नव्या पिढीचे मार्गदर्शक डॉ किरण ठाकूर

डॉ. किरण ठाकूर एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, उत्कृष्ट उपसंपादक, तज्ञ संवादक, मार्गदर्शक, चांगला मित्र अशा अनेक अर्थाने सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व 77 व्या वर्षी नुकतच काळाच्या पडद्याआड गेलं. डॉ. किरण ठाकूर यांनी त्यांचे कारकीर्द पुण्यातील पुणे डेली या वृत्तपत्रात आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेसाठी उपसंपादक आणि प्रतिनिधी म्हणून सुरू केली. हे काम कुठल्याच प्रकारच्या तांत्रिक प्रगती शिवाय त्यांना करावे लागत असल्यामुळे त्यांनी अत्यंत कष्टप्रद पद्धतीने या आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण पाडले पार पडल्या.
त्यांना जबाबदाऱ्या आणि जोखीमा कशा सांभाळायच्या याची पूर्ण जाण होती. त्यामुळेच त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेलं कार्य असो किंवा 2001 पासून रानडे इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक म्हणून केलेलं कार्य असो त्या सर्व कार्याला एक उंची प्रदान करण्यात त्यांचा मोठा हातखंडा राहिला आहे. पुणे विद्यापीठात काम करताना अनेक विद्यार्थी, संशोधकांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून एक चांगले होतकरू आणि संशोधनाला नवी दिशा प्राप्त करून देण्यात यश मिळवले. त्यांची एक खास शैली जी विद्यार्थ्यांना नेहमी आकर्षित करत असत. त्यामुळेच विद्यार्थी त्यांच्या तासांना मोठ्या संख्येने हजेरी लावत. केवळ अभ्यासू ज्ञानावर न विसंबून राहता प्रात्यक्षिक ज्ञानावर त्यांचा विशेष भर असे. म्हणूनच त्यांनी अबोल विद्यार्थ्यांना बोलकं केलं, ज्याने कधीच काही लिहिलं नव्हतं त्यांना लिहिता केलं आणि त्यातून लेखनातील बारीक-सारीक धागेदोरे आणि कंगोरे कसे उलगडावेत त्याचं प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना करून दिलं.
त्यांचा विश्वास वादापेक्षा संवादावर अधिक होता म्हणून ते या विभागांमध्ये अधिक रमून जायचे. परिणामी विद्यार्थी सुद्धा गुरुस्थानी म्हणून आदरणीय डॉक्टर किरण ठाकूर सरांना मोठा मानसन्मान द्यायचे. त्यांनी खचून न जाता, रडत न बसता आहे त्या परिस्थितीवर मात करत कसे लढत राहायचं हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबवला होता. पत्रकारितेत असताना त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील सांभाळली होती. त्यांनी आपल्या लेखणीतून अनेक ऐतिहासिक दस्तावेज निर्माण केल्या असून आधुनिकतेचा समावेश त्यांच्या लेखनात आपल्याला जागोजागी दिसून येतो. इंटरनेटच्या माध्यमातून सुरू झालेल्या प्राथमिक वेबअवृत्त्या हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. म्हणजे ते सुरुवातीपासूनच टेक्नोसॅव्ही होते असे आपण म्हणू शकतो. शिवाय रानडे इन्स्टिट्यूट अर्थात पुणे विद्यापीठातून आपली सेवा समाप्तीनंतर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग पुणे शहरातील आणि इतर ठिकाणच्या विविध महाविद्यालयांमध्ये सुरूच ठेवला होता. त्यांच्या ह्या ज्ञानदानाचे कार्य विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. त्यांच्या जाण्याने अनेक विद्यार्थ्यांना आज पोरकेपणाची भावना जाणवते आहे. डॉ. किरण ठाकूर यांना आमच्या वतीने देखील विनम्र आदरांजली



