Memory

अंतर्मनात तरंग उमटवणारे लघुपट

निमित्त आभिजात आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

नुकताच अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने लघुपट महोत्सव-24 घेण्यात आला. महोत्सवात एकंदरीत 180 लघुपट सहभागी झाले. महोत्सव म्हटल्यानंतर स्पर्धा आली, स्पर्धात्मक विषयाच्या अनुषंगाने लघुपट निर्माते, दिग्दर्शकांनी यात सहभाग घेतला. दमदार पटकथा दमदार विषय, नाविन्यपूर्ण मांडणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, चित्रपटातील कलात्मकता, छायाचित्रण, संगीत, अभिनय, वेशभूषा, रंगभूषा या सर्व बाजू जमेच्या दिसून आल्या. एकंदरीत तंत्रज्ञानाच्या वापरातून लघुपट देखील कात टाकत आहेत असा अनुभव या लघुपट महोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. खरंतर असे महोत्सव म्हणजे रसिकांसाठी पर्वणी ठरते. कारण एकाच ठिकाणी बहुविध कल्पनांचा आविष्कार रसिकांना अनुभवता येतो. या महोत्सवात देखील रसिक कलात्मक अनुभवात चिंब भिजून निघाले.
लातूर हे तसे कला जोपासणारे शहर म्हणून ओळखलं जातं. इथे नाटकाची 100 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. चित्रपट कलावंत, संगीत क्षेत्रातील तज्ञ, गायन, पटकथा लेखनातील अग्रभागी असणारे लेखक या शहरात आहेत. अशा सर्वांसाठी हा महोत्सव सरत्या वर्षाची मेजवानीच ठरला.
लेखकाचे, निर्मात्याचे, दिग्दर्शकाचे विचारविश्व हे एका लघुपटाच्या माध्यमात सामावून आपल्यासमोर आलेला असतं. त्याला किती कंगोरे असतात त्याचे सूक्ष्मज्ञान ,त्याचे पैलू आणि त्याची जाण याचाही उलगडा महोत्सवादरम्यान घेतलेल्या एका छोट्याशा चर्चासत्र दरम्यान रसिका समोर झाला. म्हणजेच चित्रपट तीन तासाचा असेल लघुपट तीन मिनिटांचा असेल किंवा दहा मिनिटांचा असेल वेळ ही चित्रपटासाठी परिणामकारक नसून चित्रपटाचे, दिग्दर्शन, संकलन, संपादन, कथा, पटकथा, अभिनय आणि कथन करण्याची शैली ही जर हृदयाला भिडणारी असेल तर लघुपट सुद्धा रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवतात. हे या महोत्सवात पाहायला मिळाले.
मराठी भाषेबरोबरच हिंदी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड आणि काही परदेशी भाषेतील सुद्धा लघुपट रसिकांना पाहायला मिळाले. यामुळे चित्रपटातल्या कलात्मकतेतून प्रभावी संवाद घडून येऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कारण दोन्हीही दिवस महोत्सवाला लातूरकर सिनेरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अगदी शेवटच्या लघुपट संपेपर्यंत सिनेरसिक सभागृहात बसून होते.
एकंदरीत पहिल्या वहिल्या या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन, नियोजन आणि निर्माते, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते, संकलक, संपादक यांचा महोत्सवातील सहभाग आणि दर्शकांशी झालेला त्यांचा संवाद हा कुठेतरी निर्मात्या आणि दर्शकांतली दरी मिटवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरला.
कोणत्याही एका चित्रपटाबद्दल बोलणं म्हणजे बाकीच्या चित्रपटा बद्दल बोलण्यासारखं नाही असं नाही. सर्व चित्रपटाबद्दल बोलणं अतिशय महत्त्वाचा ठरेल. इथे कोणत्याही चित्रपटाचा उल्लेखनी करत नाही. विशेषत्वाने या लघुपट महोत्सवामध्ये सहभागी झालेले जे लघुपट होते त्यांनी मानवी जीवनातील जवळपास सर्वच पैलूंवर प्रकाश टाकला होता. अगदी कोरोना कालखंडात आणि त्यानंतर मानवी जीवनात आलेली स्थित्यंतरे, मानवी संबंधात झालेले बदल, व्यवहार याची देखील दखल या महोत्सवात पाहायला मिळाली. लघुपट हे देखील मानवी जीवनातील निर्माता, दिग्दर्शकांनी निवडलेला विषय, कथा ही पटकथाकार स्क्रिप्ट रायटर जितका फुलवेल तितकी ती कथा नाट्यमयरीत्या घटना घडवून चित्रपटांमध्ये उत्कंठा वाढवणारी बाब ठरते. तसं लघुपटामध्ये नसते कारण लघुपटामध्ये घटना प्रसंग पात्र यासर्वावर वेळेच्या मर्यादा असतात. त्यामुळे अत्यंत अल्प वेळेत आपली संकल्पना नाट्यमय पद्धतीने घडवत आणून लघुपटाचा शेवट करणे आणि तोही विषयाच्या अनुषंगाने विषयाच्या विपरीत की तिसऱ्याच बाजूने करायचा याचा सारासार विचार सुरुवातीलाच करावा लागतो.
हा लघुपट महोत्सव हा खऱ्या अर्थाने भविष्यातील मोठ्या पडद्यावरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी निर्माता, दिग्दर्शक, कलाकारांना प्रोत्साहित करणारा ठरला असा निष्कर्ष आपण या ठिकाणी काढू शकतो. टिम आभिजातचे खूप खूप अभिनंदन!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/