देश -विदेश

ऑपरेशन सिंदूर: सुरक्षा विभागांच्या समन्वयाच्या जोरावर भावी युद्धाची नांदी

ऑपरेशन सिंदूर याबद्दल आपण लिहावं असं अनेक मित्रांनी सुचवले होते. पण या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन करण्यासाठी सामरिकशास्त्राचे अभ्यासक डॉ. देवेंद्र विसपुते हे योग्य असल्यामुळे त्यांनी या विषयावर केलेलं अभ्यासपूर्ण विवेचन खास आपल्यासाठी देत आहोत.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. नियंत्रण रेषेवरील आणि पाकिस्तानच्या आत खोलवर असलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्याचे उद्दिष्ट होते. हा एक कॅलिब्रेटेड, त्रि-सेवा प्रतिसाद आहे जो अचूकता आणि व्यावसायिकतेवर केंद्रित होता. भारतीय सेनादलांचे हे यश कारगिल पुनरावलोकन समितीच्या शिफारशीनुसार भारतीय सेनादलांच्या रचनेत करण्यात आलेल्या सुधारणांचाही हा परिपाक आहे.
पाकिस्तानने यापुढे एखादी आगळीक केली, तर त्याला धडा शिकवण्याची तयारी भारतीय सैन्य खूप आधीपासून करीत होते. 2022 मध्ये सिरसा लष्करी तळावरून एक विस्फोटके नसलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानी प्रदेशात अपघाताने फायर झाले होते…आणि सात मिनिटातच ते क्रँश झाले. यावेळी भारताने हे accidentally – ‘चुकून’ झाल्याचे सांगून आपल्या काही अधिकाऱ्यांवर कारवाईही केली होती. हा कदाचित पाकिस्तानी यंत्रणांचा प्रतिसाद (Response Time) जोखण्याचा प्रयत्न होता…
…22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हातात घेतले आणि 7 में च्या मध्यरात्री पाकिस्तानातील जैश ए महंमद आणि लष्करे तोयबाच्या 9 तळांवर हल्ले चढवून जबरदस्त नुकसान केले. यात कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याचे कुटुंबही मारले गेले.
2002 मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांची पाकिस्तानमध्ये इस्लामी अतिरेकी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्या संबंधांचा मागोवा घेत असताना अपहरण करून 1 फेब्रुवारी 2002 रोजी हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड अब्दुल राऊफ अझहरदेखील भारताच्या ऑप. सिंदूरचा बळी ठरला. अमेरिकन नागरिक आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी खरे तर याबद्दल भारताचे आभार मानावयास हवे होते.
अझहरच्या मृत्यूकडे केवळ भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातच नव्हे तर त्याच्या जैश ए महंमदने निर्घृणपणे मारलेल्या अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लसारख्या पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनेही एक महत्त्वाची घटना म्हणून पाहिले जाते. अमेरिका आणि वैश्विक पत्रकारिता यासाठीही हा बदला ठरावा. 24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सचे विमान आयसी – 814 च्या अपहरणामागील तो प्रमुख सूत्रधार होता.
ब्रह्मोसची कामगिरी
पाकिस्तानच्या 11 विमानतळांवर 9 मे रोजी ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या साह्याने हल्ले चढवून भारत – पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता पाकिस्तानी वायुसेनेचे इतके नुकसान केले की, ती पाच वर्षे मागे पडली. यात पाकी वायुसेनेचा 20 % नुकसान केल्याच्या दावा भारताने केला आहे.
भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानी वायुसेनेचे तसेच पाकिस्तानी न्यूक्लिअर कमांड सेंटर विस्कळीत करण्यात भारताला जबरदस्त यश मिळाले. इतकेच काय पाकिस्तानी अणुबॉम्बचा साठा असलेली दोन केंद्रही भारताने बऱ्यापैकी निस्तनाबूत केली आहेत. आणि याबद्दल समाज माध्यमांमध्ये प्रचंड माहिती प्रसूत झाली असून त्याचे पुरावे भारत पाकिस्तान आणि जगातील जनतेला मिळालेले आहेत. पाकिस्तानी अणू साठ्यांनाही लक्ष बनवून किराणा हिल्स व छागाई हिल्सवरही ब्रम्होस मारा करून ही ठिकाणे न्युट्रल केल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय सेनादलाने भविष्यातील युद्ध लढले. त्यांनी निर्धारित अशी सर्व उद्दिष्टे साध्य केली. अमेरिकेन सैन्य अकादमीच्या शहरी युद्ध अध्ययन विभागाचे माजी प्रमुख जॉन स्पेन्सर यांनी असे नमूद केले आहे की, भारताने या दोन-तीन दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानला तर चिटपट केलेच पण अप्रत्यक्षपणे हा चीनचा पराभव होता कारण पाकिस्तान ही लढाई चीनची पडछाया म्हणून लढत होता.
भारताला शेजारी देशांशी संघर्षात गुंतवणे ही चीनची बरीच जुनी खेळी आहे. ती “मोत्यांची माळा” (String of Pearl) नावाने ओळखली जाते. कारगिल संघर्षामागेही चीनच होता. पण ही बाब अद्याप कोणी ध्यानात घेतलेली नाही.
भारत पाकिस्तान दरम्यानची 7 ते 9 मे 2025 ची ही छोटेखानी लढाई किंवा युद्धच होते. हे एकप्रकारचे Surgical Campaign होते. भारताच्या हल्ल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या डीजीएमओने याचना केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर तात्पुरते स्थगित केले. भारतासमोर इस्राएल – हमास आणि रशिया – युक्रेन संघर्ष ही उदाहरणे होती. भारताला वर्षानुवर्ष अशा संघर्षात गुंतून पडावयाचे नव्हते, कारण ते चीनलाच नव्हे – तर जगातील अनेक प्रगत देशांना भारत अस्थिर हवा आहे.
भारताची स्वबळावर लढाई –
भारताने ही लढाई स्वबळावर लढवली आणि आपल्या लष्करी शक्तीच्या जोरावर जिंकलेली आहे. हे पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञान हवाई युद्ध, उपग्रह, स्वयंचलित मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर लढलेली लढाई होती. प्रामुख्याने या लढाईत भारत – रशियानिर्मित ब्रह्मोस क्षेपणास्त्र आकाश आणि आकाशतीर क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा यांचा बोलबाला होता.
भारतीय सेनादलांनी चार-पाच प्रकारच्या रडार यंत्रणांचा अतिशय कुशलतेने समन्वय साधला. आपल्या क्षेपणास्त्रे व विमानांनी पाकिस्तानातील दहशतवादी केंद्र आणि विमानतळासह मुख्य लष्करी आस्थापनांना यशस्वीपणे लक्ष बनवले.
भारताला खरे तर तिरंगी शत्रूशी सामना करावा लागला. कारण पाकिस्तानने स्वबळावर ही लढाई लढलेली नाही तर त्याला चीन आणि तुर्कस्तानच्या लष्करी बाळाचा आणि तंत्रज्ञानाचा आधार मिळाला काही तुर्की व चिनी तंत्रज्ञही भारताच्या हल्ल्यात मारले गेल्याची माहितीही समोर आली आहे.
या लढाईत भारताने पाकिस्तानवर केवळ लष्करी अधिक्य मिळवले नाही, तर भारतीय आणि जागतिक जनमतही आपल्या बाजूने प्रथमच यशस्वीपणे वळविले. नूरखान एरबेस रावळपिंडी, मुरीद, सरगोधा, भोलारी अशा 12 वायूतळांवर हल्ले चढवून भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी पाच वर्षे मागे ढकलले आहे.
यात पाकिस्तानचे आण्विक कमांड सेंटर विस्कळीत करण्यात आपण यश मिळवले आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची अणूबाँब वापराची धमकी पाकिस्तानातून मिळालेली नाही. चिनी बनावटीची H Q क्षेपणास्त्र लॉन्चर यंत्रणा आणि अनेक रडार केंद्रे नष्ट करून पाकिस्तानी सैन्याला भारतीय सेनादलांनी एक प्रकारे पंगू बनवले आहे.
‘सीडीएस’ च्या माध्यमातून समन्वय
हे सर्व तिन्ही भारतीय सेनादले, सीमा सुरक्षा दल, गुप्तहेर खाते व इसरो आणि डीआरडीओ यांच्या समन्वयाने शक्य झाले. पण त्यामागेही एक प्रकाशात न आलेली बाब आहे, ती म्हणजे सीडीएसची निर्मिती होय. सीडीएसच्या माध्यमातून समन्वय निर्माण झाल्याने भारताच्या युद्धनीतीची परिणामकारकता वाढली आहे.
संयुक्त सेनादल प्रमुख (सीडीएस) किंवा Chief of Defence Staff या पदाच्या निर्मितीमुळे हे अत्युच्च्य पातळीवरील समन्वय साधने सोपे झाले. याकडे मात्र कोणत्याही माध्यमाचे लक्ष गेलेले नाही. सीडीएसमुळे सर्वांकष, समन्वित आणि एकीकृत निर्णय तातडीने घेणे शक्य झाले. जन. बिपिन रावत यांनी भूषविलेल्या या पदावर सध्या जन. अनिल चव्हाण कार्यरत आहे.
..ही कारगिल पुनरावलोकन समितीची शिफारस –
1999 च्या कारगिल युद्धानंतर स्थापन झालेल्या के. सुब्रम्हण्यम यांच्या नेतृत्वाखालील कारगिल पुनरावलोकन समितीने (KRC) भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अनेक प्रमुख शिफारसी केल्या. यामध्ये गुप्तचर माहिती गोळा करणे, सीमा व्यवस्थापन वाढवणे, लष्कराच्या कमांड आणि नियंत्रण संरचनेचे नूतनीकरण करणे आणि स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचा प्रचार करणे, तसेच संघर्षाच्या काळात माध्यमांशी संबंध आणि माहिती प्रसारित करणे यांचा समावेश होता.
विद्यमान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे कारगिल पुनरावलोकन समितीचे प्रमुख के. सुब्रम्हण्यम यांचे पुत्र आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेच्या सर्व पैलूंचा समावेश करण्यासाठी आणि वरिष्ठ भागधारकांना संबंधित माहिती प्रसारित करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषद (NSC) मजबूत करणे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) नेमणे यासारख्या शिफारशी या समितीने केल्या होत्या. 2014 पासून आय.बी.चे माजी संचालक अजित डोवाल यांची एनएसए म्हणून नियुक्ती करण्यात आली.
समितीने देशाची देखरेख क्षमता वाढवण्याची शिफारस केली. विशेषतः उपग्रह प्रतिमा आणि मानवरहित हवाई वाहने (UAV) अद्ययावत करण्यात आली आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेतील हे संरचनात्मक बदल आज लाभदायक ठरले आहेत, ही बाब ध्यानात घेण्यासारखी आहे.
पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय व सैन्याने आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नव्हे – तर पंजाब, आसाम आणि नागालँडमध्ये कट्टरतावादी आणि जातीयवादी धर्तीवर विध्वंसक प्रचार करून दहशतवादाचा प्रसार केलेला आहे. आयएसआयने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतातील मादक पदार्थांचे तस्कर आणि आंतरराष्ट्रीय कट्टर इस्लामिक गटांशी हातमिळणी केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या आधी पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासचे दहशतवादी आले होते, ही बाबही आता उघड झाली आहे.
आज पाकिस्तानात अमेरिका आणि राष्ट्र संघ यांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या यादीत किमान 150 संघटना आणि व्यक्ती आहेत. त्यामुळे पाकिस्तानला दहशतवादाच्या Black List मध्येच टाकण्याची गरज आहे.
त्यामुळेच भारताने पाकिस्तानला Diplomacy किंवा कुटनीतीच्या आखाड्यात पछाडण्यासाठी एक जोरदार राजनैतिक खेळी खेळली आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात पाकिस्तानची भूमिका जगासमोर उघडकीस आणण्याच्या उद्देशाने सर्वपक्षीय शिष्टमंडळे 30 हून अधिक देशांना भेट देत आहेत. हे भारताचे एक मोठे राजनैतिक आक्रमण सुरू झाले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षात भारताने प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीला एक नवे शस्त्र उपसले आहे…. ते म्हणजे जलास्त्र होय. भारताने पहलगाम हत्याकांडासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आणि प्रत्युत्तर म्हणून “सिंधू पाणी करार – 1960 (IWT) स्थगित केला त्यामुळे पाकिस्तानात मोठे जलसंकट निर्माण झालेले आहे. पाकिस्तान भारताच्या कदाचित सर्व शस्त्रांशी लढू शकेल. पण या जलास्त्राशी मात्र नाही. पाकिस्तानने भारताशी हे छुपे युद्ध तत्काळ बंद करून भारतातील दहशतवादी कृत्यांबद्दल माफी मागून दाउद व हाफिजसारखे भारताचे गुन्हेगार भारताला सोपविले नाहीत, तर पाकिस्तानचे बलुचिस्तान, सिंध आणि पख्तुनिस्तान असे चार तुकडे लवकरच पडतील. भारताचे उद्दिष्ट्य मात्र पाकव्याप्त काश्मिरचे भारतात विलीनीकरण हेच आहे. पाकिस्तानला चिरडण्याची अशी संधी भारताने गमावू नये.

डॉ देवेंद्र विसपुते
प्रा. डॉ. देवेंद्र विसपुते,
प्रमुख, संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभाग.
विद्यावर्धिनी महाविद्यालय,
धुळे
9423979145

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/