औषधे, विज्ञाननिष्ठा आणि विश्वासातून आरोग्य प्राप्ती होते

7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ कार्यक्रम करण्यासाठी नसून लोकांच्या मनात आरोग्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आहे. आज विज्ञानाने खूप मोठी प्रगती केली असली तरी अजूनही अनेक लोक आजाराबद्दल भीती, गैरसमज आणि चुकीच्या माहितीमुळे त्रस्त आहेत. म्हणूनच या वर्षीची संकल्पना “आरोग्यासाठी एकत्र-विज्ञानाच्या पाठीशी उभे राहा.” ही आजच्या काळातील सर्वात महत्वाची गरज आहे.आमच्या वाचकांसाठी लिहले आहे स्मिता लोणारे यांनी .
आजही अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये लोक आजार लपवतात, तपासणी टाळतात आणि डॉक्टरांकडे जाण्याऐवजी चुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवतात. आपण दररोज बघतो लोक विज्ञान सोडून भोंदूबाबावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. काही जण सोशल मीडियावर आलेल्या अफवांवर सहज विश्वास ठेवतात, तर काही लसीकरणाला घाबरतात. पण विज्ञानाने आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे शिकवली आहे. आजार लपवून किंवा दुर्लक्ष करून आरोच्य चांगले राहत नाही. ऊलट, योग्य वेळी तपासणी केली आणि विज्ञानावर विश्वास ठेवला तर अनेक गंभीर आजारसुद्धा टाळता येतात.
यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना-“आरोण्यासाठी एकत्र ” ही फक्त माणसांपुरती मर्यादित नाही -तर one Health या महत्वाच्या संकल्पनेशी जोडलेली आहे. माणूस, प्राणी आणि पर्यावरण यांचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे. जर पर्यावरण अस्वच्छ असेल, पाणी दुषीत असेल किंवा प्राणी आजारी असतील तर त्याचा परिणाम थेट माणसांच्या आरोग्यावर होतो, मलेरिया, डेंग्यू, रेबिज, अतिसार हे सर्व आजार आपल्याला एकच गोष्ट संगतात की, आरोग्य टिकवायचे असेल तर समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे.
आजच्या काळात सर्वात मोठी समस्या म्हणजे चुकीची माहीती, मोबाईल वर येणाऱ्या मेसेजवर लोक लगेच विश्वास ठेवतात. काही जण लसीकरणाबद्दल चुकीचे संदेश पसरवतात, तर काही लोक तपासणीची गरज नाही असे सांगतात. पण आपण स्वःताला एक प्रश्न विचारला पाहिजे -आपण मोबाईल वर आलेल्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवतो, पण डॉक्टरांनी सांगीतलेल्या विज्ञानावर का नाही ठेवत? हा विचार प्रत्येक व्यक्तीने करणे गरजेचे आहे.
आरोग्य हि केवळ डॉक्टर किंवा हॉस्पीटलची जबाबदारी नाही. कुटुंब, गाव ,आशा वर्कर, ANM, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, महिलांचे गट, युवक आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती यांची आरोग्य जपण्यात महत्वाची भूमीका असते. महिलांचे आरोग्य, लसीकरण, स्वच्छता, सुरक्षित पाणी, पौष्टिक आहार आणि योग्य माहिती या गोष्टींवर आपण एकत्रितपणे काम केले तर अनेक आजार सहज टाळता येतात. समाज निरोगी ठेवायचा असेल तर फक्त औषधे पुरेशी नसतात, त्यांसाठी जागृती आवश्यक असते.
विशेषतः महिलांच्या आरोग्याकडे अजूनही अनेक ठिकाणी दुर्लक्ष केले जाते. अनेक महिला आजार सहन करत राहतात पण तपासणीसाठी जात नाहीत. काही महिलांना लाज वाटते, काहींना भीती वाटते तर काहींना माहीतीच नसते. पण आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की अनेक गंभीर आजार लवकर ओळखता येतात आणि त्यावर योग्य वेळी उपचारही करता येतात. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि विज्ञानावर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे.
आज समाजात आणखी एक महत्वाची गोष्ट समजून घेण्याची गरज आहे – आरोग्य हे फक्त औषधांवर अवलंबून नसते. स्वच्छ पाणी, स्वच्छ वातावरण, योग्य आहार, लसीकरण, तपासणी आणि योग्य माहिती या गोष्टी आरोग्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत. जर आपण स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले, पाणी साचू दिले, कचरा योग्य पद्धतीने टाकला नाही तर आजार वाढतात. म्हणूनच आरोग्यासाठी एकत्र येणे म्हणजे फक्त डॉक्टरांवर अवलंबून राहणे नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी समजून घेणे होय.
जागतिक आरोग्य दिन आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो-आरोग्य फक्त डॉक्टरांच्या हातात नाही , ते आपल्या विचारात आहे. आपण योग्य माहिती स्वीकारली, चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाहीं भाणि समाज म्हणून एकत्र आलो तर आपले कुटुंब, आपले गाव आणि आपला देश निरोगी होईल.
आरोग्य फक्त औषधांनी मिळत नाही, ते जागृतीने मिळते .जागृती फक्त माहितीने मिळत नाही ती विज्ञानावर विश्वास ठेवून मिळते. आणि समाज निरोगी होतो तो एकत्र आल्याने. म्हणूनच या वर्षीचा जागतिक आरोग्य दिन आपल्याला एकच संदेश देतो – आरोग्यासाठी एकत्र या. आणि विज्ञानाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा.

स्मिता लोणारे डी.एच.पी.ई.
एन.आय.पी.एच.टी.आर. मुंबई,


