वीरशैव लिंगायतासाठी स्मशानभूमी नव्हे रुद्रभूमी

वीरशैव लिंगायत समाजातील अंत्यसंस्कारासाठी आता यापुढील काळात स्मशानभूमी किंवा दफनभूमी असे संबोधले जाणार नसून रुद्रभूमी म्हणून संबोधले जावे असा नवा आदेश शासनाने पारित केला आहे. शिवाय प्रत्येक नगरपरिषदा सर्व महानगरपालिका क्षेत्रात रुद्रभूमीसाठी त्वरित जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
अलिकडच्या काळात समाजातील जवळपास सर्वच जाती धर्माच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी दफनभूमीची मोठी अडचणी येत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत स्मशानभूमीत देखिल वाढ होण्याची आवश्यकता असताना देखिल प्रशासनाकडून विविध समाजाच्या या सामाजिक मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते.
वीरशैव लिंगायत समाजातील अंत्यसंस्कारासाठी नगर परिषद महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी राज्यसभा सदस्य खा. डॉ अजित गोपछडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रुद्रभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे सहा. आयुक्तांनी 13 आॅगस्ट 25 रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त नगरपरिषदेच्या आणि नगरपंचायतच्या सर्व मुख्याधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात रुद्रभूमीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे आगामी काळात प्रत्येक गावात रुद्रभूमी वीरशैव लिंगायत बांधवास मिळण्यासाठी आपापल्या गावी ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा महापालिकेत ठराव मंजूर करून आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून रुद्रभूमीसाठी जागा उपलब्ध करून घ्यावी. भविष्यात खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे तेव्हा आत्ताच याचा पाठपुरावा करावा. असे आवाहन नितीन शेटे, प्रा सुदर्शन बिराजदार, उमाकांत कोरे यांच्यासह अनेकांनी केले आहे.



