घुसखोरांची घरवापसी…

भारतीय घुसखोर या विषयावर आम्ही मागच्या आठवड्यात आपल्याला लेख दिला होता. पण बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांबद्दलच माध्यमे सातत्याने चर्चा करतात.तरीदेखील आम्ही भारतीय घुसखोरांची माहिती दिली होती. त्यावर अनेकांना आश्चर्य वाटले होते. त्याच्या पुढची हकीकत आपल्यासाठी – संपादक

इतर देशात त्यांच्या सीमारेषा बेकायदेशीर ओलांडून त्या देशात प्रवेश करतो तो घुसखोरच म्हणून ओळखला जातो. मग तो भारतीय असला तरी तो घुसखोराच ठरतो. अशा घुसखोंरांच्या बाबतीत जगातल्या अनेक देशांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर देशापुढे असलेल्या एकेक समस्येचा ते समाचार घेत आहेत. भारतीय लोक वाममार्गाने मानवी तस्कर व एजंटाच्या माध्यमातून कसल्याही प्रकारचा विजा, परवाना नसतानाही एजंटाच्या भूलथापांना बळी पडून अमेरिकेत प्रवेश मिळवण्याचा खटाटोप करत होते. काहींनी तर विनापरवाना प्रवेश देखील मिळाला होता. अशा सर्वांची रवानगी ट्रम्प प्रशासनामार्फत त्या त्या देशात करायला प्रारंभ झाला आहे.
अमेरिकन प्रशासनाच्या अंदाजानुसार किमान 20000 असे भारतीय लोक आहेत ज्यांनी बेकायदेशीररित्या कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता अमेरिकेत प्रवेश मिळवला आहे. त्या सर्वांना मायदेशी परत पाठवण्याची व्यवस्था अमेरिकन प्रशासन करत आहे.अशा बेकायदेशीर अमेरिकेत स्थलांतरित करणाऱ्यांना परत पाठवण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेला पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले असल्याचे समजते. अशाच प्रकारे इतरही देशात अन्य देशाचे असंख्य नागरिक वेगवेगळ्या सीमारेषा ओलांडून त्या त्या देशात अवैधरीत्या प्रवेश करण्याचे प्रयत्न करीत आहेत. काल रात्री उशिरा 200 भारतीय घुसखोर अमेरिकेतून भारतात परत पाठवले असल्याची ताजी बातमी आली आहे.



