FLash

बसव भारत उत्सव २०२७ मध्ये सोलापुरातील एक लाख लोक सहभागी होणार

सोलापूर : बसवकल्याण क्षेत्र समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित बैठक क्रमांक ४ व सत्कार समारंभ रविवारी (दि. २ ऑगस्ट २०२६) मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे मंगल कार्यालय, हत्तुरे नगर, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील टाकळीकर होते. यावेळी बसवारूढ मठाचे प.पू. शिवपुत्र महास्वामीजी, महाराष्ट्र प्रभारी डॉ. अमरनाथ सोलपुरे, प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, प्रदेश सचिव प्रा. शेषराव शेटे (नांदेड), डॉ. मल्लिकार्जुन तरनल्ली, परभणीचे नागेश नागठाणे तसेच उद्योजक रेवणसिद्ध बिज्जरगी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

बैठकीत ‘बसव भारत उत्सव २०२७’ हा महोत्सव दि. २३ ते २७ डिसेंबर २०२७ दरम्यान बसवकल्याण येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महोत्सवात १ लाख ९६ हजार शरण-शरणींचे सामूहिक इष्टलिंग पूजन आयोजित करण्यात येणार असून, देश-विदेशातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी युवा संसद व परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू तसेच देश-विदेशातील भाविक व अभ्यासकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित असून, २५ ते ३० लाख लोक या महोत्सवात सहभागी होतील, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच सोलापूर जिल्ह्यातून एक लाख नागरिकांचा सहभाग नोंदविण्याचा संकल्प करण्यात आला.

बैठकीत खालील महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले :

1. बसव भारत उत्सव २०२७ च्या प्रचार-प्रसारासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविणे.
2. जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या कर्मभूमी मंगळवेढा येथील स्थळाचा आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून विकास करावा.
3. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा देऊन त्याचा विस्तार करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे

4. आगामी जनगणनेत धर्माच्या रकान्यात ‘लिंगायत’ अशी स्वतंत्र नोंद व्हावी यासाठी व्यापक जनआंदोलन उभारणे.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका वैशाली भोपळे, नगरसेविका सुमन चाबुकस्वार, मंडई व उद्यान सभापती राजशेखर पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, समाजसेवक वीरेंद्र हिंगमिरे, चंद्रकांत रमणशेट्टी, शिवानंद दुत्तरगी तसेच पीएच.डी. पदवी प्राप्त सोनाली घोंगडे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. बसव विचारांचा प्रसार, युवकांचे संघटन आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी कोल्हापूरचे रणदिवे, प्रा. चारुशीला तासगावे, बिरादार, जागतिक लिंगायत महासभेच्या महिला जिल्हाध्यक्षा राजश्री थळगे, सिद्धाराम कोरे, गणेश चिंचोली, लातूरचे विजयकुमार गुत्ते, राधाकृष्ण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश विभुते यांनी केले तर प्रा. सुनील हेंगणे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजयकुमार हत्तुरे (प्रदेश उपाध्यक्ष), बसवराज दिंडोरे (जिल्हाध्यक्ष), चन्नप्पा गुरुभेट्टी (शहराध्यक्ष), सिद्धाराम तांबुळे (कार्याध्यक्ष), सकलेश बाबुळगावकर, सिद्धाराम कटारे, नागेश पडणूरे, श्रीशैल पॅडशिंगे, जवळगी सर, संदेश हत्तुरे, ओंकार हत्तुरे तसेच संयोजक समितीतील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/