गुरु म्हणजे या सृष्टीचे पावर हाऊस: प. पू. राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य

”
भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान सर्वोच्च आहे. गुरु हा केवळ व्यक्ती नसून संपूर्ण सृष्टीला ऊर्जा देणारा दिव्य शक्तिस्रोत आहे. आपला प्रत्येक श्वास ही गुरुचीच अनमोल देणगी असून, गुरु म्हणजे या सृष्टीचा खरा पावर हाऊस आहे. निस्वार्थ समाजसेवा हीच खरी गुरुसेवा आहे. श्रद्धा, भक्ती आणि विश्वास यांच्या आधारावर जीवन समर्पित भावनेने जगले पाहिजे.”असे विचार वीरमठ संस्थांचे मठाधीपती तथा युवा संत परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आपल्या आशीर्वचनपर मार्गदर्शन करताना अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केले.

गुरुपौर्णिमेनिमित्त अहमदपूर येथील भक्तीस्थळावर राष्ट्रसंत परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवनी समाधी दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून आलेल्या दिंड्यांनी “गुरुमाऊलींचा जयघोष” करत भक्तीस्थळ परिसर
यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील मुरूमकर, भक्तीस्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी महाराज, भाजपाचे प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, अशोक काका केंद्रे ,पंचायत समितीच्या उपसभापती आयोध्याताई केंद्रे, चाकूर पंचायत समितीचे उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, नगराध्यक्ष ॲड. स्वप्निल व्हत्ते, दिलीपराव देशमुख, राजकुमार मजगे, त्र्यंबक गुट्टे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ओम भाऊ पुणे, निखिल कासनाळे भक्तीस्थळाचे अध्यक्ष शि. भ. प. भगवंत बाबा पाटील चांबरगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे महाराष्ट्राला लाभलेले अलौकिक दैवत आहेत. त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालत समाजप्रबोधन केले. लाखो युवकांना व्यसनमुक्त करून अध्यात्माच्या मार्गावर आणण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या विचारांचे जतन व संवर्धन करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.” तसेच भक्तीस्थळाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी भक्तीस्थळाचे प्रमुख परम पूज्य आचार्य गुरुराज स्वामी महाराज यांचेही आशीर्वचनपर मार्गदर्शन झाले.
लातूर–नांदेड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांचा गुरुमाऊलींच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, ग्रंथ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक राम तत्तापुरे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात श्री केतकी संगमेश्वर फिल्म प्रोडक्शन आणि एस.बी.बी. फिल्म्स, मुंबई निर्मित राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवनावर आधारित “वसुंधरा रत्न राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘अमृतस्य पुत्र’ आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, आचार्य गुरुराज स्वामी महाराज व आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड शंकर बिराजदार, सहनिर्माते सुमित बागबंदे, शिवप्रसाद कोरे यांनी केले आहे.
गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवपाठाच्या लयबद्ध सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. महाप्रसादाची व्यवस्था शिवकुमार घंटी आणि अंकुश दांडगे यांनी केली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवंत बाबा पाटील चांबरगेकर यांनी केले. सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार प्रताप पाटील यांनी मानले.
या सोहळ्यास मनमत पालापुरे, शिवा संघटनेचे दत्ता खंकरे, सिद्धेश्वर पाटील, शिवप्रसाद कोरे, सुप्रियाताई घोटे, शीला शेटकार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच हजारो भाविक व महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेचा हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रा. विश्वंभर स्वामी, राजकुमार कल्याणी, विनोद हिंगणे, अनिल कासनाळे, सतीश लोहारे, कपिल भालके तसेच भक्तीस्थळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. दिंड्यांच्या आगमनाने भक्ती स्थळावर कालपासूनच भक्तांची मांदिअळी होती.
तोंडार, क्षेत्रफळ, लोहारा, उदगीर वाढवणा हाळी खेडकर वाडी लांडगेवाडी सह आंध्र कर्नाटकतून गुरुराज माऊलीच्या गजरात हजारो भक्त दिंडीच्या माध्यमातून भक्ती स्थळावर दाखल झाले होते.



