
भारत पाकिस्तान फाळणीनंतर सातत्याने एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. त्यात पाकिस्तानी खुरापती देशाला मोठी डोकेदुखी ठरली आहे.ही डोकेदुखी कायमस्वरूपी बंद करण्याचा उपाय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी लंडन येथे सांगितला आहे. तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर भारताला परत मिळाला पाहिजेत.
लंडन: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेल्या पाकव्याप्त जमीन परत करावी लागेल. लंडनस्थित थिंक टँक हाऊसमध्ये बोलताना जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि या प्रदेशावरील भारताची भूमिका यासह विविध विषयांवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेले संबंध वापरतील का असे विचारले असता, जयशंकर यांनी या प्रदेशाच्या प्रगतीसाठी भारताच्या तीन टप्प्यात विकास दृष्टिकोनाची रूपरेषा सांगितली.
काश्मीरसाठी तीन-पायऱ्यांचा दृष्टिकोन
जयशंकर यांनी काश्मीरमधील बदलांची सविस्तर माहिती दिली, ज्याची सुरुवात कलम ३७० काढून टाकण्यापासून झाली, ज्यामुळे प्रदेशाचा विशेष दर्जा रद्द झाला. दुसरे पाऊल त्यांनी सांगितले की, ते आर्थिक वाढ आणि प्रदेशातील वाढत्या क्रियाकलापांवर केंद्रित होते. शेवटी, त्यांनी काश्मीरमधील अलिकडच्या विधानसभा निवडणुकांवर प्रकाश टाकला, ज्यामुळे ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले, जरी काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहिला आहे.
“काश्मीरमध्ये, आम्ही बहुतेक समस्या सोडवण्यासाठी चांगले काम केले आहे. मला वाटते की कलम ३७० रद्द करणे हे एक पाऊल होते,” जयशंकर म्हणाले. “त्यानंतर, काश्मीरमध्ये विकास , आर्थिक उलाढाल आणि सामाजिक न्याय पुर्नस्थापित करणे हे दुसरे पाऊल होते. जम्मू आणि काश्मीर मध्ये खूप मोठ्या मतदानासह झालेल्या निवडणुका घेणे हे तिसरे पाऊल होते.
पाकिस्तानने ताब्यात ठेवलेली जमीन परत केल्यानंतर काश्मीरचा प्रश्न सोडवला जाईल, असे एस जयशंकर म्हणले. तर पाकव्याप्त काश्मीर बद्दल यापूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील भारत लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणेल अशी वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्याला एस जयशंकर यांनी केलेला वक्तव्य दुजोरा देते. पाकव्याप्त काश्मीर बद्दल भारताची भूमिका आता व्यापक बनत आहे. काश्मीर तर भारताचा अविभाज्य भाग आहेच मात्र पाकव्याप्त काश्मीर देखील भारताचाच आहे याबद्दलची भूमिका आता निर्विवादपणे स्पष्ट झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडात भारतातील काश्मीर सह पाकव्याप्त कश्मीर बद्दल अग्रेसिव्ह पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला यश मिळू शकते.



