जिल्हास्तरीय रोजगार मेळावा

धुळे येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात 128 तरुणांच्या हाताला काम मिळाले. हा मेळावा विद्यावर्धिनी सभेच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित केला होता.
धुळे: धुळे जिल्हा आणि शहरात प्रचंड प्रमाणात विकासाची क्षमता आहे. वेगवेगळ्या पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. सरकारकडूनही लाडका भाऊ सारख्या योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे येथील तरुणांना रोजगाराचा उज्वल भविष्यकाळ आहे, असे प्रतिपादन आ. अनुप अग्रवाल यांनी विद्यावर्धिनी सभेचे डॉ.एम.वाय. कला, प्रा.पी.डी.दलाल वाणिज्य आणि डॉ.डी.एस. शाह विज्ञान महाविद्यालय, धुळे येथे केले.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि विद्यावर्धिनी महाविद्यालय यांनी संयुक्तपणे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महामेळावा आयोजित केला त्याप्रसंगी आ. अनुप अग्रवाल बोलत होते. महामेळाव्याचे उद्घाटक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर होते.
धुळे शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक युवकाच्या हाताला काम देऊन जिल्ह्याच्या आर्थिक चक्राला चालना देणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उद्घाटनपर भाषणात केले.परिसरातील उद्योग, व्यवसाय, कृषी, सेवा क्षेत्र व शिक्षण संस्था आणि शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय साधून युवकांमधील कौशल्य वाढविणे, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणे आणि व्यक्तीबरोबरच जिल्हा तसेच राज्याचाही विकास साधने हे आपले उद्दिष्टे आहे, असे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर पुढे म्हणाले.
प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांनी या महामेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका आपल्या स्वागतपर भाषणात स्पष्ट केली.या रोजगार महामेळाव्यात 800 पेक्षा अधिक युवकांनी नोंदणी केली आणि मुलाखतीसाठी 567 युवक उपस्थित राहिले. रोजगार मेळाव्यात एकूण 27 कंपन्या व 12 महामंडळे सहभागी झाल्या.
या रोजगार मेळाव्यात 128 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली तर 22 युवकांची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड करण्यात आली.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी व्हा. चेअरमन उदय शिनकर होते. याप्रसंगी प्रा. अनिल दामोदर, डॉ. जितेंद्र तलवारे उपस्थित होते. यावेळी कंपन्याचे वतीने रामेश्वर माळी, अनंत दांडेकर व सुधीर शिरसाठ यांनीही विचार मांडले.



