्यांचे वक्तृत्व आणि नेतृत्वगुण तसेच सामाजिक बांधिलकी विकसित झाली. त्याचप्रमाणे याच महाविद्यालयाच्या क्रीडांगणाने त्यांच्यात खिलाडूवृत्ती देखील निर्माण केली. कुसुंबा येथील शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचवेळी सकाळ दैनिकातून पत्रकारिता करताना या क्षेत्रातील जनसामान्य आणि शेतकरी यांच्या समस्यांनाही त्यांनी वाचा फोडली होती.
विद्यार्थी दशेतील कमविलेल्या गुणांच्या जोरावर त्यांनी धुळे नगरपालिकेतही नगरसेवक म्हणून चांगले काम करताना प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली. प्रा. शरद पाटील यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे रक्तदान रक्तदानाची मोहीम होय. युवक बिरादरी आणि रक्ताश्रयच्या माध्यमातून त्यांनी आजवर रक्तदात्यांचे जीव वाचविले आहेत. आजवर त्यांनी एक लाख ६० हजराहून अधिक बाटल्या रक्त गोळा केल्या आहेत – व या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा शिवछत्रपती राज्य युवा पुरस्कार – 1988 दिला होता. भारतातील मनाचा Red and White Bravery award यासह त्यांना त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी पुरस्कार प्रदान केलेले आहेत.
– त्यांच्या रक्तदान मोहिमेचे प्रस्तुत लेखक स्वत: साक्षीदार आहेत. त्यावेळी मी धुळ्यात एका दैनिकात (१९९४) जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत होतो. एकदा प्रा. शरद पाटील यांच्याशी बोलताना मी – १४ ते १५ वेळा रक्तदान केल्याचे सांगितले आणि जवळच असलेल्या माझ्या वृत्तपत्राच्या कार्यालयात परतलो. चौथ्या मिनिटाला एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि पाटील सरांनी पाठविले असून त्यांच्या नातलगाला रक्ताची त्वरित गरज असल्याचे तिने सांगितले. मी लगेचच रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. त्यांच्या कामाचा हा झपाटा आणि वेग बघून मी थक्कच झालो…
राजकारणातील जय – पराजय –
धुळे ग्रामीण मतदार संघातून त्यांनी शिवसेनेची उमेदवारी करीत 2004 मध्ये त्यावेळचे काँग्रेसचे दिग्गज नेते रोहिदास पाटील यांच्याशी लढताना ते पराभूत झाले – – पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. ते शेतकरी कुटुंबातूनच आलेले आहेत आणि त्यांचा सर्व मित्र परिवार देखील शेतकरी वर्गातून आलेला आहे. त्यामुळे राजकारणात प्रारंभी पासून प्रा. शरद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले आणि त्यांना शेवटी 2009 च्या निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदार संघातून तत्कालीन काँग्रेसचे नेते कुणाल पाटील यांना पराभूत करून महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश करण्याची संधी मिळाली.
आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी दीर्घकाळ रखडलेला अक्कलपाडा हा या क्षेत्रातील सर्वात महत्वाच्या नदीवरील प्रकल्प त्यांनी मार्गी लावला. पांझरा नदीच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी फायदेशीर अशी घटना होती. सुमारे ३० वर्ष रखडलेला हा प्रकल्प त्यांनी ३५ महिन्यात पूर्ण केला.
राजकारण्याचे शैक्षणिक संशोधन हे दुर्मिळ उदाहरण –
एका समस्येमुळे ते दीर्घकाळापासून अस्वस्थ होते… आणि ती म्हणजे “शेतकऱ्यांच्या आत्महत्या!” …तसे पाहिले तर भारताच्या राजकारणात एकाहून एक अशा राजकारण्यांनी उच्च शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केलेली आहे. परंतु सक्रीय राजकारणात असतांना काही वर्ष एखाद्या संशोधनासाठी घालविणे, एखाद्या महाविद्यालयीन प्राध्यापक किंवा संशोधक विद्यार्थ्याप्रमाणे विद्यापीठाचे कोर्सवर्क करणे, ग्रंथालयांमध्ये मान खाली घालून तासनतास अध्ययन करणे असे उदाहरण कदाचित भारतात नाहीच.
राजकारणात आल्यानंतर त्यांच्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नावर संशोधन करणारे प्रा. शरद पाटील हे कदाचित भारतातील दुर्मिळ उदाहरण आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक आणि संशोधक यांचे संशोधन प्रामुख्याने textual study या प्रकारात मोडते. त्यात त्यांचा भर ग्रंथ विश्लेषणावर असतो. अर्थात त्यांचे कार्यही समाजोपयोगी असू शकते; पण राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींना समाजातील वैगुण्य उघड्या डोळ्यांनी दिसत असले, तरी राजकीय व्यक्ती व्यक्तींना त्यांचे अनुभव शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाच्या माध्यमातून प्रतिबिंबित करण्याची संधी मिळत नाही, किंवा तसा वेळही त्यांच्याकडे नसतो.
…. दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्ती त्यांचे संशोधन; त्यांचे निष्कर्ष आणि उपाययोजना जरी जरी खूप मोठी उपयुक्तता असली, तरी राजसत्तेच्या माध्यमातून अंमलबजावणीप्रत नेऊ शकत नाहीत. परंतु प्रा. शरद पाटील यांच्याकडे राजकीय क्षेत्राशी असलेली जवळीक, शैक्षणिक अनुभव आणि पत्रकारिता, अशी तिहेरी चाबी असल्याने त्यांच्या या संशोधनाला राज्याच्या निर्णय निर्धारकांकडून चांगला प्रतिसाद मिळून शेतकऱ्यांच्या या अतिशय गंभीर आणि राज्य व देशाच्या दृष्टीनेही महत्वपूर्ण समस्येवरील उपाययोजनांना चालना मिळू शकते. तेच या संधोधनाचे खरे फलित असेल…!
शेतकऱ्यांची दुःख हे सर्व समाजाचे दुःख –
एकूणच आपला देश कृषिप्रधान असल्याने शेतकऱ्यांची दुःख हे सर्व समाजाचे दुःख आहे. सुमारे 25 वर्ष हे दुःख त्यांना जाणवले असेल आणि यावर काहीतरी उपाययोजना सुचवाव्यात आणि हे दुःख दूर करण्याचा एक ओंजळभर प्रयत्न करावा अशा उर्मीपोटी शरद पाटील सरांनी यावर संशोधन केले असावे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही ग्रहण समस्या शैक्षणिक मापदंडाच्या चौकटीत बसवून त्यावर एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे चार पाच वर्ष अभ्यास करून विद्यापीठाच्या नियमानुसार कोर्स वर्क करून शेवटी या समस्येवर एक दर्जेदार संशोधन सादर करणे एखाद्या राजकारणासाठी किंवा माजी आमदारासाठी संशोधनाच्या दृष्टीनेही अत्यंत दुर्मिळ बाब आहे.
अधिक सखोलतेने पाहता शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखी गंभीर समस्या सोडविण्यात त्यांनी मूलगामी भूमिका पार पाडली आहे. कारण या समस्याला केवळ शेती हा एकच ‘अँगल’ नाही तर त्याचे अनेक सामाजिक, आर्थिक, मानसशास्त्रीय, राजकीय आणि मानसशास्त्रीय असे पैलू आहेत.
साधारणपणे पुरुष शेतकरी आत्महत्या करतो; मात्र महिला शेतकरी अत्यंत विषम प्रतिकूल परिस्थितीला अगदी व्यवहारिकपणे सामोरे जात जीवन संपवण्याचा कधीही निर्णय घेत नाही. शेतकरी अपमानाच्या भीतीने व खोट्या प्रतिष्ठिपायी त्याचे जीवन संपवीत आहे. त्याचबरोबर आत्मसन्मानाच्या मिथ्या संकल्पना आणि कर्ज फेडण्याची जबाबदारी याबरोबरच सामाजिक प्रतिष्ठेशी निगडित ओझे यामुळे आत्महत्या करीत असतो.
देशाची कोलमडलेली शेती व्यवस्था –
जागतिकीकरणाच्या लाटेनंतर (१९९१) आणि गेल्या तीन दशकापासून भारतातील विविध अंतर्गत बाबींमुळे भारतातील शेती व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून संपूर्ण देशातील ग्रामीण भाग एकप्रकारे उद्ध्वस्त होण्याच्या कडेवर आलेला आहे. त्यामुळे या समस्येकडे सरकार आणि समाज या दोघांनी अधिक गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
– एकतर प्रत्येक पिढीनंतर शेतीचे तुकडे पडत आहेत. दुसरीकडे कर्जबाजारीपणा आणि निसर्गाचा लहरीपणा अशा कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही ज्वलंत समस्या निर्माण होते. गेल्या काही काळापासून शेती करत असताना उत्पन्न आणि उत्पादन यांचा विचार करतात बहुसंख्य शेतकरी कसेबसे पोट भरण्यापुरतेच शेतीवर अवलंबून राहत आहेत. त्यामुळे हा “बळीराजा” – ‘कर्जाच्या विळख्यात’ कोळ्याच्या जाळ्यात एखादा किडा सापडावा तसा सापडतो – शेवटी निराशेच्या गर्तेत आपल्या कुटुंबाचा विचार न करता तो आपले जीवन संपवतो.
प्रा. शरद पाटील यांनी त्यांच्या संशोधनाच्या अंती काही सूचना आणि उपाययोजना केलेल्या आहेत. त्यात शेतमालाला हमीभाव मिळणे व पिकांना योग्य दर मिळणे, पीक विमा व कर्जमाफी यात सुधारणा करणे, नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ भरपाई मिळणे, शेतीसाठी आधुनिक सिंचन प्रकल्प राबवून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, शेतकऱ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करणे इ. शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता पूरक व्यवसाय सुरू करून आपल्या उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करावेत, असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांचे रूपांतर शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये करून सामूहिक खरेदी विक्री करावी, अशी नाविन्यपूर्ण व दूरगामी लाभ देणारी उपयायोजना त्यांनी सुचविलेली आहे.
…शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे एक कुटुंब उध्वस्त होते! – – आणि महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास आजवर जवळपास ६० हजार शेतकऱ्यांनी हा आत्महत्येचा अत्यंत अविचारी असा मार्ग निवडला आहे. त्यातही खानदेशात याचे प्रमाण बरेच आहे. याबाबत शरद पाटील सरांनी अतिशय शास्त्रशुद्धपणे निष्कर्ष काढून उपाय योजना सुचविल्या आहेत. ऐरवी एखाद्या प्राध्यापकाच्या संशोधनाकडे सरकारने सहजपणे लक्ष दिले नसते. पण एक माजी आमदार याठिकाणी संशोधक असल्याने सरकारला या प्रश्नावर आता अधिक गांभीर्याने लक्ष द्यावेच लागेल!.. आणि यातून एक गंभीर अशी समस्या सुटेल!

प्रा. डॉ. देवेंद्र विसपुते,
प्रमुख, संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभाग.
विद्यावर्धिनी महाविद्यालय,
धुळे 9423979145

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/