
तिरुपती :लाडू भेसळ प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुरकी येथील भोले बाबा डेअरीचे माजी संचालक पोमिल जैन आणि बिपिन जैन; पूनम्बक्कम येथील वैष्णवी डेअरीचे सीईओ अपूर्व विनय कांत चावडा आणि दुंडीगल येथील एआर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक राजू राजशेखरन यांचा समावेश आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) येथे लाडू तयार करण्यासाठी पुरवण्यात आलेल्या तुपात भेसळ केल्याच्या आरोपांच्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर आणि करोडो भाविकांच्या भावनांशी खिलवाड झाल्याचा आरोप केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. एसआयटीमध्ये सीबीआयचे दोन अधिकारी, आंध्र प्रदेश सरकारचे दोन अधिकारी आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) चा एक प्रतिनिधी होता. तपासात तूप पुरवठा प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्याने ही अटक करण्यात आली आहे .
वैष्णवी डेअरीने एआर डेअरीच्या नावाने निविदा मिळवल्या आणि प्रक्रियेत फेरफार करण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि सील बनवल्याचे आढळून आले. या पुरवठादाराची देवस्थाने दिलेल्या ऑर्डर प्रमाणे तूप पुरवण्याची क्षमता नसतानाही त्यांनी तशी बनावट कागदपत्रे सादर केली होती.
तिरुपतीमध्ये तीन दिवस चौकशी केलेल्या आरोपींच्या सहभागाचे प्राथमिक पुरावे असूनही ते सहकार्य करत नसल्याचे आढळून आले. पथकाने तिरुमला, तिरुपती आणि तामिळनाडूमधील एआर डेअरीच्या सुविधेची तपासणी केली.
लाडू भेसळीचा घोटाळा आंध्र प्रदेश संपूर्ण देशात राजकीय चर्चेचा विषय बनला होता. टीडीपीने माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी सरकारवर “तिरुपतीतील सर्वात पवित्र प्रसादात भेसळ ” केल्याबद्दल टीका केली होती.अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुरकी येथील भोले बाबा डेअरीचे माजी संचालक पोमिल जैन आणि बिपिन जैन; पुनमबक्कम येथील वैष्णवी डेअरीचे सीईओ अपूर्व विनय कांत चावडा; आणि दुंडीगल येथील एआर डेअरीचे एमडी राजू राजशेखरन यांचा समावेश आहे.आंध्र प्रदेश सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ ते २०१९ या कालावधीत वायएसआरसीपी सरकारच्या मागील कार्यकाळात तिरुपतीला तूप पुरवठ्यात गंभीर उल्लंघन झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
मंदिराचे व्यवस्थापन करणारे तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) लाडू तयार करण्यासाठी शुद्ध तूप वापरते. तामिळनाडूच्या एआर फूड्सने ३२० रुपये प्रति किलो दराने तूप पुरवण्यासाठी निविदा मिळवली होती. पुरवठा केलेल्या तूपातील सॅम्पल ८ जुलै २०२४ रोजी चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. १७ जुलै रोजी एनडीडीबी प्रयोगशाळेच्या अहवालात भेसळ असल्याचे आढळून आली होती.
तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) सरकारने गेल्या वर्षी तिरुपती येथील भगवान वेंकटेश्वर मंदिरातील लाडूच्या स्वरूपात भक्तांना अर्पण केलेल्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचा दावा केला होता, ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. सीबीआयचे दोन अधिकारी, आंध्र प्रदेश सरकारचे दोन अधिकारी आणि भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाचा एक अधिकारी अशा पाच सदस्यीय पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.



