खबरदार….. मी बाभळगावची.. देशमुखांच्या गावची…

खबरदार मी बाबळगावचीय, देशमुखांच्या गावची हाये धक्का मारशील. अशा प्रकारच्या आपल्या सोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशाला एका सत्तरीच्या घरातील वृद्ध् महिलेने चांगलेच सुनावले.ही घटना तशी सामान्य. मात्र या घटनेचे सूक्ष्मपणे आकलन केलं तर त्या वृद्ध महिलेने उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात कुठेतरी तिला भक्कम आधार देणार आहे अशा प्रकारे आश्वासक बोलणे होते. लोकनेते माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती आजही सामान्यातील सामान्य माणसाच्या मन पटलावर कायमच्या कोरलेल्या दिसतात.
राजकीय व्यक्ती म्हणून कै. विलासराव देशमुख यांनी आपले कर्तृत्व राष्ट्रीय पातळीपर्यंत गाजवले. त्याचबरोबर समाजातल्या सामान्य घटकाला त्यांनी आपलंसं केल्याने त्या प्रत्येकाला ते आपलेच नेते वाटत होते. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती तर भरून निघालीच नाही. परंतु सामान्यांच्या मनात कुठेतरी त्यांच्याविषयीची आदराची भावना खोल मनात घर करून बसली आहे.
विलासराव देशमुख साहेबांचे अनेक गुण होते त्यातला सर्वाधिक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांनी कधीच कुणाला आपल्या किंवा विरोधी पक्षातील असो, ओळखीचा असो की अनोळखी असो, जातीतला असो की परजातीतला असो, कोणत्याही धर्माचा, पंथाचा, भाषेतला असो की वर्गातला असो, शिक्षित असो वा निरक्षर सर्वांना समान वागणूक दिली. त्यांनी जनसेवेचा वसा शेवटपर्यंत कधीही सोडला नाही. त्यामुळेच अशा वृद्धत्वाकडे झुकलेल्या सामान्य महिलेला त्यांच्या स्मृती देखील आश्वासक वाटतात. सामान्यांच्या मनात कै. विलासरावजींची हसरी प्रतिमा कायम असून ती कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या प्रसंगात स्मृतीच्या रुपाने जागी होत जाते.
लातूर जिल्ह्यातील देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील किंवा माजी खासदार शिक्षण तज्ञ डॉक्टर जनार्दन वाघमारे आणि त्यानंतरच्या काही लोकप्रतिनिधींनी राजकीय समृद्ध वारसा आणि एक स्वतंत्र राजकीय संस्कृती निर्माण केली. किंबहुना आपण त्याला राजकारणातील लातूर पॅटर्न असे देखील म्हणू शकतो. त्या सुसंस्कृत राजकारण्यांनी वैयक्तिक पातळीवर कधीही आरोप प्रत्यारोप केले नाहीत. म्हणूनच त्यांच्याविषयी जनामनात असलेले आदराचे स्थान आणि त्यांना लाभलेला जनाधार हा खऱ्या अर्थाने लोकनेत्याला मिळालेला मान आणि कार्यकर्त्याचा सन्मान या दोन्हीशीही निगडित होता. परंतु अलीकडे हे सगळे चित्र बदललं, नेतेही आणि कार्यकर्तेही दोघेही रात्रीतून आपले विचार बदलू लागले, आपली राजकीय धोरणे आपल्या स्वार्थासाठी अस्तित्वाशी निगडित करू लागले आणि स्वार्थी वृत्तीतून राजकारणाच्या पटलावरती जी आकडेमोड होऊ लागली तिची गोळाबेरीज जाती, धर्म, पंथ याच्याशी निगडित होऊ लागल्याने कुठे ते नेते आणि कुठे त्यांचा अभिमान अशी स्थिती आता आपल्यापुढे निर्माण झाल्याचे दिसून येते.



