Memory

लातूरचा वैचारिक वटवृक्ष कोसळला

ज्येष्ठ विचारवंत ,लातूर पॅटर्न चे जनक डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे सर यांचे आज सकाळी 8.30 वाजता दुख:द निधन झााले. ते मृत्यूसमयी ते 91 वर्षाचे होते. ते एक प्रतिष्ठित भारतीय शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात. देशभर गाजलेल्या आणि सामान्यविदयार्थ्यांना अभ्यासाच्या जोरावर सामासमुद्रपार जाण्याची संधी उपलब्घ करुन देणारा “लातूर पॅटर्न” चे ते जनक आणि शिल्पकार होते. त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान अंत्यत मोलाचे आहे. त्यांना शब्दसुमनांजली वाहिली आहे युवराज पाटील यांनी

डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे हे नाव उच्चारले की मराठवाड्याच्या मातीचा गंध, शिक्षणाचा दिवा आणि वंचितांच्या अस्मितेची जाज्वल्य जाणीव एकाच वेळी मनात उभी राहते. औसा तालुक्यातील कवठा या गावात ११ नोव्हेंबर १९३४ रोजी जन्मलेला हा ग्रामीण मुलगा पुढे मराठवाड्याच्या शैक्षणिक आणि वैचारिक विश्वाचा दीपस्तंभ बनेल, याची कल्पना त्या काळी कुणालाही नसावी. परंतु इतिहास अशाच जिद्दी माणसांच्या पावलांवर चालत पुढे जात असतो.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अस्थिर वातावरणात बालपण घालवलेल्या वाघमारे संरानी शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर (तेव्हाचे औरंगाबाद) गाठले. ग्रामीण बोली आणि प्रमाण भाषेतील गोंधळ, मराठवाड्यातील सामाजिक विषमता, आणि इंग्रजीसारखी परकी वाटणारी भाषा…या साऱ्या आव्हानांना छातीशी भिडवत त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ‘The Problem of Identity in the Post war American Negro Novel’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. साठीचे संशोधन कार्य पूर्ण कले.
आफ्रिकन-अमेरिकन (निग्रो) साहित्याच्या माध्यमातून अस्मिता, वंचना आणि संघर्ष या प्रश्नांचा त्यांनी केलेला ऊहापोह भारतीय दलित चळवळीच्या विचारविश्वाला नवा बौद्धिक आयाम देणारा ठरला. जगातील शोषितांच्या वेदनेला मराठवाड्याच्या मातीतून प्रतिसाद देणारे सर हे मानवी जाणिवा आणि वेदना जाणणाऱ्यापैकी एक होते .
लातूरमध्ये राहून जागतिक साहित्याचा व्यास मोजणारे सर विद्वान शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. छत्रपती शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्य करताना त्यांनी शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धात्मक तयारी यांचा संगम घडवून आणला. पुढे ज्याला “लातूर पॅटर्न” म्हणून ओळख मिळाली, त्या शैक्षणिक पद्धतीच्या पायाभरणीत त्यांचे दूरदृष्टीचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. ते लातूर पॅटर्न चे जनक होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू म्हणून नव्या विद्यापीठाची उभारणी ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून ती एक वैचारिक बांधिलकी म्हणून त्यांनी काम पाहिले. शैक्षणिक मूल्ये, संशोधनाचा दर्जा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याची तळमळ त्यांनी संस्थात्मक स्वरूपात रुजवली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाच्या प्रसाराला त्यांनी दिलेली गती आजही जाणवते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार आदोंलनाच्या काळात अस्थिर आणि भावनिक संयम पाळत समन्वय आणि वैचारिक भूमिका यांचे संतुलन घालून दिले. शिक्षणक्षेत्रातील नेतृत्व म्हणजे केवळ पद धारण करणे नव्हे, तर समाजाच्या वेदना समजून घेत त्याला दिशा देणे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
ते लातूर नगरपालिकेचे ते पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले, पुढे राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. राजकारण चोगल्या लोकांनी आले पाहिजेत हा विचार त्यांच्या राजकीय कारकीर्दीतून दिसून येतो. राजकीय पदांपलीकडे त्यांच्यातील साहित्यिक आणि विचारवंत सतत जागा होता. प्रशासन, राजकारण आणि साहित्य यांचा समतोल साधत त्यांनी लेखन अखंड सुरू ठेवले. दलित साहित्य, निग्रो साहित्य, अस्मितेचे राजकारण आणि सामाजिक न्याय या विषयांवरील त्यांचे लेखन चिकित्सक, तर्कशुद्ध आणि परिवर्तनवादी भूमिकेचे होते.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात ‘मराठवाडा मुक्ती गाथा’ हा संदर्भग्रंथ साकारताना त्यांचा सहवास लाभलेल्यांना त्यांच्या स्मरणशक्तीचा, अभ्यासाचा आणि अनुभवाच्या खोलीचा प्रत्यय आला. एखाद्या घटनेचा संदर्भ देताना ते केवळ इतिहास सांगत नसत, तर त्या मागील सामाजिक प्रवाह, मानवी मनोवृत्ती आणि काळाची गरज यांचे विश्लेषण करत. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक आठवणीवर स्वतंत्र ग्रंथ होऊ शकेल, एवढा व्यापक परीघ त्यांच्या चिंतनाने व्यापलेला होता.
आज त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या बौद्धिक परंपरेतील एक संपूर्ण पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. शिक्षणक्षेत्रातील तत्त्वचिंतक, जागतिक जाणिवांचा साहित्यिक, सामाजिक न्यायाचा अभ्यासक आणि परिवर्तनवादी शिक्षक अशी बहुआयामी ओळख असलेले डॉ. जनार्दन वाघमारे आता आपल्यात नाहीत, ही जाणीव अस्वस्थ करणारी आहे. परंतु त्यांनी उभे केलेले विद्यार्थी, त्यांनी रुजवलेली विचारांची बीजे आणि त्यांनी दिलेला बौद्धिक वारसा हेच त्यांच्या कार्याचे खरे स्मारक ठरणार आहे. डॉ जे एम सरांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. ते एक कुशल लेखक आहेत ज्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये सामाजिक बदल, दलित साहित्य आणि अमेरिकन निग्रो साहित्यावर लक्ष केंद्रित करून असंख्य पुस्तके लिहिली आहेत.
द क्वेस्ट फॉर ब्लॅक आयडेंटिटी, डायरेक्शन्स ऑफ सोशल चेंज आणि त्यांचे आत्मचरित्र हँडफुल ऑफ डस्ट ही त्यांची गाजलेली कांही मुख्य ग्रंथ संपदा असून त्यांना शाहू भूषण पुरस्कार (२०२२), आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कारासह अंसख्य लहाने मोठे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा, सामाजिक न्याय आणि साहित्य या क्षेत्रात त्यांनी आपले विशेष योगदान दिले आहे. लातूर जिल्ह्यातील सुसंस्कृत राजकीय वसा आणि वारसा त्यांनी जोपासला होता.
सर, तुमचा सहवास ही आमच्या आयुष्याची मोठी शिदोरी आहे. तुमच्या प्रतिभेच्या सावलीत काही काळ उभे राहण्याचे भाग्य लाभले, ही आमची जमेची बाजू. तुमचे कार्य, तुमची विचारधारा आणि तुमची जिद्द आम्ही सदैव सोबत ठेवू.

डॉ. जनार्दन वाघमारे सरांना हिच विनम्र शब्दांजली.
युवराज पाटील,जिल्हा माहिती अधिकारी,पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/