लेख / काव्य

मूल्याधिष्ठित पत्रकारितेची गरज

दर्पण दिनानिमित्त

आज सहा जानेवारी अर्थात मराठी पत्रकार दिन, बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठीतील वृत्तपत्र सुरू केले .त्यानिमित्त राज्यात दर्पण दिन साजरा केला जातो.
सुरुवातीच्या कालखंडाचा आणि स्वातंत्र्य कालावधीतील पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर कालावधीतील पत्रकारिता अशी ठळक वर्गवारी करून आपण पत्रकारितेच्या मूल्यात्मक गोष्टी कथन करू शकतो. परंतु वैश्विकीकरणानंतर आणि इंटरनेटच्या आगमनानंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात जे प्रचंड बदल झाले आहेत. ज्या प्रचंड उलथापालथी झाल्या आहेत त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या या क्षेत्रात तर प्रचंड प्रगती झाल्याचे दिसून येते, गुणात्मक प्रगती झाल्याच्या दिसून येते, तितक्याच किंवा त्यापेक्षाही अधिक प्रमाणात मूल्यात्मक दृष्टिकोनातून ऱ्हास झाल्याचे आपल्या निदर्शनाचे येईल.
सर्वसामान्यांच्या हातात समाज माध्यमांच्या माध्यमातून पत्रकारितेचे ही शक्ती पोहोचली परंतु या शक्तीचा वापर कसा आणि कितपत करायचा याचे भान नसणारे बेभान पत्रकार समाज माध्यमावर पत्रकारितेच्या नावाखाली धुडगूस घालत आहेत. त्यामुळे संबंध पत्रकार आणि पत्रकारिता वेठीस धरली जात आहे. अशिक्षित, अप्रगल्भ अशा या समाज माध्यमावरील पत्रकाराने काही खूप चांगल्या गोष्टींमध्ये आपले योगदान दिले आहे. ही बाब देखील आपल्याला नाकारता येत नाही. परंतु संपूर्ण कांदे खराब करण्यासाठी एक नासका कांदा पुरेसा ठरतो तसे अशा बेभान सुटलेल्या पत्रकारांमुळे पत्रकारितेवर काळे ढग जमा झाले आहेत. एकीकडे पत्रकारांचं आणि त्यांच्या लेखणीचं स्वातंत्र्य जाहिरातदार आणि वृत्तपत्र मालकांनी हिरावून घेतल आहे. त्यामुळे पत्रकारांना जे वाटतं ते लिहिण्याचं स्वातंत्र्य तर आता राहिलेलं नाही, शिवाय त्याला जोड मिळाली आहे ती सवंग लोकप्रियता मिळवणाऱ्या काल्पनिक पत्रकारितेची.
दिवस दिवस फिरून बातम्या गोळा करणारे पत्रकार आणि टेबलवर बसून बातम्या लिहिणारे पत्रकार, यांच्यामध्ये आता जमीन आसमान चे अंतर निर्माण झाले आहे. म्हणून पत्रकारितेतली मूल्य, तत्व ही पूर्णपणे काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी समाज माध्यमावरील बेभान पत्रकारांनी थोडीशी समज दाखवण्याची आणि अशा पत्रकारांना प्रशिक्षित करण्याची वेळ आणि जबाबदारी ही ज्येष्ठ पत्रकारांची आहे असं मला वाटते. कारण पत्रकार आणि पत्रकारिता या दोन्ही गोष्टी अत्यंत पवित्र कार्य मानल्या जातात. समाजातला एक वर्ग आजही या दोन्ही गोष्टींना मानतो आणि म्हणूनच आपल्याच जातकुळीत निर्माण झालेली व्याधी आपल्या शरीराला झालेल्या व्याधीप्रमाणे व्याधीवरील उपचाराप्रमाणे पत्रकारितेतील अशा दूषित अंगांवर आपल्याला उपचार करावे लागणार आहे.म्हणून वरिष्ठ आणि ज्येष्ठ पत्रकारांनी अशा पोटसुळ उठलेल्या पत्रकारांवर वचक ठेवून त्यांना एकतर पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे नाहीतर त्यांना पत्रकारितेपासून परावलंबित करावे. हे पत्रकारितेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
पत्रकार 21 व्या शतकात स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढतोय त्याचबरोबर ते दुसरीकडे बातमीला न्याय देण्याचा आहे प्रयत्न करत आहेत. मात्र या दोन्हीही गोष्टीत त्यांना तारतम्य ठेवता येत नाही. त्यामुळे पत्रकारिता ही केवळ भाटगिरी बनल्याचे आरोप पत्रकारितेवर होताना आपण बघतोय.
मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना आपण आज तरी समाजातले जबाबदार घटक म्हणून त्यांच्या इतकी मूल्य, प्रामाणिकपणा आपण आपल्या बातमीमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करून आपणा सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
प्राध्यापक शिवशंकर पटवारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/