देश -विदेश

पाकिस्तानविरुद्ध भारताने छेडले एक दीर्घकाळ चालणारे युध्द…!

गाथा ऑपरेशन सिंदूरची

प्रा. डॉ. देवेंद्र विसपुते,
प्रमुख, संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभाग.
विद्यावर्धिनी महाविद्यालय,
धुळे 9423979145
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरला आता महिना होईल. पण त्याचे कवित्व मात्र जोरात सुरु आहे. भारतीय सूत्रांनी ऑपरेशन सिंदूरची पूर्ण माहिती अद्यापही दिलेली नाही, युद्धकाळात ती तशी देताही येत नाही. पण समाज माध्यमांमध्ये रोजच नवनवीन माहिती येत आहे. भारत सरकारनेही अद्याप पूर्ण माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या किंवा परस्परविरोधी माहितीचा ओघ माध्यमांमध्ये सुरु आहे.
पाकिस्तानी समाज माध्यमांमध्येही आता पाकिस्तानी सरकार आणि सैन्य यांच्याविरोधात बोलले जात आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताने हे एक दीर्घकाळ चालणारे युद्ध छेडले आहे; कारण पाकिस्तानी राज्यकर्ते आणि सैन्य गेल्या 43 वर्षांपासून सुरू असलेले दहशतवादाला चालना देणारे धोरण सहजासहजी सोडणार नाही. कारण दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्ध छेडणाऱ्या आणि ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात जाऊन मारणाऱ्या अमेरिकेची संदिग्ध भूमिका तसेच जागतिक संसद मानल्या जाणाऱ्या राष्ट्रसंघाचे याबाबत मौनही याला कारणीभूत आहे.
गेल्या 78 वर्षांपासून पाकिस्तानची राजनीती ही सैन्यच निर्धारित करते. कोणत्याही राजकीय पक्षाला जनमानसाचा प्रबळ आधार नाही. त्यामुळे तिथे या सात – आठ दशकात कोणतेही प्रबुद्ध नेतृत्व लाभलेले नाही. त्यामुळे हा भारतविरोध इतक्या लवकर संपेल, असे वाटत नाही. यात सर्वात समाधानाची बाब म्हणजे आजवर भारताचे संरक्षण धोरण हे दीर्घकाळ संरक्षणात्मक व प्रतिसाधात्मक (Defensive & Reactive Policy) होते! ..आज ते पूर्वनिर्धारित, आक्रमक आणि सक्रियात्मक (Preordain, Aggressive & Pro-active Policy) बनते आहे. भारताच्या लष्करी – आर्थिक शक्तीचा धाक – दरारा (Deterrence) यातून जगात निर्माण होईल.
पाकिस्तानच्या डोळ्यासमोर फक्त काश्मीर-
त्यातच केवळ पाकिस्तानने काश्मीर डोळ्यासमोर ठेवले आहे. भारताविरुद्धच्या थेट किंवा प्रत्यक्ष युद्धात काश्मीर जिंकता येत नाही; हे बघून भारताविरुद्ध proxy war छेडून काश्मीर मिळवावे! अशी बाळबोध रणनीती त्यांनी निर्धारित केलेली आहे. त्यांनी दहशतवादाला आपल्या राजकारणाचा आणि युद्धनीतीचा मुख्य डावपेच बनविला… आणि येथेच पाकिस्तान दलदलीत रुतला आहे. आज बोटावर मोजण्याइतक्याच देशांकडून पाकिस्तानला मदत मिळते आहे. त्यामुळे पाकिस्तान – चीन युती भारताला Two / Three Front War च्या गर्तेत खेचून विभाजनाच्या दिशने वाटचाल करणाऱ्या पाकिस्तानला वाचविण्याचाही प्रयत्न होऊ शकतो.
चोऱ्या – माऱ्या करून पाकिस्तानने अणूबाँब बनवला. त्याला सातत्याने अमेरिका, चीन आणि सौदी अरेबियासह अनेक मुस्लिम देशांची साथ मिळत गेली होती. या अणूबाँबच्या साह्याने त्यांना काश्मीर भारतापासून मुक्त करावयाचा होता. किराणा हिलवर क्षेपणास्त्र दागून भारताने पाकिस्तानच्या आण्विक सामर्थ्याचा फुगा फोडला आहे. याबाबतही अमेरिकेची भूमिका संशयास्पद आहे.
पाकिस्तानची बहुसंख्य शस्त्रे भिकेत मिळालेली आहेत. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा गाडा देणग्या, उधार – उसनवार आणि कर्जाच्या जोरावर चाललेला आहे. तेथे लोकशाही फुलू शकली नाही. विज्ञान-तंत्रज्ञानासह कोणत्याही क्षेत्रात पाकिस्तानने प्रगती साधलेली नाही. पाकिस्तानवर पाकिस्तानातील पंजाबमधील धनाढ्य मंडळींचा जबरदस्त वरचष्मा आहे. इस्लामिक धर्मांधता आणि मुल्ला मौलवींचा तिथे प्रचंड प्रभाव आहे.
पाकिस्तानने कोणत्याही अँगलने स्वातंत्र्य मिळाविलेले नाही. त्यासाठी पाकिस्तानी जनतेने किंवा राज्यकर्त्यांनी कोणताही लढा दिलेला नाही; हे इतिहासाच्या अध्ययनातून कोणालाही कळू शकते. एक स्टेनो आणि एक टाईपरायटरच्या जोरावर मी पाकिस्तान मिळविला आहे! असे महंमद अली जिना स्वत:च गर्वाने सांगत. पाकिस्तानचा जन्मच मुळी हिंसाचारातून झालेला आहे… आणि हिंदुद्वेष हा त्याचा पाया आहे.
पाकिस्तानी राज्यकर्त्यांमध्ये दूरदृष्टी मात्र प्रचंड आहे ते दशकेच नव्हे तर शतकांच्या पलीकडेही पाहू शकतात. उदाहरणार्थ झुल्फिकार अली भुत्तो यांनी वक्तव्य केले होते की, “पाकिस्तानी एक वेळ गवत खातील, पण अणुबॉम्ब बनवतील!” हे भाकीत खरे ठरण्याची दाट शक्यता आहे. पण पाकिस्तानात गवत उगवण्यासाठी पाणी तर हवे!…
पहेलगामच्या इतक्या मोठ्या अमानुष कृत्यानंतर आणि त्यानंतरच्या पराभवानंतरही पाकिस्तानी लोकांमध्ये आणि बुद्धिवादी लोकांमध्ये पश्चातापाची किंवा अपराधीपणाची भावना दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार कळवला बाळगण्याची गरज नाही.
पाकिस्तान पूर्णपणे परावलंबीच –
फाळणीनंतर आजवर पाकिस्तानातील योजना आणि आर्थिक धोरणे किंवा विविध कायद्यांची निर्मिती ब्रिटिश – अमेरिकन तज्ञांनी तयार केली. आता त्यासाठी चिनी लोकांची मदत घेतली जात आहे थोडक्यात पाकिस्तान फाळणीनंतर स्वतंत्र झाला असला तरी आजही स्वायत्त नाही. पाकिस्तान पूर्णपणे परावलंबी आहे.
पाकिस्तानने हिंदुस्तानपासून रक्तरंजित फाळणीनंतर जरी स्वातंत्र्य मिळवले असले तरी आजही अमेरिका व चीनच्या जोखडाखाली आहेत, असे अनेक पाकिस्तानी लोकांचेच म्हणणे तेथील समाज माध्यमातून दिसून येते. “हम तो गोरों के गुलाम हैI” “पाकिस्तानी वजिरे आजम की हैसियत चपरासीसे ज्यादा नही हैI” असे पाकिस्तानी लष्करातील निवृत्त अधिकारी कर्नल आदिल राजा यांचे म्हणणे आहे. पत्रकार कमर चिमा यांनी तर एका जळजळीत सत्यावर प्रकाश टाकला आहे. “Pakistan was born in violence!” वह IMF के चुंबल में फसा है, असे ते म्हणतात.
भारतात लोकशाही मार्गाने सरकार आणि राज्यकर्ते कसे बदलतात, याचेही पाकिस्तानी लोकांना आश्चर्य वाटते. काही पत्रकार मात्र तटस्थपणे भारत पाकिस्तान संबंधांचे विवेचन करतात. त्यात आरजू काजमी, तारेख फतेह आणि नजम सेठी यांचा समावेश आहे.
सामान्य पाकिस्तानी जनतेलाही भारताशी वैर
पाकिस्तानी मुल्ला – मौलवी मिलिटरी आणि राज्यकर्त्यांमध्येच भारत विरोध आहे बहुसंख्य पाकिस्तानी जनतेला भारताशी वैर नाही किंवा काहीही देणे घेणे नाही! त्यामुळे त्यांचे पाणी रोखणे मानवतेचे विरोधात आहे!… असा कळवळा भारतात अनेकांना येतो आहे. पण खरे तर ‘भारत द्वेष आणि हिंदू द्वेष’ त्यांच्या पंजाब प्रांतातील मुस्लिमांमध्ये अगदी खोलवर रुजलेला आहे. बलुची, सिंधी, पठाण, मोहाजिर, अहमदिया, ख्रिश्चन, हिंदू व बौद्ध अशा सर्वांना पाकिस्तानात कोणतेही स्थान नाही किंबहुना त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात येत आहे.
पूर्व पाकिस्तानातील बौद्धांवर अमानुष अत्याचार केले जात असल्याची तक्रार फाळणीनंतर लगेचच पाकिस्तानचे पहिले कायदेमंत्री बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल यांनी पंतप्रधान लियाकत अली खान यांच्याकडे केली होती. तरीही हजारो स्त्रियांवर बलात्कार होत राहिल्याने त्यांनी राजीनामा देऊन दिला व ते भारताच्या आश्रयाला आले. परंतु शेवटपर्यंत त्यांना पंतप्रधान नेहरू यांनी भारताचे नागरिकत्व दिले नाही. कारण त्यांच्या चुकीमुळेच किंवा मुर्खपणामुळेच पूर्व बंगालचे बौद्ध बहुसंख्य असलेले 6 जिल्हे पाकिस्तानात सामील झाले होते. त्यानंतर 80 च्या दशकात धार्मिक अत्याचारामुळे मोठ्या संख्येने चकमा निर्वासित भारतात शरणांगती घेतली. पाकिस्तानातून फुटून निघालेल्या बांगलादेशातही आजही हिंदू – आणि बौद्धांवर अन्याचार होत आहेत.
पाकिस्तानच्या दहशतवादावर तडाखा
7 मे रोजी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर हॅमर आणि स्कल्प क्षेपणास्त्र यांनी हल्ला केला. यात पाकव्याप्त काश्मीरपासून बहावलपूर पर्यंतच्या दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. भारताच्या सक्षम एअर डिफेन्स सिस्टम ने पाकिस्तानच्या कोणत्याही लढाऊ विमानाला भारत – पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडू दिली नाही. त्यामुळे पाकिस्तानने आठ तारखेला ड्रोन्सच्या सहाय्याने भारतावर हल्ला चढविला जो भारतीय यंत्रणेने कमी केला.
पाकिस्तानातील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारताने हातात घेतलेल्या “ऑपरेशन सिंदूर” मध्ये पाकिस्तानला नऊ विमाने गमवावी लागली आणि त्यांची वायुरक्षा प्रणाली (Air Defence System) बऱ्यापैकी निकामी करण्यात भारताला यश मिळाले. पाकिस्तानी वायुसेनेच्या लढण्याच्या क्षमतेचे खच्चीकरण करणे, हेच भारताचे प्रमुख उद्दिष्ट होते.
पाकिस्तानच्या निकामी झालेल्या 9 विमानांमध्ये अमेरिकन बनावटीची चार F- 16 विमाने, चिनी बनावटीची JF-17 आणि फ्रेंच बनावटीचे मिरज -3 या लढाऊ विमानांचा समावेश आहे. यात महागडी 2 High Value विमाने व Electronic Warfare System चा समावेश आहे. नूर खान वायूतळावर IC -130 विमान हँगर मध्येच हिट करण्यात आले. पाकिस्तानचे ॲबॅक्स तर भारताच्या सीमेपासून 350 किलोमीटर लांब अंतरावर नष्ट करण्यात आले. ही भारताच्या रशियन बनावटीच्या S – 400 वायुरक्षा प्रणालीतील 40 M- 60 कामगिरी मानली जाते.
भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी वायुसेनेच्या अकरा – बारा वायुतळांवर हल्ला चढवल्याची माहिती दिली होती, पण पाकिस्तानने आता भारताने त्यापेक्षा अधिक तळ, नागरी वस्त्या व धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. म्हणजे भारताने पाकिस्तानच्या एकूण 30 पेक्षा अधिक ठिकाणांना लक्ष केले आहे.
दवा कि गोलीही काफी
भारत औषध निर्मितीच्या क्षेत्रात जगातील अग्रगण्य देश असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतातून पाकिस्तानात मोठे प्रमाणात औषधांची तस्करी केली जाते. परंतु आज पश्चिम सीमेवर कडेकोट बंदोबस्त असल्याने ही स्मगलिंग नेपाळ, दुबई, अफगाणिस्तान आणि इराणमार्गे सुरू आहे. पाकिस्तानात उच्च श्रेणीची संवेदनशील औषधे तयार होत नसली तरी अलीकडे नियमित औषध उद्योग सुरू झाला असून त्यांच्या गरजेच्या 40 % कच्चामाल भारतातूनच निर्यात होतो. पण आता भारताने पाकिस्तानशी व्यापार केल्या बंद केल्यामुळे पाकिस्तानची प्रचंड कुचंबना होत आहे. भारतातून पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात “औषधे” (Drugs) निर्यात केली जातात तर पाकिस्तानातून 80 % Drugs (मादक पदार्थ) भारतात येतात.
थोडक्यात भारत गोळीचा (औषधांचा) उपयोग करूनही पाकिस्तानला सतावू शकतो.
पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारताला फार प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांची अंतर्गत धोरणेच पाकिस्तानचे विघटन करतील. बलुची, सिंधी, पठाण, मोहाजीर, अहमदिया आणि हिंदू – बौद्ध व इतर अल्पसंख्यांक यांना पाकिस्तानचे शासन, प्रशासन व लष्कर यासह राष्ट्र जीवनाच्या कोणत्याही परिघात कोणतेही स्थान नाही आणि हेच पाकिस्तानाच्या संभाव्य पराभवाचे मुख्य अंतिम आणि एक मात्र कारण ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/