Special Story

पर्शियन आखात पेटला : झळ मात्र जगाला

Special Sunday

आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि अस्थिर राजकीय घटना आणि घडामोडीवर काल सुरू झालेल्या इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात नेमक्या कोणत्या गोष्टी व घटना घडतील त्याचे पडसाद कसे उमटतील या संदर्भात संरक्षणशास्त्राचे अभ्यासक डॉ. देवेंद्र विसपुते यांनी घेतलेला आढावा.

गेल्या वर्षीच जूनमध्ये इराण इजरायल अमेरिका युद्धाच्या पहिल्या टप्प्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून जगाला ही या देशांमधील युद्धाची दुसरी फेरी अपेक्षितच होती. तसे पाहिले तर गेल्या 47 वर्षांपासून (इराणमधील इस्लामिक क्रांती 1979) इराण ही अमेरिकेची दुखती रग बनली आहे.
… एकीकडे अमेरिकेसाठी तिच्या मध्यपूर्व क्षेत्रातील हितसंबंधांचे रक्षण करणे, इजरायलच्या अस्तित्वाचे संरक्षण करणे आणि इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणे या बाबी प्राधान्यक्रमाच्या बनल्या होत्या. अमेरिकेच्या अनेक वर्षापासूनच्या भू-राजकीय (Geo- political) भू-सामरिक (Geo-strategic )आणि भू- आर्थिक (Geo-economic) धोरणात “पश्चिम आशिया” किंवा मध्यपूर्व (Middle East) हे एक मुख्य कारक बनलेले आहे.
.. दुसरीकडे इराणला सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान यांच्या इस्लामिक जगतावरील वर्चस्वाला तडा देऊन स्वतः इस्लामिक देशांचा एकमुखी नेता बनावयाचे आहे. त्यासाठी लष्करी शक्ती वाढवण्याकरीता अणुबॉम्ब बनविणे व अमेरिकेला मध्यपूर्वेतून घालविणे, हे इराणचे उघड – उघड सामरिक धोरण आहे.
…. त्यामुळे लवकरच पर्शियन आखातात
”वडवानल” पेटणार हे जगाला निश्चितपणे माहीत होते. – आणि तसेच झाले. अमेरिका – इजरायल दुक्कलीने इराणवर हल्ला केला, तर इराणने प्रतिकारदाखल मध्यपूर्वेतील अमेरिकेचे लष्करी तळ आणि इजरायलवर हल्ला चढविला. यात नवीन किंवा आश्चर्याची अथवा विस्मयाची कोणतीच बाब नाही.
आज अमेरिका जगात सर्वात शक्तिशाली देश आहे. त्याच्यासोबत जवळपास सर्वच प्रगत पाश्चिमात्य देश, नाटो गटातील राष्ट्र आणि इजरायल असा मोठा बलशाली लष्करी लवाजमा आहे. मात्र आजमितीस एकाही बलाढ्य मुस्लिम देशाने इराणला पाठिंबा दर्शवलेला नाही, ही बाब लष्करी आणि राजनयाच्या (diplomacy) दृष्टीने इराणसाठी वजाबाकी करणारी आहे.. तरीदेखील मोठ्या हिमतीने इराणने उचललेले हे पाऊल केवळ रशिया व चीन या अण्वस्त्रसज्ज देशांच्या प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष पाठराखणीमुळेच आहे, हेदेखील जगाला माहित आहे.
अर्थात रशिया आणि चीनला इराणविषयी फार प्रेम आहे, असे नाही! तर यामागे ‘अमेरिकाविरोध’ हे त्यांचे धोरण आहे.
रशिया आणि चीन यांचा यामागे स्वतःचा खूप मोठा स्वार्थ आहे. कारण अमेरिका जर इराणशी लढण्यात जास्त काळ गुंतून पडला, तर युक्रेनमध्ये रशियाला free-hand मिळतो आणि चीनची दक्षिण चीन समुद्र आणि तैवानविरुद्धची बाजू भक्कम .
लष्करी आणि आर्थिक दृष्ट्या बघता इराण त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूपच कमकुवत आहे. इराणची वायुसेना फारशी प्रभावी नाही. गेल्या वर्षी इराणने इजरायल व दोहावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन ची हल्ले केले होते हा कच्चा दुवा अमेरिका आणि इजराइलने नक्कीच कमी केला असणार अमेरिका आणि इजराइल इराणच्या आण्विक आणि ऑइल क्षेत्रांवर धार धरणार हे निश्चितच आहे इराणही या क्षेत्रातील अमेरिकेचे लष्करी तळ अमेरिकेने केलेली डिप्लॉयमेंट व इस्रायल वर्क क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले करेल, किंबहुना त्याला सुरुवातही झालेली आहे.
हा संघर्ष किती दिवस चालेल याची भाकित आजच करता येणार नसले तरी त्याचा जागतिक अर्थव्यवस्था आणि वैश्विक शांतता यावर खूप मोठा दुरगामी असा परिणाम होणार आहे. इराणकडे असलेली समरनीती म्हणजे होर्मुझची समुद्रधुनी आणि पर्शियन आखात यांची नाकेबंदी करणे होय. कारण या क्षेत्रातून जगाच्या 25 टक्के खनिज तेलाची निर्यात होते. जोडीला हुती दहशतवादी लाल समुद्र आणि हमाससारख्या संघटना सुएझ कालव्याची नाकेबंदी केली आहे. आयेतुला खोमिनी यांची राजवट उलथवून लावणे आणि इराणच्या आण्विक प्रयत्नांना कायमस्वरूपी चाप लावणे हेच अमेरिकेचे धोरण असेल.
पण याची परिणीती ही जगासाठी मोठीच डोकेदुखी ठरणार आहे कारण यामुळे जागतिक व्यापराला मोठा धक्का बसेल आणि तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात भडकतील.
अर्थातच या प्रकरणापासून रशिया अलिप्त राहणारच नाही. रशिया इराणला थेट पाठिंबा देण्याची किंवा अमेरिकेला धमकावण्याची शक्यता आहे. भारताने मात्र नेहमीप्रमाणे मध्यममार्गी समन्वयाचा मार्ग अनुसरत इराण अमेरिका संघर्षा विषयी चिंता व्यक्त केली असून या दोन्ही पक्षांना आणखी तणाव न वाढवण्याचे आवाहन केले आहे. “प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा सन्मान झाला पाहिजे!” असे सूचक वक्तव्यही भारताने केले आहे. थोडक्यात हा संघर्ष जर लांबला तर त्याचे विश्वव्यापी दुष्परिणाम होतील.

प्रा. डॉ. देवेंद्र विसपुते,
प्रमुख, संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभाग.
विद्यावर्धिनी महाविद्यालय,
धुळे 9423979145

Related Articles

One Comment

  1. खुप माहितीपूर्ण व छान लेख !! धन्यवाद !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/