पेसात दडलेत आदिवासींचे हक्क परिसंवादातील सूर

नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनातर्फे ‘आदिवासी लोकांसाठी पेसा कायदा – १९९६ ची फलश्रुती’ याविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला. पर्यावरण आणि वनाधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते दिवंगत मोहन हिराबाई हिरालाल यांच्या स्मरणार्थ आयोजित या परिसंवादाचे विद्यापीठाच्या ‘यशवाणी’ या नभोवाणी केंद्रावरून प्रक्षेपण देखील करण्यात आले.
‘दिल्ली मुंबई मावा सरकार – मावा नाटे माटे सरकार’ अर्थात ‘दिल्ली मुंबई आमचे सरकार – आमच्या गावात आमचेच सरकार’ या चळवळीचे आधारस्तंभ असलेले आणि विदर्भातील लेखा मेंढा (गडचिरोली) गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करून देणारे मोहन हिराबाई हिरालाल यांचे अलीकडेच नागपूर येथे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. ग्राम स्वराज्याच्या या अनोख्या प्रयोग साधकाला, त्यांनी केलेल्या रचनात्मक कार्यानंदाला श्रद्धांजली म्हणून विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांच्या संयोजनाखाली सदर परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यात विद्यापीठातील मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेतील शैक्षणिक संयोजक श्री. धम्मरत्न जावळे, डॉ. दीपक सोनवणे, डॉ. पन्नालाल धुर्वे व शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या शैक्षणिक संयोजिका श्रीमती हेमलता कामडी – चौधरी यांनी सहभाग घेतला. परिसंवादात सुरुवातीला डॉ. दीपक सोनवणे यांनी दिवंगत मोहन हिराबाई हिरालाल यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. डॉ. पन्नालाल धुर्वे यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाची तसेच स्थानिक स्वायत्त्तता व स्वशासन विषयी माहिती दिली. त्यानंतर सहभागींनी पेसा कायद्याची व्याप्ती विषयी त्या कायद्यातील प्रकरण निहाय थोडक्यात माहिती विषद केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आदिवासी व त्यांचे संवैधानिक अधिकार, पेसा कायद्याचा ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ, ग्रामसभांचे सशक्तीकरण, संसाधनावरील हक्क, परंपरा व प्रथांना मान्यता, शोषणविरोधी सुरक्षा, पेसा कायद्याच्या अधिनियमांचे महत्व आणि वैशिष्ट्ये त्यांची अंमलबजावणी, प्रगती व आव्हाने याविषयी सदर परिसंवादात सर्व पैलूवर चर्चा करण्यात आली. या परिसंवादाचे प्रास्ताविक श्री. धम्मरत्न जावळे यांनी केले तर सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले.



