Special Story

वणवा: व्यथा वेदनेच्या पलीकडची

वनवा! तसे पाहता मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या सर्वच पैलूंशी संबंधित क्षेत्रात आता वनव्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. संस्कृती, प्रथा, परंपरा नष्ट होत आहेत आणि दुसरीकडे पाश्चात्यांचे अंधानुकरण, वैश्विकीकरण, जागतिकीकरण यांच्या रेट्यात भौतिक सुविधांचा उपभोग प्रचंड वाढला आहे. यामुळे सामाजिक प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचे बनत चालले आहेत. त्यामुळे प्रतिकात्मक स्वरूपात वनवा जसा जंगलासाठी शाप ठरुन जंगल साधनसंपत्तीसह पशुपक्षी कीटक यांच्यासाठी विनाशाचा ठरतो तसाच तो मानवी जीवन आणि संस्कृतीवर घाला घालणारा ठरत आहे. हा वनवा जोपर्यंत माझ्या दाराशी येत नाही तोपर्यंत मी फक्त त्याच्याकडे पाहत राहील ही आमची बघ्याची भूमिका अत्यंत धोकादायक ठरणार आहे.

बालसंस्कार आणि बालशिक्षणातील प्रयोगशील शिक्षण देण्यात अग्रगण्य असणाऱ्या ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पात प्रसिद्ध साहित्यकार दि बा मोकाशी यांच्या वनवा या कथेवर आधारित आणि रंगभूमी डॉट कॉम पुणे निर्मित व शिवम पंचभाई दिग्दर्शित वनवा या एकलपात्री नाटकाचे सलग दोन शो आयोजित केले होते. दोन्ही शो ला भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध साहित्यिक दि. बा. मोकाशी यांच्या समृद्ध लेखणीला अभिनयाच्या माध्यमातून अधिक समृद्ध करणारा समृद्धी खडके हिचा अभिनय थेट काळजाला भिडतो.


जंगलामध्ये राजासारखा राहणारा कातकरी समाज आणि त्या समाजाच्या मर्यादित गरजांची पूर्तता करणारा जंगल, त्यातून येणारी समृद्धी आणि त्यातच हे सर्व विनाशाच्या खाईत लोटणारा वनवा या सर्वांच्या पार्श्वभूमीवर हे नाटक परंपरागत पद्धतीने बहरत जाते. अभिनेत्री समृद्धीने एकटीनेच केलेल्या कातकरी समाजातील विविध भूमिका अतिशय सक्षमपणे दर्शकांसमोर उभ्या केल्या. त्यांची ती झालेले दमछाक, धावपळ दर्शकांचे काळीज पिळवटून टाकणारी ठरते. नाटकामध्ये जवळजवळ सर्वच पात्र अभिनेत्री समृद्धी खडके यांनी अतिशय सक्षमपणे उभे केले आहेत. वनवा पेटल्यानंतर तो विझवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि त्यात कमी पडणारी नायिका शेवटी जेव्हा अंतर्मुख होऊन पुन्हा वनवा पेटला तर मी शांत बसणार नाही या बद्दल ती जो ठाम निर्धार करते हे नाटकाला अतिशय उंचीवर नेऊन महत्त्वाचे वळण घेऊन नाटक संपते.
जंगलाला नैसर्गिकरित्या वनवा लागत असत आणि त्यामुळे जंगलात राहणारे आदिवासी कातकरी हे लोक या साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी जीवाचे रान करीत. जंगलाला लागणारा वनवा हा एकमेव धोका नसून मानव रुपी वाळवी लागलेली आहे. त्यामुळे जंगलाला वाचवणे कठीण होऊन बसले आहे. भ्रष्ट व्यवस्था, अमाप भौतिकतेचा हव्यास यासारख्या गोष्टीतून मानव कसलाच विचार न करता वारेमाप जंगलतोड करीत आहे. ही जंगलतोड सुलभ व्हावी म्हणून आता वनवे पेटवले जात आहेत. त्यातून जंगल तर संपतेच पण जंगलाबरोबरच जंगलात राहणारे जीवजंतू पशुपक्ष्यांच्या प्रजाती हे सर्वच संपुष्टात येतात त्यातच हजारो वर्षाची आदिवासींची संस्कृती देखील संपुष्टात येत आहे.
नाटकाच्या शेवटी कातकरी समाजाची काही घरे जंगलात शिल्लक असतात आणि बाकीचे रोजगारासाठी शहराकडे विस्थापित होतात. म्हणजेच एकाच वेळेला दि. बा.मोकाशी सारख्या प्रख्यात लेखकाने साधारणपणे भविष्याचा वेध घेऊन लेखन केल असावं असं वाटतं. जेवढ्या सक्षमपणे त्यांनी ही कथा लिहिली आहे तेवढ्याच सक्षमपणे दिग्दर्शक आणि कलाकारांनी सादर केलेली आहे. भावनेच्या आहारी न जाता मर्यादेत राहून कोणत्याही प्रकारे नैसर्गिक साधन संपत्तीचे शोषण होणार नाही या विचाराने जगणारा कातकरी समाज शेवटी वीटभट्टीवर नोकर म्हणून शहराकडे वळतो आणि राजासारखं निसर्ग सानिध्य सोडतो ही व्यथा देखील यात पाहायला मिळते. आधुनिकीकरणाच्या मोह पाशात समाजातल्या सर्वच घटकाला ओढले जात असून त्यात दूर डोंगरदऱ्यात राहणारे आदिवासी देखील अलिप्त राहू शकले नाहीत हीच खंत त्यातून पाहायला मिळते.
अतिशय शांत संयमी संगीत ,कमीत कमी साधनांचा वापर, कुठल्याही प्रकारे बटबटीत वाटणार नाही इतकं सुंदर नृत्य, अधिकाधिक निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणाऱ्या पक्षांची किलबिलाट व इतर सुमधुर संगीताचा साज या नाटकावर चढवण्यात पार्थ घासकडवी व त्यांची टीम यशस्वी ठरली आहे.

वनवा : कास्ट आणि क्रू सदस्य
• कलाकार: समृद्धी खडके, रश्मी माळी
• रूपांतर आणि दिग्दर्शन: शिवम पंचभाई
• संगीत: पार्थ घासकडबी, इंद्रनील हिरवे
• पार्श्वगायन: निकिता ठुबे, पार्थ घासकडबी, इंद्रनील हिरवे
• निर्मिती: Rangbhoomi.com आणि अपूर्ण थिएटर
• उत्पादन व्यवस्थापक: अनघा कुलकर्णी, कौशिक कुलकर्णी
• संगीत संयोजन: चैतन्य बीडकर, शुभंकर भागवत
• प्रकाशयोजना: यश पोतनीस
• प्रसिद्धी रचना: शुभम कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/