महाराष्ट्र

भारतीय राज्यघटनेने समानता प्रस्थापित केली

निवृत्त प्राचार्य बाबा हातेकर

धुळे: भारतीय राज्यघटनेने समानता प्रस्थापित केली, माणसाला मनुष्यत्व बहाल केले, या राज्यघटनेने 4,000 समाज समूहांना समर्थपणे एकत्र बांधलेले आहे; समाज कसा घडवावा यावर भर दिलेला आहे, त्यामुळे भारताची राज्यघटना एक सामाजिक दस्ताऐवज आहे, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य बाबा हातेकर यांनी विद्यावर्धिनी सभेचे डॉ.एम.वाय. कला, प्रा.पी.डी.दलाल वाणिज्य
आणि डॉ.डी.एस. शाह विज्ञान महाविद्यालयात केले.
राज्यघटना गौरव महोत्सव कार्यक्रमांतर्गत प्राध्यापक प्रबोधिनीने आयोजित केलेल्या ‘भारतीय राज्यघटना एक सामाजिक दस्तऐवज’ या विषयावरील व्याख्यानात प्रा. हातेकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य व अधिसभा सदस्य डॉ. जगदीश पाटील, उपप्राचार्य डॉ. राजवीरेंद्र सिंग गावित, प्रबोधिनीचे प्रमुख डॉ. सतीश निकम व सौ. अर्चना हातेकर उपस्थित होते.
जगातल्या कोणत्याही राज्यघटनेत न्याय हा शब्द नाही. तो सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेने अंतर्भूत केला आहे.
तिच्यात राजकीय बाबींपेक्षा सामाजिक बाबींना प्राधान्य आहे. या घटनेने सर्वांना उपासना, श्रद्धा, व्यवसाय यासह सर्व प्रकारची स्वातंत्र्य दिली. ही राज्यघटना लोकांच्या स्वप्नाची संहिता असून तो भारतीयांचा श्वास असल्याने या राज्यघटनेचे सांभाळ करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असेही प्रा. बाबा हातेकर पुढे म्हणाले.
भारताची राज्यघटना अत्यंत उत्तम आणि सर्वसामावेशक राज्यघटना असून ती जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे. भारतासारख्या खंडप्राय व प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या देशाला एकत्र ठेवण्याचे काम भारतीय राज्यघटना करते, असे यावेळी प्रा शरद पाटील म्हणाले.
यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. देवेंद्र विसपुते व डॉ संतोष खत्री यांनी भाग घेतला. कार्यक्रमात प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जगदीश पाटील, सूत्रसंचालन डॉ. सतीश निकम यांनी व आभार प्रदर्शन डॉ. बाजीराव पाटील यांनी केले.राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन सहा. प्रा. गणेश जाधव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/