
मोटारसायकलींना लावण्यात येत आहे सुरक्षित तार
नंदुरबार– मकरसंक्रांत सन राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिवशी मोठया प्रमाणावर पतंगोत्स़व साजरा केला जातो. पतंगांना उडवण्यासाठी नायलॉन मांजा बहुतेक सगळे जण वापरतात. या मांजामुळे अनेकदा जीव देखिल गमवावा लागला आहे. यापासून सुरक्षित राहण्यासाठी वाहनधारक विविध प्रकारच्या उपाययोजना करत होते. यावर चांगला उपाय ठरेल असा जुगाड नंदुरबारमध्ये प्रविण मोरे या तरुणाने शोधला आहे. नायलॉनच्या मांज्यापासून वाहनचालक स्वतःचा बचाव करु शकतील यासाठी त्यांने मोटारसायकल समोर तार लावून मांज्यापासून वाहनधारक कसा बचाव करु शकतात याचे प्रात्यक्षिक पोलिसांसमोर करून दाखवले.
त्याच्या या जुगाडाची दखल घेऊन पोलिसांनी प्रत्येक वाहन चालकांनी शक्य़ असेल तर अशा पध्दतीने आपल्या वाहनास तार लावावी,असे आवाहन करण्यात आले.
मकर संक्रांतीला आकाश पतंगांनी आच्छादले जाते,पंतगांची काटाकाटीनंतर काट होणाऱ्या पतंगांमुळे दरवर्षी पक्षी जख्मी होण्याच्या घटनांमध्ये वाढत होत आहे. विविध शहरांमध्ये मांज्यापासून वाहन चालकांचे पाय,हात व मान कापले जाण्याच्या घटना घडल्या आहेत. ते घडू नये,यासाठी मोटारसायकलींना तार लावण्याचा पर्याय शोधून काढला असून नंदुरबारच्या नागरीकांनी आपल्या गाडीच्या हँडलला उंच तार लावून घेतली तर या वाहनचालकांना सुरक्षित राहता येणे शक्य़ आहे. तार हँडलला लावून देण्यासाठी साधारण शंभर रुपये खर्च येत असला तरी वाहनचालक टूव्हीलरला तार लावून घेत आहेत. वाहतूक पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलिस हवालदार दिनेश वळवी, जिग्नेश पाडवी यांच्या पथकाने अनेक भागात जावून जनजागृती सुरु केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.



