
*मानवी संवेदना आणि भावना संवाद रूपाने व्यक्त करून देणारी कार्यशाळा*
नागपूर: समुदायात जीवन जगत असताना व्यक्तीकडून ज्या प्रकारच्या कार्याची अपेक्षा केली जाते ते कार्य म्हणजे तिची भूमिका होय. सामाजिक भूमिका म्हणजे विशिष्ट गटात किंवा परिस्थितीत व्यक्तीकडून अपेक्षित असलेली वर्तनबद्ध कार्याची रचना होय. भूमिका म्हणजे वर्तन बंधांचा संच असून त्यात सामाजिकदृष्ट्या संमत समुदायात विशिष्ट स्थानाशी संलग्न असणाऱ्या व्यक्तीची कर्तव्य व हक्क यांचा यात समावेश असतो. व्यक्तीकडून अपेक्षित असलेले वर्तन हे कर्तव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यक्तीने समूहासाठी स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या म्हणजेच व्यक्तीची भूमिका होय व या
भूमिकेवरून व्यक्तीच्या कार्याचा दर्जाही ठरत असतो. भूमिका हा दर्जाचा कार्यात्मक पैलू होय. सामाजिक जीवन सुरळीत असणे व नेमून दिलेले कार्य व्यवस्थितपणे पार पाडणे, यासाठी व्यक्तीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरते. भूमिका जणू कर्तव्य आणि हक्काची मालिकाच असते. व्यक्तींमधील परस्पर संबंधाचे व कार्याचे प्रतिनिधित्व या भूमिकेच्या माध्यमातूनच घडत असते. भूमिकेला आवश्यक असलेली मनोवृत्ती असल्याशिवाय ती व्यक्ती आपल्या वाट्यास आलेली भूमिका व्यवस्थित पार पाडू शकत नाही, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. अपेक्षित वर्तनासाठी अनुकूल मनोवृत्ती आणि आवश्यक तयारी करून घेण्यासाठी त्या व्यक्तीची अंतर्मनातील भूमिका ही महत्त्वाची ठरत असल्याने नेमून दिलेल्या भूमिका अपेक्षेनुसार पार पडत असतील तर समाज जीवनाचा व परिवर्तनाचा वेग ही वाढत असतो. परिवर्तनाचे वारे जोमाने वाहत असते, परंतु यात मतभेद, शंका, द्वेष असल्यास संघर्ष घडतात. तसेच पार पाडत असलेल्या भूमिका मधूनही परिवर्तनाच्या वाटेत अडथळे निर्माण होतात. कधीकधी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याबाबत इतरांकडून आलेल्या अनुभवाबद्दल अथवा अपेक्षांबद्दल
व्यक्तीच्या मनात संघर्ष असतो. त्यामुळे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या बाबत असलेली गोंधळ आणि मतभेद यामुळे संघर्षाची ही परिस्थिती कधी कधी निर्माण होत असते.
कर्तव्य पार पाडत असताना व्यक्तीच्या अनेक भूमिका व पैलू तसेच अंतर्मनाला भिडणारे अनुभव हेही भूमिकेच्या दृष्टीने व समाधानकारकपणे काम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत असतात.
व्यक्तीचा दर्जा हा केवळ त्याला प्राप्त होणाऱ्या आर्थिक निकषाद्वारे ठरत नसतो, तर त्यांनी निभावलेली सामाजिक दृष्टी व कर्तव्य यावरही ठरत असतो. यावरूनच त्या व्यक्तीला आपण एक समाजाचे महत्त्वाचे घटक आहोत व आपले कामही महत्त्वाचे आहे, याची जाणीव होत जाते आणि या जाणीवेतूनच कर्तव्य प्रयत्नांच्या दृष्टीने चांगले बदल घडत असतात. सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्य करणाऱ्या घटकाचा सेवाभाव हा महत्त्वाचा असून मानवी वेदनांशी व वेदनांतून मुक्ती करण्याच्या महत्त्वाच्या कार्यात हा विभाग कार्यरत असल्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकासाठी हा विभाग मानवसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, हे नाकारून
चालणार नाही. या विभागातील प्रत्येकाची भूमिका ही महत्त्वाची ठरत असते व अटीतटीच्या प्रसंगी अथवा कोणत्याही सोयी सुविधा नसलेल्या ठिकाणी सेवा बजावताना आलेले अनुभव हे मानवी मनाला समृद्ध करत असतात. सेवेतून मिळणारे अनुभव हे मानवी सेवांचे असले की या अनुभवांचा दर्जा प्रत्येक मानवाच्या मनात उच्च स्थानी प्रतिबिंबित झालेला असतो. काही प्रसंगी आपल्या भूमिकेतून घडणारे नेतृत्व व त्यातून आलेले अनुभव हे मानवी मनाला सुखद करीत असतात व कार्यकर्त्यांना आलेल्या अडचणींच्या वेदनाही दूर करीत असतात. आपण जाणतो की, प्रत्येक कार्यात नेतृत्वाची, गुणांची भूमिका ही फार महत्त्वाची असते. भावना आणि अंतरंग समजल्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीतील अनुभव हे मानवाला परिस्थितीशी लढून जगण्यासाठी समृद्ध करीत असतात तसेच जगण्याची प्रेरणाही देत असतात.
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही सेवा निभावतांना अटीतटीच्या प्रसंगी विविध सेवकांच्या मार्फत सेवांचे दर्शन घडत असते. कठीण परिस्थितीशी झगडून केलेले कार्य हे आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले
पाहिजे. मानवी वेदनांना दूर करताना व उपलब्ध असणाऱ्या सेवा सुविधा पुरविताना व उपलब्ध असणाऱ्या ज्ञानाद्वारे व अधिकाराद्वारे त्यावर मात करताना आलेले अनुभव प्रत्येकाच्या मानवी मनाशी घट्ट रुजलेले असतात आणि या अनुभवांना जागृत करण्यासाठी एक नावीन्यपूर्ण कार्यशाळा सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर येथे पार पडली. ध्यानीमनी नसताना आरोग्य सेवेतील घटकासाठी आलेला हा खरच वेगळा अनुभव होता.
*मानवी संवेदना व संवादांची आरोग्य कार्यशाळा* :
नागपूर येथील सार्वजनिक आरोग्य संस्थेत विविध प्रकारचे प्रशिक्षण विविध घटकांना देण्यात येते. आरोग्य सेवेतील कार्यरत घटकांसाठी प्रशिक्षणाची या ठिकाणी उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक व श्री. विरेंद्र सिंह यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली ही कार्यशाळा मानवी संवेदनांना समजून घेऊन विविध घटकांना आलेले अनुभव संवादाच्या माध्यमातून समजून घेण्याचे हे जणू प्रात्यक्षिक, परंतु या प्रात्यक्षिकाची कुणालाही कल्पना
नव्हती. आरोग्य सेवेत कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आशा अशा विविध घटकांना या कार्यशाळेत सामावून घेण्यात आले. या कार्यशाळेत केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आणि यातून चुकले तर सर्वांच्या समोर आपल्याला बोलणे खावे लागणार, असे समजून सर्वजण या सभेला नव्हे तर कार्यशाळेला आले.
आरोग्य सचिव ही सभा घेणार म्हणून काय परिस्थिती असेल याची जाणीव प्रत्येकाला झालीच! परंतु ही कार्यशाळा अत्यंत वेगळ्या पद्धतीने व मानवी मनातील साठलेल्या अनुभवातील स्पंदनांना जागृत करीत मनातील उत्कृष्ट अनुभवांना उजागर करण्यासाठी असलेलं व्यासपीठ असावं याची पुसटशीही कल्पना कोणालाही आली नाही..
कार्यशाळेच्या सुरुवातीला सर्वांचा परिचय झाला व आरोग्य सेवेतील विविध घटकांना पद, उपाधी बाजूला करून प्रत्येक गटामध्ये समाविष्ट करून प्रत्येकासाठी एक कार्ड देण्यात आले व या कार्डवर सेवा काळातील आलेल्या उत्कृष्ट अनुभवाची व स्मरणात राहिलेल्या
अनुभवाची नोंद करण्यास सांगण्यात आले व गटानुसार त्या त्या गटातील प्रत्येक व्यक्तीला आपले अनुभव कथन करण्याविषयी सांगण्यात आले. यात पद आणि भूमिका या बाबी बाजूला ठेवून सर्वांनी यात सहभागी होण्याविषयी आवाहन करण्यात आले. त्याप्रमाणे सर्वांनी आपले पद आणि भूमिका बाजूला ठेवून प्रत्येकाच्या कार्याविषयी व आलेल्या अनुभवाविषयी त्या त्या गटात चर्चा केली व एक तासाच्या अंतराने प्रत्येक गटाला आलेले अनुभव व त्यांनी साठवून ठेवलेल्या अंतर्मनातील अनुभव, आठवणी सर्वांसमोर मांडण्याची संधी देण्यात आली. यात आशा, परिचारिका, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावून निभावलेल्या कर्तव्याचे व भूमिकांचे दर्शन त्यांच्या अंतर्मनातील अनुभवातून मांडले. अटीतटीच्या प्रसंगी आपल्या सेवा काळात घडलेल्या कार्याचे व समाज भावनेतून महत्त्वपूर्ण भूमिका आपण कशी पार पाडू शकलो, याचा अनुभव कथन करण्यासाठी या व्यासपीठावर संधी मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि सेवाभाव ठळकपणे बोलण्यातून जाणवत होता. सार्वजनिक आरोग्य क्षेत्र हे व्यापक असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात दुर्गम भागात तसेच उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांचा विचार करता या
सुविधा पुरविताना अनेक अडीअडचणी येतात व त्या अडचणींवर मात करीत दुर्गम भागातील आरोग्य सेवेतील प्रथम स्थानी लढणारी ही मंडळी आपली भूमिका बिकट परिस्थितीतही जबाबदारीने पार पाडून अनेकांचे जीव वाचवतात. त्यांच्या आरोग्य विषयक अडचणींना दूर करण्यासाठी मोलाची मदत करतात. नागपूर विभागातील अतिदुर्गम भागात सेवा प्रदान करताना त्यांना आलेले अनुभव मांडण्यासाठी या कार्यशाळेतील व्यासपीठ महत्त्वाचे ठरले.
सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्य करणारा प्रत्येक घटक हा अत्यंत महत्त्वाचा व मोलाचा असणारा आहे, याची जाणीव प्रत्येकाला झाली. मानवी मनात साठलेल्या चांगल्या मदतीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच आपण करीत असलेले कार्य हे समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, हे जाणून करीत असलेले कार्य अधिक जोमाने व दर्जेदार कसे करता येईल, यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी महत्वाची नक्कीच आहे. मतपरिवर्तनाच्या शक्तीद्वारे समाजामध्ये चांगले बदल घडून येऊ शकतात व परिवर्तनाच्या दृष्टीने प्रेरणादायी वाटचाल होऊ शकते. यासाठी अशा प्रकारच्या
कार्यशाळा सार्वजनिक आरोग्य सेवेतील घटकांसाठी किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीवही प्रत्येकाला झाली. मानवी मनात साठलेल्या मानवतावादी आठवणींना उजाळा देत अनेकांनी आपले अनुभव या कार्यशाळेत व्यक्त केले. आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना आलेले अनुभव व स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांना केलेली मदत कशी मन सुखावून जाते याचेही दर्शन त्यांनी या कार्यशाळेत सर्वांना घडवले.
सार्वजनिक आरोग्य सेवा ही दुर्गम, अति दुर्गम भागापर्यंत पोहोचली असून, अशा क्षेत्रात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच आशा स्वयंसेविका, स्वयंसेवी संस्था या कार्यरत आहेत. या कार्यकर्त्यांना वेगळेवेगळे अनुभव येतात, परंतु आलेले अनुभव मांडण्यासाठी त्यांना हवे असते एक व्यासपीठ आणि ते एक व्यासपीठ नागपूर येथील कार्यशाळेने उपलब्ध करून दिले. साठलेल्या मानवी संवेदनेला संवाद रुपाने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला व ते ऐकून घेऊन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक घटकाचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नही या कार्यशाळेतून सफल झाला. आरोग्यदायी परिवर्तनाच्या दृष्टीने प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असून
संघ भावनेने काम करावे असे आवाहन करण्यात आले.



