
ही कहाणी आहे एका मुलखावेगळया सच्च्या समाजसेवकाची.” सेवा म्हणजे निष्काम कर्म होय. सेनापती बापटांनी सेवेच्या संदर्भात जे सांगून ठेवले आहे त्याचं तंतोतंत पालन प्रा. डॉ. न. म. जैन सरांनी गेली सहा-सात दशकं अव्याहतपणे सुरू ठेवलं आहे. सेनापती बापट म्हणायचे- “जगाचे भले करणे हे माझे वचन आहे. देवाने दिलेल्या बुद्धीप्रमाणे श्रम करून जगाचे मला भले करायचे आहे.

“प्रा. डॉ. न. म. जैन : व्रतस्थ विश्वस्त” हे प्राचार्य प्रभाकर नानकरांनी लिहिलेलं पुस्तक काही दिवसापूर्वीच माझ्या हाती पडलं आणि चाळायला म्हणून सुरुवात केली आणि त्यात गुंतून पडलो. गुंतून पडायला कारण ही तसंच होतं. प्रा. डॉ. न. म. जैन हे माझे ज्येष्ठ स्नेही, मित्र, मार्गदर्शक आणि अंतरंग सखा आहेत. त्यांच्याबरोबर विद्यावर्धिनी महाविद्यालयातील वीस-बावीस वर्षे सहवासात होतो. हा सहवास अजूनही तसाच आहे. प्रत्यक्ष भेट होवो अथवा न होवो. महिना-दोन महिन्यातून सरांचा फोन खणाणतो- ‘प्रणाम’. आमचा हा ‘प्रणाम’ केवळ नमस्कारच नाही तर अनेक अर्थ-संदर्भाने युक्त आपल्या मित्रांशी कायम जुळून राहण्याचा तो एक भाग असतो. मैत्री कशी असावी याचा जैन सर एक आदर्श आहेत.
अशा या आदर्श मित्रावर लिहिलेलं पुस्तक हाती पडल्यावर ते वाचताना हरवल्याशिवाय काय होणार? एका दमात पुस्तक वाचून संपवलं आणि ज्यांच्यासोबत आपण केवळ आपला वेळ हास्यकल्लोळात घालवतो तो मित्र हिमालयाच्या उंचीचं सेवाकार्य करणारा आहे याची जाणीव होते. प्राचार्य प्रभाकर मानकरांनी आपल्या मनोगतात जैन सरांबद्दल पहिलीच ओळ लिहिली आहे- “ही कहाणी आहे एका मुलखावेगळया सच्च्या समाजसेवकाची.” सेवा म्हणजे निष्काम कर्म होय. सेनापती बापटांनी सेवेच्या संदर्भात जे सांगून ठेवले आहे त्याचं तंतोतंत पालन प्रा. डॉ. न. म. जैन सरांनी गेली सहा-सात दशकं अव्याहतपणे सुरू ठेवलं आहे. सेनापती बापट म्हणायचे- “जगाचे भले करणे हे माझे वचन आहे. देवाने दिलेल्या बुद्धीप्रमाणे श्रम करून जगाचे मला भले करायचे आहे. देवाच्या लेकरांची कष्ट करून सेवा करणे म्हणजेच पवित्र जीवन हेच मी शिकत आलो आहे. हेच माझे व्रत. हे व्रत मी कधीही सोडणार नाही. सेवा कधीही विसरणार नाही. मी सदा आनंदात असेन.” सेवा हा सर्वोत्तम धर्म मानला गेला आहे. सेवेशिवाय व्यक्तीचा व समाजाचा विकास होत नाही.
धुळे शहराच्या देवपूरातील वाडीभोकर रोडच्या नेहरू हाऊसिंग सोसायटीत मतिमंद मुलांसाठी “सन्मति विद्यालय” आहे. या विद्यालयाची स्थापना १५ डिसेंबर १९८६ रोजी झाली. परंतु त्याचे रीतसर उद्घघाटन २७ जानेवारी १९८९ रोजी झाले. या आधी ९ डिसेंबर १९८१ रोजी सरांनी आपल्या मातेच्या स्मृतीप्रित्यर्थ स्व. रतिबाई मगनलाल जैन चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टच्या अंतर्गतच त्यांनी अन्य साऱ्या विद्यालयांची स्थापना केली. सरांचे आपल्या आईवर अपार श्रद्धा आणि प्रेम होते. त्या होत्याही तश्याच. त्या जरी फारशे शिकलेल्या नसल्या तरी अत्यंत धार्मिक वातावरणात वाढलेल्या होत्या. त्यांचा जैन धर्म ग्रंथांचा अभ्यास वाखाणण्यासारखा होता. जैन साहित्यात मातेची महिमा वर्णित केली गेली आहे. संस्कारानेच भावी जीवनाचे यशोमंदिर तयार होत असते. सरांच्या जीवनाचे यशोमंदिर त्यांच्या मातेने दिलेल्या अनमोल संस्कारातच दडलेले आहे. आईच्या अकाली निधनामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर वज्राघात झाला होता. पण सरांनी मनोमन निश्चय केला की, आईची स्मृती आपल्या आगळ्या वेगळ्या कारणांनी जागवायची. त्यांनी अथक परिश्रमातून मतिमंद मुलांसाठी सन्मति विद्यालयाची स्थापना केली. या कामासाठी त्यांच्या कुटुंबियांनी विशेषता सरांचे वडील मगनलालजी जैन यांनी एक भरीव रक्कम यासाठी काढून ठेवली होती. त्यांची इच्छाही होती की, सरांनी शक्य झाल्यास असे कार्य हाती घ्यावे जे करावयास सहजासहजी कोणी धजत नाही. दिखाऊपणा दाखवणारे कार्य त्यांना नको होते. सरांनी मतिमंद मुलांसाठी सन्मति विद्यालय उभे करून आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली.
सेवेशिवाय व्यक्तीचा व समाजाचा विकास होऊ शकत नाही. असं म्हणतात की सेवा करणे योग्यालासुद्धा साधत नाही इतके ते कठीण काम असते. वस्तुतः सेवा हा सर्वोत्तम धर्म आहे आणि त्याग हे त्याचे अधिष्ठान आहे. हा त्याग जर खरा असेल तरच खरी शांती त्यापासून प्राप्त होते. सेवाक्षेत्रात आपल्या त्यागाच्या अधिष्ठानाने अलौकिक असे कार्य करणाऱ्या महापुरुष-महात्म्यांचे दाखले देता येतील. डॉ. न. म. जैन सरांचे वैशिष्टय़ हे आहे की, त्यांनी सेवाकार्यातील या महनीय व्यक्तींचा केवळ अभ्यासच केला नाही तर तो प्रत्यक्षात आचरणात आणला. सरांच्या व्यक्तिमत्त्वांवर दोन महामानवांच्या सेवाकार्याचा, त्यांच्या त्यागाच्या अधिष्ठानाचा खोलवर असा ठसा उमटला आहे. ती म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. अल्बर्ट xxx. या दोघांनी सेवाकार्याचा परमोच्च बिंदू साधला होता. त्यांनी सत्यनिष्ठा, नि:स्वार्थीपणा, साधेपणा, संयम, सहिष्णुता, अहिंसा, निष्काम कर्मयोग, श्रद्धा, करुणा या नितितत्वांचे पालन करून सेवाकार्याच्या विशाल कार्याला गवसणी घातली. या दोघांच्या जीवन आणि कार्याचा जैन सरांवर अपरिमित प्रभाव असल्यामुळे आणि त्यांचेवर त्यांच्या माता-पित्यांच्या संस्कारांची पूर्वपीठिका असल्यामुळे त्यांचे हातून मतिमंदांचे सेवा करण्याचे महान मानवतावादी कार्य उभे राहिले.
सामाजिक सेवाकार्य हे जगन्नाथाच्या रथाप्रमाणे असते. स्त्री-पुरुष ही त्या रथाची मुख्य चाके असतात. सरांनी मतिमंदांसाठी उभे केलेले कार्य हे असेच होते. या कार्यात सर एकटे नव्हते. त्यांना आमच्या वहिनीसाहेब. प्रा. सौ. सूर्यप्रभा जैन यांची अत्यंत मोलाची साथ लाभली. या दोघांनी मतिमंदांसाठीचे महनीय सेवाकार्य उभे राहण्यासाठी अफाट परिश्रम घेतलेत. या कामात त्यांना अनंत अडचणी आल्यात; अनेकांनी विरोध दर्शविला पण त्यांनी ठरवले होतं की मळलेल्या वाटेने जायचे नाही. प्रत्येक वळणावर येणाऱ्या अडी-अडचणींना तोंड देण्याचा निर्धार त्यांनी केला. धुळ्याच्या जयहिंद संस्थेचं ब्रीदवाक्य खूपच प्रेरणादायी आहे- “कितीही अपयश आलं तरी ध्येय छोटे असता कामा नये.” जैन दांपत्यानेसुद्धा असेच भव्य-दिव्य ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवलं होतं. कितीही अडचणी येवोत, अपयश येवोत पण ध्येय सिद्धी करायचीच. या साठी त्यांनी अनेक नामवंत मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर्स, राजकीय नेते, समाजसेवक, शिक्षक यांना भेटण्याचा धडाका लावला. सरांचा विश्वास होता की, निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यास ज्ञात-अज्ञात हातांची मदत होत असते. त्याप्रमाणे त्यांना मदत मिळत गेली.
अत्यंत कष्टातून उभे राहिलेल्या सन्मति विद्यालयाला लेखकाने डॉ. न. म. जैन सरांची तपोभूमी मानले आहे. खरोखरच सन्मति विद्यालय ही सरांची तपोभूमी आहे. या विद्यालयाला आदर्श विद्यालय बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. शासकीय अनुदान मिळविण्यासाठी अपार प्रयत्न केलेत. सुयोग्य अशा शिक्षकांची नियुक्ती केली. विशेष म्हणजे अत्यंत निरलस आणि सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकारी मंडळ बनविले; कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. कर्मचारी आणि विश्वस्त यांचा परस्पर संबंध हा अत्यंत आपुलकीचा, स्नेहभावाचा आणि न्याय देणारा असावा याची पुरेपूर काळजी घेतली गेली. पालक, पाल्य, शिक्षिका यांचा सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेलीत. शिवाय सन्मति विद्यालय हे आदर्श आणि संस्कारक्षम विद्यालय व्हावे म्हणून सहली-सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी केली गेली. संस्थेच्या सेवाभावी वृत्तीचा सर्वांना परिचय व्हावा म्हणून आदर्श अशा नीतिमूल्यांची पेरणी केली गेली. विद्यालयातील कर्मचाऱ्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली गेली. विद्यालयातील मतिमंद मुलांसाठी विशेषतः मुलींसाठी खास काळजी घेतली गेली. त्यासाठी सक्षम स्त्री कर्मचाऱ्यांची नेमणूक केली गेली. कुठलेही गैरवर्तन, अपराध, भ्रष्टाचार याला थारा दिला नाही. कर्मचाऱ्यांची कधीही वेतनविषयक अडचण होऊ दिली नाही. विशेषत: मतिमंद मुला-मुलींच्या आरोग्याची खूप खूप काळजी घेतली गेली. त्यांच्यातील कौशल्य विकसित होण्यासाठी अथक प्रयत्न केले गेलेत. इतकेच नाही तर मतिमंद विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विद्यालयातच होमिओपॅथी कक्ष ही स्थापन करण्यात आला. मुलांच्या विकासासाठी वैशिष्टय़पूर्ण कार्यशाळांचे आयोजन केले गेले. त्यांना भविष्यात स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून गुढ्या, ग्रिटिंग कार्डस, मेणबत्त्या, पायपुसण्या, आकर्षक खेळणी बनविण्याच्या कार्यशाळा संपन्न झाल्यात. विशेष म्हणजे सन्मति विद्यालयातील मतिमंद मुलांनी बनवलेल्या गुढ्या या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साता समुद्रापार विदेशातही पाठविल्या गेल्या. स्थानिक वृत्तपत्रांनी मतिमंद मुलांच्या या कार्यक्षमतेचे रसभरीत वर्णन करून त्यांनी बनविलेली गुढी ही ग्लोबल झाल्याच्या वृत्ताला अग्रक्रमाने प्रसिद्धी दिली.
सन्मति विद्यालयातील मतिमंद मुलांना केवळ सामान्य ज्ञानाने परिपूर्ण करण्याचा नव्हे तर आधुनिक ज्ञानाने तो सज्ज व्हावा म्हणून विद्यालयात संगणक कक्ष उघडण्यात आला. विशेष म्हणजे ट्रस्टच्या पारदर्शकतेमुळे आणि कार्यपद्धतीमुळे प्रभावित होऊन राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर लोकांनी या कार्यासाठी मदतीचा हात पुढे केला. सन्मति विद्यालयातील मतिमंद मुलांच्या सेवाकार्याला मिळालेल्या मदतींचा ओघ पाहता विश्वस्त प्रा. डॉ. न. म. जैन सरांनी यापुढे मतिमंदांसाठी जनजागरण अभियान उभारण्याचा संकल्प केला. सरांच्या या कल्पनेस उदंड प्रतिसाद मिळाला. देणगीदारांनी ट्रस्टला भरीव अशी देणगी देण्याचा सपाटा लावला. देश-विदेशातून देणग्या येऊ लागल्यात. कॅनडातून डॉ. जे. के. वाणी, सुरेशदादा जैन, गोव्याहून साई स्वाध्याय मदाल, दि हस्ती को-ऑपरेटिव्ह बॅंक, सूर्यकांत फाऊंडेशन, इंग्लंड, मिनाताई गुप्ता अशा अनेक दानशूर देणगीदारांनी देणग्या देऊ केल्या. आपल्या नावाचा उल्लेख करू नका असे सांगणारे देणगीदार यात होते. अशा तऱ्हेने विविध माध्यमांतून देणग्या ट्रस्टकडे येऊ लागल्या. या धनाच्या सुयोग्य उपयोगासाठी सरांनी त्यासाठी आदर्श अशी आचारसंहिता ठरवली. देणग्यांची रीतसर नोंदणी आणि इन्कम टॅक्स सूट मिळवण्यासाठी 80G दाखल्यांचा क्रमांक देणगीदारांच्या सुलभतेसाठी ट्रस्टच्या पावती पुस्तकावर छापण्यात आला. देणगी रकमेचा व्यवहार हा अत्यंत पारदर्शी व्हावा यासाठी सर्वांनी आटोकाट प्रयत्न केलेत. यातून नेत्रहीन, कर्णबधीर, अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अर्थसाह्य प्रदान केले; अशा गरजूंचा आणि पीडितांचा शोध घेण्याची मोहिम राबवली; मोफत रोगनिदान शिबिरांचे आयोजन केले. जेथे जेथे दु:ख असेल, वेदना असेल त्या त्या ठिकाणी जैन ट्रस्ट धावून गेला. पीडितांना देणगी रकमेतून भरभरून मदत केली.
जैन पब्लिक ट्रस्टला १९८१ ते २०१९ पर्यंतच्या काळात “न भूतो न भविष्यती” अशा देणग्यांचा वर्षाव झाला. १ एप्रिल २०१९ पासून मात्र त्यांनी देणग्या स्वीकारणं बंद केले. या पुढे ट्रस्टला देणग्या पाठवू नयेत अशी विनंती तमाम देणगीदारांना केली. स्वतःहून देणग्या नकोत अशी विनंती करणारा जैन ट्रस्ट हा एकमेव अपवाद आहे. ट्रस्टकडे जमा असलेल्या धनराशीतून आजही गरजू, पीडितांना स्वत:हून पुढाकार घेऊन उदंड आर्थिक मदत केली जाते. मतिमंदांबाबत जे जनजागृती अभियान सरांनी चालवले त्याची दखल शासनाने ही घेऊन मतिमंदांसाठी शाळा उघडण्याचा संकल्प केला. तसे जीआर ही शासनाने काढलेत. जैन ट्रस्टचे हे सर्वात मोठे यश आहे. इतरांना वेदनेपासून आणि वेदनेच्या कारणांपासून मुक्त करण्याची इच्छा म्हणजे करुणा होय. इतरांच्या भावनांचा आदर राखण्याच्या जाणीवेवर ती आधारलेली असते. इतरांचे दुःख व त्यांच्या वेदना समजून घेण्याचे गांभिर्य आणि त्यांना मदत करण्याची भावना आपल्याला मनोबल आणि आत्मविश्वास बहाल करते. जैन सरांनी हे मनोबल आणि आत्मविश्वास प्राप्त केल्यामुळेच करुणेचे महनीय कार्य ते करू शकलेत. या ही पुढे हे कार्य अखंड प्रवाहित राहणार आहे यात शंका नाही. वेदना आणि करुणेच्या कार्याचा हा व्रतस्थ विश्वस्त आपल्यासाठी एक आदर्श असा प्रेरणास्तोत्र आहे. त्यांचेकडून ही प्रेरणा आम्हांस सदैव प्राप्त होत रहावो हीच विश्वनियंत्याकडे मन:पूर्वक प्रार्थना !!
डॉ. कृष्णा पोतदार
९४२२८ ९५४६५
Kr*************@***il.com



