Third Eye

मंगलमूर्ती याल ना?

रविवार विशेष

नमस्कार आपले सण आणि उत्सव साजरे करतांना शुध्द आचार विचार करून साजरे करणे अपेक्षित असते. पण हल्ली त्यात ना भाव असतो ना संस्कृतीचा भाग असतो. बेभानपणे आणि सारासार विचार न करता अविवेकी पध्दतीने साजरे केल्या जाणाऱ्या आपल्या उत्सवाबद्दल आमच्या सजग वाचक आणि कलाक्षेत्रातील विवेकशिल व्यक्तीमत्व पाटील वसुधा यांनी आत्मचितंनपर कथन केले आहे ते आपणासाठी…. संपादक.

मेघराजा किती बरसशील अजून?…बस झालं… आता कुठे उत्सवाच्या वातावरणाला सुरुवातच  झालीय …गणेश भक्तांच्या भक्तीला मिरवणुकीतून उधाण आलेलं असतानाच  तुझी गर्जना नि वर्षाव….असं कसं अचानक उधाण आलं तुला?……
सगळ्यांचे डोळे तुझ्या वाटेकडे लागलेले असतात
तेंव्हा असा दडून बसलेला असतो….
जसा काही यशोदेचा उनाड कान्हा….  
खरंच की…..
तू घन नि तो घनश्याम…….
तू पण त्याच्या सारखाच…….
कधी रौद्र तरी कधी सौम्य नि शांत…..
कालिया मर्दन करून दुष्प्रवृत्तीचा नाश करून धर्माचे रक्षण करणारा तो……नि तू?……
हो आज तू पण तसाच भासलास मला….
तुझं हे असं अचानक रौद्र रूप धारण करून अखंड बरसणं…कसं काय?….
की तू पण धर्म रक्षणासाठी बरसतो आहेस….
तू घन आहेस की घनश्याम?……
भक्ती च्या नावाखाली देवापुढे चाललेला नंगानाच थांबण्यासाठी तर बरसत नाहीस ना?….
तसे असेल तर बरसत राहा….अखंड बरसत रहा…
नाही बघवत हा देवाच्या नि धर्माच्या नावाखाली घातलेला हैदोस………
मानवाला धर्मरक्षण अशक्य होतं तेंव्हा..  
धर्मरक्षणासाठी प्रकटते ती अनाम शक्ती……
म्हणूनच चक्रधारी श्रीकृष्ण म्हणाले होते”यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥”
मग ती प्रकट होते कधी अग्नी होऊन….
तर कधी जलधारांमधून……
कधी वायू होऊन…..
तर कधी आकाशातून….आणि
कधी कधी धरणीकंपातूनही……
मानवी संस्कृती म्हणजेच पंचमहाभूतांची सृजनयात्रा….
मग संस्कृती चे अध:पतन होत असेल तर  या पंचमहाभूतांमध्ये तरी कसा समतोल राहील?………’
भाव तिथे देव’ असे म्हणतात….
मग मद्यधुंद अवस्थेत अश्लील गाण्यांवर बेभान होऊन नाचणाऱ्या भक्तांमध्ये भक्ती नि भाव कुठेच दिसेना….
तिथे देव कसा वसेल?….  
भक्तीला विकृतीचा दर्प यायला लागला आहे…
फक्त मुर्त्यांची उंची वाढतेय…
पण आपली संस्कृती मात्र वरचेवर खुजी च होत चाललीय…..
टाळ मृदूंगाची परंपरा धाब्यावर बसवून डॉलबी च्या कर्णकर्कश  आवाजात फक्त उंचावलेली मुर्ती दिसतेय…
पण…यात मंगलमुर्ती कुठे आहेत?….
आगमनाला ही दशा…तर दर्शनाला वेगळीच….
कोटी सुर्यांचे तेज असणारा तो “सूर्यकोटी”…..
नि त्याच्या दर्शनासाठी तिकीट…
खरंतर त्या ओजस मूर्तीच्या दर्शनाची आस कमी…
पण समाजप्रबोधनाचा फक्त दिखावा करणारे देखावे बघण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिकीट घेऊन रांगेत उभ्या….
अशा दहा दिवसानंतर होते ते विसर्जन…..
विसर्जन नव्हे तर भयंकर विटंबना…….
ज्या पद्धतीने त्या मुर्ती चे विसर्जन होते…
ते पाहून  “गणपती बाप्पा तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या” म्हणायची पण लाज वाटते……
14 विद्या नि 64 कलांची देवता असलेल्या त्या विद्याधिशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत भावनेची जोड असलेली निर्भेळ भक्ती अगदी बोटावर मोजण्याएवढ्या मंडळामध्ये दिसते आहे…. मग?….
मधल्या काळात “एक गाव एक गणपती”संकल्पना चर्चेत होती….त्यावर पुन्हा एकदा विचार का होऊ नये?….गणेश मुर्ती च्या निर्मिती पासून विसर्जनापर्यंत….. शासनानेच काही नियम घालून दिले व ते पाळणे बंधनकारक केले तर?..कदाचित…लाखो करोडो रुपयांच्या  मुर्ती पाण्यात विसर्जित करून फक्त पैसाच नाही…. तर मूर्तीकाराची मेहनतही पाण्यात जाते….. आणि.प्रदूषणाला आमंत्रण  देऊन पर्यावरण हानी होते ते वेगळीच…..
पण..खरंच जर या शक्तीला (युवा,अर्थ)…भक्ती आणि युक्तीची जोड मिळाली तर….हाच उत्सव संस्कृतीचे जतन नि जयजयकार करणारा होऊ शकेल….नि..यातून जमा होणाऱ्या पैश्याचा योग्य असा विनियोग करून….समाजपयोगी कामाला लावला तर कदाचित खऱ्या अर्थाने ती बुद्धीच्या देवतेची उपासना ठरेल….’एक गाव एक गणपती’ नाही पण किमान…लोकसंख्येवर आधारित अगदी मोजकी गणेश मंडळे ठेऊन….सगळ्यांनी एकत्र येऊन…..प्रकृती नि संस्कृती दोन्हीचे जतन करणारा गणेशोत्सव साजरा केला तर….अगदी आनंदाने म्हणता येईल…..”
मंगल मूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या”🙏🙏🙏

काही वाचकांनी आम्ही लेखन करतो ते प्रकाशित कराल का अशी विचारणा केली आहे. आपल्या लेखनाचे विनम्र स्वागत फक्त आमच्या सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारिता मुल्यांशी तडजोड न करता प्रकाशित करण्यात येईल लेखन जरुर पाठवा . संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/