आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित करावेत : प्रा.डॉ. राहुल धावरे

इंग्रजी भाषेचे जागतिक महत्त्व, साहित्य अभ्यास, प्रभावी संवादकौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी लँगलिटच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित करावेत, असे आवाहन प्रा. डॉ. राहुल धावरे यांनी केले.
लातूर शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील इंग्रजी विभागाच्या वतीने ‘लँगलिट – स्टुडंट्स असोसिएशन २०२६–२७’ उद्घाटन सोहळा महाविद्यालयाच्या ऑडिओ व्हिज्युअल लॅब येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. राहुल धावरे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अनुजा जाधव यांनी कार्यभार सांभाळला. कार्यक्रमाचे समन्वयन/ लँगलिट समन्वयक डॉ. चंद्रशेखर दवणे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व पुष्पस्वागताने झाली. त्यानंतर डॉ. चंद्रशेखर दवणे यांनी लँगलिट या विद्यार्थी अभ्यास मंडळची ओळख करून दिली. डॉ. अनुजा जाधव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले, तर कु. जावेरिया शेख यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अनुजा जाधव यांनी इंग्रजी विभाग, लँगलिट समन्वयक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सहशैक्षणिक विकासासाठी लँगलिट हा प्रभावी मंच ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी लँगलिट – स्टुडंट्स असोसिएशन २०२६–२७ च्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये भोपळे परशराम यांची अध्यक्ष, धनश्री दळवे यांची उपाध्यक्षा आणि जावेरिया शेख यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास इंग्रजी विभागातील प्रा सचिन भंडारे, श्री. कृष्णा देशमुख, सौ. वैशाली मुळजे, श्री. अनंत पांचाळ, सौ. सारिका सुगावे यांच्यासह विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ईश्वरी जोशी यांनी केले, तर धनश्री दळवे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची समाराेप “Let’s Explore, Express & Excel Together!” या लँगलिटच्या ब्रीदवाक्याने झाली. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वर्षभर विभागाच्या विविध साहित्यिक, भाषिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.



