डॉ. स्मिता अवचार यांना जीवनगौरव पुरस्कार

काही व्यक्ती आयुष्यात शिक्षक म्हणून भेटतात, पण काही व्यक्तिमत्व आयुष्य घडवणाऱ्या गुरु म्हणून आयुष्यभर प्रेरणा आणि मार्गदर्शन देत राहतात. माझ्यासाठी प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम म्हणजे एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी गुरु आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम.ए.चे शिक्षण घेत असताना त्यांनी मला केवळ समाजशास्त्र शिकवले नाही, तर विचार करण्याची दृष्टी दिली, प्रश्न विचारण्याचे धाडस दिले आणि सामाजिक वास्तवाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची शिकवण दिली. त्यांच्या वर्गात शिकताना विषय हा केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित राहत नसे; तो जीवनाशी जोडला जाई. त्यांच्या अध्यापन शैलीचा प्रभाव माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांवर आजही आहे. कोणतेही विचार मांडताना संदर्भ कशी निवडावेत तसेच संदर्भ कसे द्यावेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे मॅडम आहेत.
आज मराठी समाजशास्त्र परिषदेच्या वतीने सन २०२५–२६ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याची बातमी ऐकून मन अभिमानाने भरून आले. हा पुरस्कार सिन्नर येथे आयोजित ३५ व्या अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे. हा केवळ त्यांच्या कार्याचा सन्मान नाही, तर आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या संस्कारांचा आणि प्रेरणेचाही गौरव आहे. असे मला वाटते.
समाजशास्त्र विभागाच्या निवृत्त प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ विद्यापीठात कार्य केले. सध्या त्या एम.जी.एम. विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे ‘Professor of Practice’ म्हणून कार्यरत आहेत. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी ज्ञानसाधना आणि समाजसाधना यांचा समतोल राखला आहे.
स्त्री प्रश्न, स्त्री सबलीकरण आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या व्याख्यानांतून स्त्रीच्या संघर्षाची जाणीव होते, पण त्याच वेळी परिवर्तनाची आशाही जागते. महाराष्ट्रभर आणि देशातील विविध व्यासपीठांवर त्या नामवंत वक्त्या म्हणून परिचित आहेत; परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील खरी ताकद म्हणजे विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळा.
एम.ए., एम.फिल., पीएच.डी. आणि पोस्ट डॉक्टरेट विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्या केवळ संशोधक म्हणून नाही, तर घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहतात. शंका विचारली तर उत्तर मिळतेच, पण त्यासोबत आत्मविश्वासही मिळतो. ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये आहेत.
मॅडमचे लेखन, संशोधन आणि सामाजिक जागृतीसाठीचे प्रयत्न हे केवळ शैक्षणिक मर्यादेत नाहीत, तर समाजमन घडवणारे आहेत. त्यांनी आम्हाला विकासाच्या समाजशास्त्र या विषयात शिकवले की विकास म्हणजे केवळ भौतिक प्रगती नव्हे; तो मूल्यांचा, संस्कारांचा आणि सामाजिक जबाबदारीचा विकास म्हणजे खरा विकास असतो. मला वाटते, जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्या दीर्घ कार्याचा सन्मान असला, तरी आमच्यासाठी त्या आधीपासूनच “जीवनाला दिशा देणाऱ्या” गुरु आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टिकोन मिळवली आहे. हीच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे.
माझ्या गुरु प्रा. डॉ. स्मिता अवचार मॅडम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक, हृदयपूर्वक हार्दिक अभिनंदन….! 💐
आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला असेच लाभत राहो, हीच प्रार्थना. 🙏
तुमच्या विद्यार्थी,
डॉ.प्रकाश खेत्री


