
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध भागात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. पतंगोत्सवात आनंददायी उत्सव असला तरी चिंता मात्र वाढली आहे. पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजाच्या माध्यमातून जर अनेकांचे प्राण जात असतील, पक्षांचे जीव टांगणीला लागत असतील तर असा असुरी आनंद आपल्यापैकी कोणालाही नको असेल हे निश्चितच. म्हणून अगदी कोर्टाला देखील मांज्याच्या वापराबद्दल आपली नाराजी व्यक्त करावी लागते. हे आपल्या व्यवस्थेच अपयश मानावा लागेल. मागच्या दोन दिवसात मांजाच्या माध्यमातून झालेले अपघात आणि घटना या चिंता करण्यासारख्याच वाटतात.
14 आणि 15 जानेवारी या तारखांना पतंग उत्सवाचा जल्लोष असतो. यानिमित्ताने पतंगाची काटाकाटी हा यातला परमोच्च आनंद मिळवून देणारा क्षण असतो. अशा एकमेकांचे पतंग काटाकाटीसाठी नायलॉन पासून तयार केलेल्या खास मांजा वापरण्यात येतो. ज्यामुळे इतरांचे पतंग सहज काटले जाऊ शकतात. पण असे काटलेले पतंग कुणाच्याही हाती न लागता वाऱ्यावर उडून जातात तेव्हा ते कधी रस्त्यावर कधी झाडावर कधी घरांवर, तारांवर अडकून त्यांचा तो मांजा मात्र हवेत तरंगत असतो. हा हवेत उडणारा मांजा सहसा नजरेस पडत नाही आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्यावर तो घातक ठरत आहे. या तीन दिवसात जवळपास 20 पेक्षा अधिक घटना मांजामुळे घडल्या आहेत. ज्यात नाक, हात, गळा कापल्याच्या घडल्या आहेत तर तीन व्यक्तींनी कसलाही दोष नसताना आपला जीव गमावला आहे. पक्ष्यांची गणना तर यात कुठेच आम्ही केली नाही. किमान शेकडो पक्षी यां मांजाच्या जाळ्यात अडकून आजही तडफडत असतील, काही पक्षांचं दैव बलवत्तर म्हणून पक्षी मित्र किंवा इतरांनी त्यांना या मांज्याच्या जाळ्यातून सोडवले असेल. पण असंख्य तडफडणाऱ्या पक्षांना कोण वाचवणार हा ही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.
एखाद्याचा गळा चिरणे ही साधी बाब नव्हे. त्यामुळे जीवावर बेतणारे या मांज्याला आम्ही पुढे किती काळ चालू देणार आहोत याचा विचार आपणच केला पाहिजे. या पाठीमागचं अर्थतत्व आपण लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाच ठरेल. कारण मांजा आता उद्योगातून तयार केला जातो, त्यामुळे यातून काही करोड रुपयांचा बिझनेस (100 ते 500 करोड) या मांजाच्या माध्यमातून होत असावा असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे कदाचित सरकार मांजा निर्मितीच झालेलं भांडवलीकरण थांबवू शकत नसावं. एकंदरीत लोकांचे जीव महत्त्वाचे की पैसा महत्त्वाचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. महाराष्ट्र येथे अजूनही नायलॉन माझ्या वापरा संदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे समजते मात्र देशातील इतर 14 राज्यांनी नायलॉन मांजा वापरा संदर्भात बंदी आहे. या संदर्भात सरकार व उत्पादकांनी जरी लक्ष दिले नाही तरी आपण वापरकर्ता म्हणून आपला आनंद आपली जबाबदारी या भूमिकेतून आपणच जबाबदार बनवू या. पतंगबाजीचा आनंद घेऊ या पण त्याबरोबरच इतरांनाही त्रास होणार नाही याचीही काळजी घेऊया यातच खरा पतंगोत्सव असेल इतर कोणतेही उत्सव असतील हे खरे उत्सव परंपरेने साजरे करून नैतिकतेचे आचरणाने नावलौकिक वाढवूया हीच अपेक्षा.



