मशाल होऊन पेटते मराठी…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आमचे मित्र आनंद यांनी मराठी भाषेवर खूप सुंदर कविता केली आहे ती खास आपल्यासाठी..
सप्तस्वरांच्या लेण्यांतून, सजते ही मराठी
अस्मानीच्या तेजावरती, उजळते मराठी
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, गर्जते मराठी
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, गर्जते मराठी..
संतांच्या या अभंगातून, पाझरते ही मराठी
वीरांच्या या तलवारीची, ललकार ही मराठी
मातीतल्या या घामाचा, सुगंध ही मराठी
अन्यायाला गाडणारी, आग ही मराठी!
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, गर्जते ही मराठी…
फुले-शाहू-आंबेडकरांचा, विचार ही मराठी
समतेच्या या संगराचा, निर्धार ही मराठी
शिवबाच्या वाघनखांचा, वार ही मराठी!
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, गर्जते ही मराठी…
बोली लडिवाळ अन्, थोर ही मराठी
शास्त्रांमध्ये कणखर अन्, रानातील मोर ही मराठी
दुनियेच्या या नकाशावरती, मोहर ही मराठी
माझ्या मराठी मातीची, शान ही मराठी!
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, गर्जते मराठी
असंख्य आले, असंख्य गेले, उरली ही मराठी
लाखांच्या या गर्दीमध्ये, वेगळी ही मराठी
रक्ताच्या या थेंबाथेंबात, सळसळते मराठी
महाराष्ट्र-द्रोहींना जाळण्या,आता
‘मशाल’ होऊन पेटते मराठी!
मशाल’ होऊन पेटते मराठी!
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, गर्जते मराठी..



