महाराष्ट्र

समर यांच्या ‘ धर्म’ या सहाव्या कादंबरीचे प्रकाशन

उर्मिला’ आणि ‘राधा’ या लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक समर यांच्या ‘धर्म’ या कादंबरीचे प्रकाशन बुधवारी पुस्तकविश्व येथे पार पडले. यावेळी पोलिस उपअधीक्षक आणि लेखक प्रशांत पवार, सद्गुरू फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सचिन म्हसे, रुद्र पब्लिशिंग हाउसचे प्रमुख नवनाथ जगताप, मंगेश दोडके श्री.ब्रह्मे आदी उपस्थित होते.

पुणे: लेखक समर यांची धर्म ही सहावी कादंबरी आहे. ‘धर्म’ या कादंबरीची प्रथम आवृत्ती ही प्रकाशनापूर्वीच विक्रमी पूर्वनोंदणी झाल्यामुळे संपली असून लवकरच द्वितीय आवृत्तीचे मुद्रण सुरू होत असल्याचे यावेळी श्री. समर यांनी सांगितले.

श्री. पवार म्हणाले, ‘समर यांनी केवळ तेविसाव्या वर्षी सहावी कादंबरी लिहिणे हे कौतुकास्पद आहे. त्यांनी या कादंबऱ्या केवळ लिहून प्रकाशित केल्या नसून त्या कादंबऱ्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यातही ते यशस्वी ठरले आहेत.

श्री. जगताप म्हणाले, ‘समर यांचा लेखनाचा प्रवास थक्क करणारा आहे. विषयांचे वैविध्य, सखोल ज्ञान आणि वाचकांना आवडणारी भाषाशैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.

लेखक समर त्यांचे मनोगत मांडताना म्हणाले, आपल्या संस्कृतीला अभिप्रेत असणारा धर्म या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तो व्यक्तीच्या कर्तव्याशी संबंधित आहे. स्त्रीधर्म, पुरूषधर्म, पत्नीधर्म, राजधर्म अशा अनेक अर्थांनी तो शब्द वापरला जातो. या ‘धर्माचा’ खरा अर्थ नेमका काय, या शोधात अश्वत्थामा, एकलव्य आणि कर्ण हे तिघे प्रवास करतात अशी कादंबरीची रचना आहे. एका धर्मप्रवण गावात त्यांना आलेले अनुभव आणि महाभारताबद्दल त्यांनी केलेलं मंथन हा कादंबरीचा मुख्य विषय आहे.

प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर अनेक वाचकांनी लेखकाकडून शुभेच्छासंदेश आणि स्वाक्षरी घेतली. समर यांच्या उर्मिला या कादंबरीने दोन वर्षांत दहा आवृत्त्यांचा आणि राधा या कादंबरीने एका वर्षातच आठ आवृत्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. धर्म या कादंबरीलाही वाचकांकडून निश्चितच चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास या प्रसंगी सर्वांनी व्यक्त केला.

समर मोघे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/