राजर्षी शाहूचा सिनिअर अंडर ऑफिसर हितेश सुरवसेचा पथसंचलनात सहभाग

लातूर :शिव छत्रपती शिक्षण संस्था संचलित राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील सिनिअर अंडर ऑफिसर हितेश सुरवसे याने 26 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्र संचलन संघातून यशस्वी सहभाग नोंदवला.
कर्तव्यपथ, नवी दिल्ली येथे मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य परेडमध्ये हितेशने एनसीसी महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या टीममध्ये मुख्य संचलनासाठी सहभाग घेत महाविद्यालय व ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूर यांचा नावलौकिक उंचावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष नवगण, अॅडम ऑफिसर कर्नल वाय. बी. सिंह, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे तसेच लेफ्टनंट महेश वावरे व लेफ्टनंट अर्चना टाक यांनी हितेश सुरवसे याचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना कर्नल संतोष नवगण यांनी कॅडेट्सनी एनसीसीमधील प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून आपले भवितव्य घडवावे व देश-समाजसेवेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन केले. एनसीसीमधील तीन वर्षांचा कालावधी वाया न घालवता स्पर्धा परीक्षांद्वारे सक्षम अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
“आजचे युग स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत आपले स्थान भक्कम करायचे असेल, तर कॅडेट्सनी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकसित करून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी,” असेही त्यांनी प्रतिपादन केले.
या सत्कार समारंभास अॅडम ऑफिसर कर्नल वाय. बी. सिंह, लेफ्टनंट महेश वावरे, बाजीराव पाटील, संजय चिकने, आर्मी स्टाफ तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.



