FLash

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत सहभाग घ्या

भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. सदरील हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे या दृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे.भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दिनांक १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह (National Digital Repository) निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधीत संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतू कोणाला स्वखुशीने सदरील हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करावायाची झाल्यास शासन ती स्विकारेल.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत:

क्लस्टर केंद्र- कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर

क्लस्टर केंद्र- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे

आनंद आश्रम संस्थान, पुणे – स्वतंत्र केंद्र

भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे- स्वतंत्र केंद्र

महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून श्री. सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय कार्य पाहणार आहेत. तर श्रीमती. अंजली ढमाळ, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था, तथा अभिजात मराठी भाषा कक्षा, मराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

या सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत “Gyan Bharatam” हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

या मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यात ज्ञानभारतम् प्रकल्पासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे, तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेणे याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, तसेच NCC, NSS स्वयंसेवक, विद्यार्थी व वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.

या निमित्ताने आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे जर काही हस्तलिखिते उपलब्ध असतील तर त्याची माहिती ज्ञानभारतम् या मोबाईल अॅप वर अपलोड करावी व या राष्ट्र कार्यात सहभाग नोंदवावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/