
प्रजासत्ताक दिनाच्या ह्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पद्मपुरस्कारांमध्ये राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपेक्षा सामाजिक, सांस्कृतिक ,कला, जल, जंगल, पर्यावरण, पशुपक्षी यांच्या विषयी तळागाळात काम करणाऱ्यांचा सन्मान होताना उभ्या महाराष्ट्राचा उर भरून आला आहे. जल, जमिन जंगल, पर्यावरण याच्यासाठी झटणारे आदिवासी पाड्यातील चैत्राम पवार, साहित्यिक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली,
पाच दशकावून अधिक कलेची सेवा करणारे अशोक जी सराफ आणि स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासारख्यांचा समावेश हा या पुरस्काराने महाराष्ट्रीयनांची मान अभिमानाने उंचावेल अशाच प्रकारच्या या निवडी मानावे लागतील.


महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला, याचा आनंद आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, गायिका आश्विनी भिडे देशपांडे, निसर्गअभ्यासक मारुती चितमपल्ली, वनसंवर्धक चैत्राम पवार, होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे, गायिका जसपिंदर नरुला, बासरीवादक रणेंद्र मजुमदार, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्चुत पालव, बँकर अरुंधती भट्टाचार्य तसंच कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल सुभाष खेतुलाल शर्मा यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
पद्मभूषण पुरस्कारांसाठी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांची झालेली निवड म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा, कलासमृद्धीचा गौरव आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्कारानं गौरव झाल्यानंतर, त्यांना आता पद्मश्री जाहीर झाला आहे. त्यांना तसंच आश्विनी भिडे देशपांडे, रणेंद्र मजुमदार, वासुदेव कामत, अच्चुत पालव यांनी महाराष्ट्राचं, देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं, त्यांना जाहीर झालेला पुरस्कार महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा गौरव आहे.


वनं, पर्यावरण आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळलेल्या अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यातल्या प्रत्येक निसर्गप्रेमीचा गौरव आहे. जंगल वाचणारा माणूस ही ओळख असलेल्या मारुती चितमपल्ली यांनी इतरांनाही जंगल वाचायला शिकवलं.
चैत्राम पवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेलं काम गौरवास्पदंच आहे. छोट्यामोठ्या तळ्यांच्या उभारणीतून भूजल पातळी वाढवणं, वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करणं तसंच जंगल, पशु, पक्षी यांच्या संरक्षण, संवर्धनाची सक्रिय चळवळ उभारण्याच्या त्यांच्या कार्याचा, पद्मश्री पुरस्कारानं झालेला गौरव निसर्गाबद्दल आवड असलेल्या युवापिढीला प्रेरणा देणारा आहे.
होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा अर्ध्या शतकाहून अधिक काळ विदर्भातील गरीबांची वैद्यकीय सेवा करणाऱ्या समर्पित वृत्तीचा गौरव आहे. विदर्भातील वैद्यकीय सेवेतील भीष्मपितामह असा गौरव असलेल्या डॉ. विलास डांगरे यांनी ध्येयनिष्ठेनं समर्पित वृत्तीनं पन्नास वर्षांहून अधिक गरीब रुग्णांची सेवा केली. याकाळात डॉक्टरांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा समर्पित सेवाकार्याचा गौरव आहे. विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त या सर्व मान्यवरांच्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे



