
मिसिंग लिंक महाराष्ट्राच्या सेवेत दाखल झाला या लिंक बद्दल सविस्तर आणि शोध पूर्ण माहिती खास आपल्यासाठी लिहिली आहे पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी त्याचा हा दुसरा भाग
महाकाय प्रकल्पांची उभारणी : आधुनिक तंत्रज्ञान आणि आव्हानांची शर्यत
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलणाऱ्या समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे मिसिंग लिंकसारख्या प्रकल्पांची उभारणी करणे हे केवळ इंजिनिअरिंगचे (अभियांत्रिकीचे) काम नसून ते एक मोठे प्रशासकीय आणि तांत्रिक आव्हान होते. हे प्रकल्प साकारताना निसर्गाची प्रतिकूलता आणि तांत्रिक क्लिष्टता यांचा मोठा सामना करावा लागल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी अधोरेखित केले आहे.
बोगद्यांचे जाळे आणि सुरक्षिततेचे कवच
बोगद्यात केवळ रस्ता तयार करणे पुरेसे नव्हते, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तिथे एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. बोगद्यात नैसर्गिक सूर्यप्रकाश नसतो आणि हवेची हालचाल मर्यादित असते. अशा वेळी, वाहनांच्या धुरामुळे कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढू नये म्हणून तिथे शक्तिशाली ‘जेट फॅन्स’ (वेगवान हवेचे पंखे) बसवले जातात. तांत्रिक बिघाडामुळे एखादी गाडी बोगद्यात बंद पडली, तर सुरक्षिततेसाठी दर ३०० ते ५०० मीटरवर ‘क्रॉस पॅसेज’ (आंतरजोड मार्ग) आणि ‘इमर्जन्सी पार्किंग बे’ (आपत्कालीन वाहन थांबा) दिलेले असतात. ‘ऑटोमॅटिक इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टिम’ (स्वयंचलित घटना शोध प्रणाली) मुळे एखादे वाहन थांबल्यास नियंत्रण कक्षाला तातडीने संदेश जातो, ज्यामुळे भ्रमणध्वनी सेवा नसतानाही मदत पोहोचू शकते.
वाऱ्याचा वेग आणि केबल-स्टेड ब्रिजचे आव्हान
कनेक्टिंग लिंक प्रकल्पांतर्गत लोणावळ्याजवळील दरीत जो भव्य केबल-स्टेड ब्रिज (ताराधारित पूल) उभारला गेला, तिथे सर्वात मोठे आव्हान वाऱ्याच्या वेगाचे होते. १८४ मीटर उंचीचे पायलान्स (आधारस्तंभ) आणि दरीतील प्रचंड वारा यामुळे पुलाच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन, या पुलाचे डिझाइन (आराखडा) अशा प्रकारे करण्यात आले आहे की, ताशी शेकडो किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा दाब हा पूल सहज पेलू शकेल. या पुलाच्या पायाभरणीसाठी वापरण्यात आलेल्या एका ‘फुटिंग’चे (पाया रचना) वजन तब्बल १०,००० टन आहे, जे या कामाच्या अवाढव्यतेची साक्ष देते.
कामाची गती आणि सकारात्मक दृष्टीकोन
गायकवाड एक वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, भूसंपादनावेळी झालेला विरोध असो किंवा घाटातील कठीण भौगोलिक परिस्थिती, या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसते, तर जोखीम घेण्याची क्षमता आणि सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असतो. “आम्ही प्रतिकूलतेत संधी शोधली आणि त्यामुळेच आज महाराष्ट्र वेगवान रस्ते विकासाच्या जागतिक नकाशावर ठळकपणे दिसत आहे .” त्यांच्या या बोलण्यातून हे काम किती आव्हानात्मक होते याची जाणीव होते.
जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याबाबतचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या बोगद्याची रुंदी जगात सर्वाधिक २२.३३ मीटर अशी जाहीर केली.
या प्रकल्पाच्या कामात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कोविड-१९ महामारी, मुसळधार पाऊस, कठीण खडक, वन परवानग्या… तरीही अभियंते आणि कामगारांनी चिकाटीने हे काम पूर्ण केले.
सातवाहनांच्या पायवाटेपासून सुरू झालेला हा प्रवास आज ‘कनेक्टिंग (मिसिंग) लिंक’पर्यंत पोहोचला आहे. सह्याद्री तसाच आहे... बदलल्या आहेत त्या त्याला ओलांडण्याच्या पद्धती. हा मार्ग आजही केवळ प्रवासाचा नाही... तो इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा जिवंत दुवा आहे... मिसिंग लिंकचा नवा थरारक अध्याय नव्या महाराष्ट्राच्या घडणीतील महत्त्वाचे पान ठरणार आहे ..!!

जिल्हा माहिती अधिकारी,
पुणे



