लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील इतर काही भागात अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणारा शेतकऱ्यांचा सण दर्श अमावस्या किंवा वेळा अमावस्या होय. हा सण विशेषतः शेतकरी वर्गात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यानिमित्ताने कुटुंबातील, परिवारातील ,नातेवाईक, मित्रांसह सर्वजण विशेष वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी आपापल्या शेतावर जमतात.
तेथे पारंपारिक पद्धतीने लक्ष्मी मातेची पूजा करून आनंदोत्सव साजरा करतात. हा एक प्रकारे वर्षभर काळ्या आईकडून मिळणाऱ्या दानाच्या(उत्पन्नाच्या) बदल्यात तिच्या पूजनाचा, संस्काराचा एक सण होय. या निमित्ताने होलग्या हुलग्या सालम पोलघ्या असे म्हणत शेतीतल्या उभ्या पिकाची सुद्धा पूजा केली जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असणाऱ्या या सणाच्या निमित्ताने लातूर शहरात मात्र दिवसभर कर्फ्यू सारखी स्थिती होती. या वनभोजनासाठी विशेषत्वाने विविध पदार्थाच्या साह्याने बनवलेली भज्जी आंबील त्यावर लसण जिऱ्याच्या तेलाचे फोडणी गव्हाची खीर रोडगा हे जेवणातले मुख्य मेनू असतात. 









