Third Eye

…. या सुखाला तू ही मुकलास आणि आम्हालाही पोरके केलंस…

…. तिच्यावरच्या निस्सीम प्रेमापाई आम्हाला ठोकर मारली, जीवनात आनंदाचे क्षण उपभोगण्याची वेळ असताना आम्हाला दुःखाच्या खाईत लोटलसं, मुलांसोबत बायकोसोबत थट्टा मस्करी, गप्पागोष्टी करण्याचे तुझे वय….. या सुखाला तू ही मुकलास आणि आम्हालाही पोरके केलं…..

या काळीज पिळवटून टाकणाऱ्या वेदनादायी ओळी, दारूच्या व्यसनापाई अर्ध्यावरती डाव सोडून गेलेल्या अभाग्या पतीच्या निधनानंतर पती प्रेमाला पोरक्या झालेल्या पत्नीने आपल्या मृत पतीला लिहीलेल्या पत्रात या भावना व्यक्त केल्या आहेत.
इन मिन चार ओळीचे समाजमाध्यमात फिरणारे पत्र किती वेदनादायी, दुर्दैवी आणि असाह्य अशा स्वरूपाचे भावना व्यक्त करणारे आहे. त्यामुळे सामाजिक समस्याबरोबरच कौटुंबिक जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, नाते, सुखदुःखाच्या जाणिवा, सर्व काही विसरायला लावून आपल्यातच मग्न ठेवणाऱ्या व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्यांचे पाय अशा प्रकारच्या उद्विग्न भावना वाचून तरी थांबतील का हा भाबडा प्रश्न येथे मला पडतो. दारूच्या व्यसनाधीनतेपाई संसाराची राख रांगोळी झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. पण विपन्नावस्थेत समाज माध्यमाव्दारे कोणीतरी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही पहिलीच घटना मानली पाहिजे. कोणत्याही सबबीवर, अटीवर किंवा आपल्या मनावरील नियंत्रणाच्या अनुषंगाने आपण आयुष्यातील सर्व गोष्टी निश्चितपणे प्राप्त करू शकतो. त्याचप्रमाणे कोणतेही व्यसनाधीनतेवर आपल्या मनाच्या निश्चयाने विजय मिळवता येऊ शकतो. परिणामी अशा अनेक माता बहिणींच्या आयुष्यात येणारे दुर्भाग्यपूर्ण क्षण निश्चितपणे थांबवता, रोखता येऊ शकतील असा विश्वासही मला वाटतो.
वास्तविक व्यसनाधीनता ही काही आजच्या समाजात उद्भवलेली बाब नसून ती हजारो वर्षांच्या परंपरेतून आपल्याला पाहायला मिळते. परंतु ती जर काही मर्यादित स्वरूपात असेल तर त्याचे इतके गंभीर परिणाम दिसून येत नाहीत. मात्र अतिरेक हा शेवटी विनाशकारी ठरतो.म्हणून स्व -नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. या संदर्भात केवळ दारू च्या व्यसनाधीनतेमुळे दरवर्षी दोन ते अडीच लाख लोक मृत्युमुखी पडतात. हा आकडा खूप मोठा आहे. त्याचबरोबर एवढेच संसार उघड्यावर पडतात. दारू च्या व्यवहारातून राज्य सरकारला 20 ते 25 हजारांपेक्षा अधिक कोटी रुपयांचा महसूल मिळतो. सरकार हा महसूल कसा वाढेल याकडेच लक्ष देत आहे. त्यामुळे सरकार दारूबंदी करेल ही अपेक्षा बाळगणे फोल ठरेल. म्हणून दारूच्या व्यसनाधीनतेमुळे सामाजिक आणि कौटुंबिक दुष्यपरिणाम होत आहेत त्याकडे आपण सर्वांनी गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.
जागतिक अहवालानुसार दरवर्षी जगात 19 अब्ज लिटर तर भारतात 6 ते 7 अब्ज लिटर दारू रिचवली जाते. त्यात दारू आणि त्याच्या सर्व उपप्रकारांचा समावेश आहे. दारू पिणाऱ्यांची संख्या जगात मोठी दिसून येते. त्यामुळे दारुडा पिऊन वाहन चालवताना अपघातासारख्या प्रसंगातून एका दिवसात मरतो, मात्र दररोज कणाकणाने तिळा तिळाने मरणाऱ्यांची संख्या मात्र प्रचंड आहे.
भारतात विशेषता ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या
अन्नधान्यपासून किंवा साधनसामुग्री पासून देशी पद्धतीने तयार होणाऱ्या दारूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. ज्याला आपण देशी दारू म्हणून संबोधतो. अशा देशी दारू पिणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. कारण ती एकतर सहज उपलब्ध होते आणि त्यासाठी कमी पैसे लागतात. अशा देशी दारूचा दर्जा अतिशय खराब असतो. त्यामुळे अनेक शारीरिक आजार त्यापासून निर्माण होतात. शिवाय दारूचा इतर घटकांची संपर्क आल्यामुळे ही दारू विष बनते आणि अशा विषारी दारूच्या प्राशनाने शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याच्या घटना देखील भारतात घडल्या आहेत.
दारूच्या व्यसनाधीनतेचे परिणाम आपण आपल्या कुटुंबात शेजारीपाजारी समाजात सातत्याने पाहत असतो. सतत भेडसावणाऱ्या अशा या दारू वर रामबाण उपाय शोधण्याची अत्यंत गरज असल्याचे वाटते. याचा अर्थ असा नव्हे की दारू सोडून अन्य व्यसन सुरू करावे. मनाचा निग्रह आपल्याला सर्व गोष्टीपासून दूर ठेवू शकतो. हा आत्मविश्वासच आपल्याला समाजातील, कुटुंबातील, शांती, समाधान, सुख, आनंद प्राप्ती होवून डाव अर्ध्यावर मोडणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/