एक प्रतिज्ञा असे आमुची, ज्ञानाची साधना…

युजीसी चे धोरण मुक्त शिक्षण व्यवस्थेकडे घेऊन जाणारे आणि तंत्रस्नेही विद्यार्थी घडवणारे दिसून येते .त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात ज्यांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या नाहीत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वच क्षेत्रातील करिअरच्या संधी मिळवून देणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्राला शैक्षणिक क्षेत्रात लाभलेली संजीवनीच म्हणावे लागेल
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा तिसरा दिवसात समारंभ नुकताच संपन्न झाला या समारंभात अनेक मान्यवरांनी या विद्यापीठाच्या कार्याबाबत गौरोद्गार काढले वास्तविक या विद्यापीठा मार्फत मुक्त व दूर शिक्षण प्रणाली च्या द्वारे अध्ययनार्थीं घडवले जातात. अध्ययनार्थीचे अध्ययनाचे स्वातंत्र्य, विषय निवडीचे स्वातंत्र्य, स्वयं अध्ययनाचे स्वातंत्र्य, स्वयं मूल्यमापनाचे वेळापत्रक ठरविण्याचे स्वातंत्र्य, संमंत्रण वर्गांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य हा मुक्त व दूरशिक्षण प्रणालीचा गाभा आहे. त्यानुसार स्वयं अध्ययन पद्धतीने ज्ञान साधना करणारे विविध ९६ शिक्षणक्रमाचे सुमारे १ लक्ष ३९ हजार २१८ अध्ययनार्थींना या प्रसंगी पदवी प्रदान केली जाणार आहे. सांख्यिकी विश्लेषणानुसार त्यात १५ हजार ३७० पदविकाधारक, ९१ हजार १९७ पदवीधर, ३२ हजार ६४३ पदव्युत्तर पदवीधारक आणि ८ पीएच..डी. संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच यात ८१ हजार ८७० विदयार्थी आणि ५७ हजार ३४८ विद्यार्थिनी पदवीधरांचा समावेश आहे. या समारंभाची महत्वाची वैशिष्टे म्हणजे त्यात १२१ दृष्टीबाधित दिव्यांग बांधवांबरोबरच ३३ कारागृहातील बंदीजनांचाही पदवीधर म्हणून समावेश आहे. शिवाय ६० वर्षांवरील १९५ जेष्ठ नागरिक अध्ययनार्थींही या प्रसंगी पदवी संपादन करून आपल्या ज्ञानात्मकतेची साक्ष देणार आहेत. अभिजात अशा मराठी, संस्कृत व पाली या भाषेबरोबरच हिंदी, उर्दू आणि इंगजीचे देखील अध्ययन स्नातकांनी केल्याचे आपणास दिसून येते. विद्यापीठ स्थापनेच्या १ जुलै १९८९ कृषी दिनापासूनच्या अविरत शैक्षणिक ज्ञानार्जन व ज्ञानदान या कार्यानंदाची व विस्तार कार्याची नोंद घेऊन राष्ट्रकुल परिषदेने दोन वेळा सर्वोकृष्ट जागतिक मुक्त विद्यापीठांचा बहुमान देऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास गौरविले आहे. वर्ग खोल्यात बंदिस्त झालेल्या अध्ययन-अध्यापन प्रणालीच्या भिंतीतून शिक्षण- ज्ञान-कौशल्याला बाहेर काढून स्वयंअध्ययन साहित्यासह पाठ्यपुस्तके, यशवाणी वेब रेडीओ, मासिक संवाद पत्रिका, यशवार्ता, ज्ञानगंगोत्री आणि आता महास्वयंम या दूरदृश्य अध्ययन प्रणाली मार्फत पाठ्यसामग्री विकसित करण्यावर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. संजीव सोनवणे, प्र. कुलगुरू प्रा. जोगेन्द्रसिंह बिसेन यांचे मार्गदर्शनात सर्व अध्यापकवृंद विविध विषय तज्ञांच्या सहकार्याने अध्ययनार्थीशी गुणात्मक संवाद साधत आहेत. यासाठी आतापर्यंत सुमारे २९८७ पाठ्यपुस्तके विद्यापीठाने तयार केलेली आहेत. त्या बरोबरच १५०० पेक्षा जास्त अध्ययन चित्रफितींची निर्मिती देखील केलेली आहे. त्यामध्ये वाचता – वाचताच स्वतःची परीक्षा घेण्यासाठी स्वयंमूल्यमापनाचे प्रश्नही या पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत. आकृत्या, नकाशे, सारणी, कोष्टके, तक्ते, चित्रे, स्मरणात ठेवायचे मुद्दे, सराव प्रश्न, पाठाचा सारांश, अधिक वाचनासाठी संदर्भग्रंथ सूची, तसेच गृह व क्षेत्रीय कार्यानंदासाठी सुद्धा कृतींचा समावेश सहज सोप्या भाषेत केलेला आहे. त्या सोबतच जरूर तेथे कार्यपुस्तिका, शनिवार आणि रविवार अशा सुटीच्या दिवशी जवळच्या अभ्यासकेंद्रावरील अनुभवी तज्ञांचे संमत्रणसत्रेही सल्लामसलतीसाठी आयोजित केली जातात. कवीवर्य कुसुमाग्रजांनी लिहिलेले मुक्त विद्यापीठाचे गीत म्हणजेच मुक्त व दूरशिक्षण प्रणालीचा जाहीरनामाच होय. परंपरेच्या बंदिघरातून सूत्र प्रदान करणारे शिक्षण रुजविणे ही विद्यापीठाची प्रतिज्ञा मुक्त विद्यापीठाच्या अध्ययनार्थींनी ज्ञानाची चिरंतर साधना करून प्रगतीची वाट चोखाळायची आहे. या भौतिक प्रगती बरोबरच न्यायनीतीची चाड बाळगणारे नागरिक निर्माण करायचे आहेत. मांगल्यांची कास धरायची आहे. मुक्त व दूर शिक्षणाचा हा असा सर्व मांगल्याचा वसा घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आपली ३० वर्षाची दीक्षांत पर्वनीची वाटचाल पूर्ण केली आहे. मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या स्वयंप्रेरित अध्ययनार्थीला पडणारे नाना प्रश्न, त्यांच्यापुढे उभ्या राहणाऱ्या विविध समस्यांचे डोंगर याचीही विद्यापीठाला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच विद्यापीठाने गावो-गावी अन शहरो-शहरी अभ्यासकेंद्रे सुरु केली आहेत. ही अभ्यासकेंद्रे अध्ययनार्थींला भयमुक्त करतात, त्यास कार्यक्षमपणे उभे राहण्यासाठी हातभार लावतात. अशा प्रकारे हे अध्ययनार्थीं प्रतिभावंत आणि सर्जनशील समंत्रक, मार्गदर्शक, अध्यापकांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या मानसिकतेत आमुलाग्र बदल होतो. त्यांच्या ठिकाणाचा नुसता स्थायी आळसभावच दूर होतो असे नाही तर अकारण अंगी बाळगलेला अहंकार, वृथाअभिमान, ढोंग व दुराभिमान या सर्व अपप्रवृत्तीना तीलांजली दिली जाते. त्याबरोबरच सहअध्यायी बंधू – भगिनींशी मैत्री जोडता येते. त्यामुळे अभ्यासकेंद्रे ही खऱ्या अर्थाने प्रज्ञा जागृतीचे, नवनिर्माणाचे, प्रशिक्षित होण्याचे, समाधानप्राप्तीचे महत्वाचे ठिकाण म्हणून सार्थ ठरत आहेत . अध्ययनार्थींना मार्गदर्शन करणारे समंत्रकही ज्ञानगंगा घरोघरी हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य साकार करण्यासाठी समर्पण बुद्धीने आपल्या कार्यानंदाला वाहून घेत आहेत. त्यामुळे अभ्यासकेंद्रावरील समंत्रणसत्रात कायम सौजण्याचे आणि सामंजस्याचे वातावरण राहत आले आहे. त्यासोबतच अध्ययनार्थीं ही साधन -वेळ शुचितेची, नित्यज्ञानार्जनातील स्वअनुभवाची श्रद्धा, कौशल्ये, जिद्द, सातत्य, उत्साह आणि क्षमता वृद्धीसाठी नित्यनुतन प्रयत्न करतात. लोकभाषा, ज्ञानभाषा आणि आता अभिजात मराठी भाषा सर्वांचे सांस्कृतिक जीवन संस्कारक्षम करण्यासाठी ३० व्या दीक्षांत समारंभाची पर्वणी ही एक मुक्तीची यशोगाथा आहे. तो एक मुक्त शिक्षण प्रणालीचा जाहीरनामाच आहे. अध्ययनार्थीं स्वत:च ज्ञानदीप होण्याची प्रेरणा जागवेल अशी आश्वासक प्रेरणारूपी भेट सर्वच प्रज्ञावंत पदवी पात्र पदवीधरांना मिळेल. या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !!
सर्व पदवीस विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), राष्टीय शिक्षण परिषद (NCTE), राष्ट्रीय पूर्नवास परिषद (RCI), राष्ट्रीय तंत्रशिक्षण परिषद ( AICT ), महाराष्ट्र शासन, भारत सरकार आणि इतर संविधानिक संस्थांची मान्यता आहे, हे सांगणे न लगे.




