ऐतिहासिक संशोधनासाठी मोडी लिपी प्रशिक्षण गरजेचे- प्रा. महेश जोशी

लातूर : ऐतिहासिक संशोधनासाठी मोडी लिपी प्रशिक्षण गरजेचे आहे, ते एक वास्तववादी इतिहास जाणून घेण्याचे प्राथमिक साधन असून त्याद्वारे घटनेच्या मुळाशी जाता येते असे प्रतिपादन पुणे येथील मोडी लिपीचे प्रशिक्षक प्रा. महेश जोशी यांनी केले.
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील इतिहास विभागाच्यावतीने सात दिवशीय प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे हे होते. तर विचारपीठावर संयोजक इतिहास विभाग प्रमुख डॉ. सदाशिव दंदे, इतिहास मंडळाचे सचिव शुभम दांडगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. जोशी म्हणाले की, भारतात प्राचीन काळापासून प्रशासनात आणि व्यवहारात मोठ्या प्रमाणात मोडी लिपीचा अवलंब केला जात होता. यादव काळ, शिवकाळ, पेशवे काळ आणि ब्रिटिश काळ असे मोडी लिपी विकासाचे चार प्रमुख टप्पे पडतात. सन १९५० पर्यंत महाराष्ट्रात प्रशासनात मोडी लिपीचा अवलंब केला जात होता आणि व्यवहारातही वापर केला जात होता. आजच्या आधुनिक काळात अनेक स्थावर मालमत्तेविषयी निर्माण झालेले प्रश्न प्राचीन व मध्ययुगीन काळातील मोडी लिपीच्या कागदपत्रावरून न्याय निवडा करण्यास बऱ्याच प्रमाणात उपयुक्त ठरतात. सन १९५० पूर्वीच्या महाराष्ट्रातील कुणबीच्या सर्व नोंदी मोडी लिपीतच असल्यामुळे त्या मराठीत करण्यासाठी लिप्यंतर (भाषांतर) करणाऱ्यांची गरज आज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासाठीच तरुणांसाठी, वकील मंडळींसाठी, ऐतिहासिक संशोधनासाठी तसेच सर्व अभ्यासकांसाठी मोडी लिपीचे प्रशिक्षण गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. रत्नाकर बेडगे यांनी लिपी, भाषा ही त्या त्या प्रांतातील संस्कृती वहन करण्याचे प्रभावी साधन असते त्यामुळे महाराष्ट्रातील संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आजच्या काळात तरुणांनी मोडी लिपीचे प्रशिक्षण घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्याच्या विकासासाठी करावा असे इतिहासाचे अनेक दाखले देत आपले मत नमूद केले.
या प्रसंगी डॉ. अश्विनी रोडे, प्रा. भीमाशंकर शिंदे, इतिहास मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि इतिहास प्रेमी मोडी लिपीचे प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक इतिहास विभाग प्रमुख डॉ. सदाशिव दंदे यांनी केले. सूत्रसंचालन कु. साक्षी घोडके यांनी तर कु. बुशरा सैय्यद हिने आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास मंडळाचे सदस्य धीरज गायकवाड, कु. अवंतिका यादव, कु. गायकवाड, शुभम आदींनी परिश्रम घेतले.
हा प्रशिक्षण वर्ग शनिवार दि. २२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. तरी लातूर शहरातील इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, आणि संयोजक यांनी केले आहे. प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. सदाशिव दंदे (९४२३७१९८६४) यांच्याशी संपर्क साधावा.



