
परीक्षांचा ताण न घेता वेळेचे योग्य नियोजन करुन
सकारात्मकतेने अभ्यासावर लक्ष केंद्रित करा
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला-
मुंबई- जीवनात स्वतःशी स्पर्धा ठेवून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा आणि लहान लहान उद्दिष्ट ठेवून ते पूर्ण केल्याचा क्षण साजरा करा. तसेच परीक्षांचे ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, त्यातून यश नक्की मिळेल, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आज शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या मुंबईत शिवाजी पार्क येथील स्काऊट आणि गाईडच्या सभागृहात झालेल्या प्रसारण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा हेच अंतिम ध्येय न ठेवता सर्वांगीण ज्ञान मिळविण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता आपल्या आवडत्या क्षेत्रात ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला ओळखून वर्तमानातील प्रत्येक क्षण उत्तम पद्धतीने जगावा. विचारांना मनात दाबून न ठेवता कोणतेही वय असो, लिहिण्याची सवय कायम ठेवावी, त्यातून आपले मत व्यक्त होत असते.
अपयश हे जीवनात यशस्वी होण्यासाठीचे इंधन असते, असे सांगून पंतप्रधान श्री. मोदी यांनी विद्यार्थ्यांना अपयशाची भीती न बाळगता त्याला आपला गुरू बनविण्याचा सल्ला दिला. एकाग्रतेसाठी ध्यान धारणेला महत्त्व असल्याचे सांगून निसर्ग, सिझनल फूड, नवनवीन तंत्रज्ञान, नेतृत्व करताना टीम वर्क आदी बाबींचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी निसर्गाची काळजी घेण्याचे आवाहन करून त्यांनी विद्यार्थ्यांना एक पेड मा के नाम अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. पालकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता, त्यांच्या इच्छा ओळखावी आणि त्यांना प्रोत्साहन देऊन मदत करावी, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.



