Special Story

नीटसह स्पर्धा परीक्षांवरील वाढता संशय?

कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेच्या पेपर फुटीचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात होत आहेत. या पाठीमागे यंत्रणांपेक्षा मानवी वृत्ती आणि हस्तक्षेप हा अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पेपर फुटीचे ही आव्हाने हजारो युवकांची स्वप्न धुळीस मिळवत असून याच्यावर कसा पायबंध घालावा हा खरा प्रश्न आहे.

NEET पेपरकांड समोर आल्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. इतक्या मोठ्या स्तरावर पेपरफुटी आणि गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांमुळे अनेकांना वाटू लागले आहे की, हे फक्त एका वर्षाचे प्रकरण नसून अशा प्रकारचे जाळे अनेक वर्षांपासून सक्रिय असू शकते. कारण अशा गैरव्यवहारामागे एजंट, पैशांची साखळी, आतील माहिती देणारे लोक आणि प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबे आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर बनवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा आधार घेत असतील, अशी चर्चा समाजात सुरू आहे. विशेषतः स्वतःचे हॉस्पिटल किंवा मेडिकल व्यवसाय पुढे चालवण्यासाठी “वारस डॉक्टर” तयार करण्याची मानसिकता काही ठिकाणी दिसून येते. मेहनतीपेक्षा पैसा आणि ओळखींचा वापर करून प्रवेश मिळत असेल, तर ही शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे.

आता प्रश्न फक्त NEET पुरता मर्यादित राहिलेला नाही. MPSC, तसेच महानगरपालिका, सरकारी भरती, कंत्राटी नोकऱ्या आणि इतर स्पर्धा परीक्षांबाबतही सामान्य तरुणांच्या मनात संशय निर्माण होत आहे. कारण गेल्या काही वर्षांत अनेक भरती प्रक्रिया, पेपरफुटी, गुणांमध्ये गोंधळ, बनावट प्रमाणपत्रे आणि दलालांच्या चर्चांमुळे युवकांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. प्रत्येक ठिकाणी गैरव्यवहार झाला असे म्हणणे योग्य नाही, पण सतत समोर येणाऱ्या घटनांमुळे “काय सांगता येते?” असा प्रश्न तरुण विचारू लागले आहेत.

या सगळ्यात सर्वात मोठा अन्याय होतो तो प्रामाणिक आणि मेहनती विद्यार्थ्यांवर. ग्रामीण भागातील, गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अनेक विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेतात, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात. पण जर काही लोक पैशाच्या जोरावर किंवा गैरमार्गाने पुढे जात असतील, तर त्या कष्टाळू विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास तुटतो.

यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य, अन्यायाची भावना आणि “मेहनत करूनही उपयोग नाही” असा विचार वाढू शकतो. याहून गंभीर बाब म्हणजे अयोग्य लोक जर डॉक्टर, अधिकारी किंवा प्रशासनात पोहोचले, तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होऊ शकतो.

“यहाँ तो हर चीज बिकती है…” ही ओळ आजच्या काही भ्रष्ट व्यवस्थांकडे पाहताना खरी वाटू लागली आहे. देशाच्या भविष्यासाठी परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि प्रामाणिक असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्यांचा विश्वास तुटणे हे कोणत्याही पेपरफुटीपेक्षा मोठे नुकसान आहे.

अशोक सज्जनशेट्टी
पिंपरी चिंचवड,
वलांडीकर,
९८२२७७४५८९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/