तोंडार गावाने जोपासली हेंडग्याची परंपरा
ग्रामीण भागात विविध प्रकारच्या परंपरा वेगवेगळ्या सन उत्सवाच्या काळात पाहायला मिळतात. अशीच एक परंपरा उदगीर तालुक्यातील तोंडार या गावाने जोपासत कायम ठेवली आहे.
दर्श अमावस्या किंवा वेळ अमावस्या साजरी केल्यानंतर संध्याकाळी शेतातून गावात घराकडे परतताना हनुमान मंदिरात दर्शन घेऊन मंदिरासमोर किंवा ग्रामपंचायत कार्यालया समोर मोकळ्या जागेत हेंडगे नाचवण्याची प्रथा कित्येक वर्षापासून या गावकऱ्यांनी जोपासली आहे. हेंडगे तयार करण्यासाठी ज्वारी बाजरी चा कडबा किंवा गवत देखील वापरण्यात येते. हेंडगे वेगवेगळ्या आकाराचे देखील तयार केले जातात.
या हेंडग्याच्या परंपरे संदर्भात गावातील 80 ते 90 वर्ष वयाच्या ज्येष्ठांनी त्यांच्या लहानपणापासून आणि त्याच्याही पूर्वीपासून हेंडगे नाचवण्याची परंपरा गावात सुरू असल्याचे सांगितले.
ज्वारी पेरणीचे प्रमाण कमी झाल्यामुळे हेंडग्यासाठी लागणारा कडबा उपलब्ध होत नाही त्यामुळे ही परंपरा काळाच्या पडद्याआड जाईल अशी शंका या ज्येष्ठांनी बोलून दाखवली. परंतु काही तरुण मंडळी कडब्याच्या ऐवजी गवत किंवा इतर साधनांचा वापर करून हेंडगे तयार करून हेंडगा नृत्य आज सादर करतात या हेंडगानृत्य कार्यक्रमात गावातील आबालवृद्ध सहभागी होतात



